Monday, November 9, 2015

०८॰ गोष्टी सांगणारा माणूस...


डोंगरावरल्या बापाने डोंगराला आग लावली.
तो धमाक्याचे आवाज करत पेटला.
काळ्या-सफ़ेद धुराचे लोट अवकाशात फेकत तो फुदफुदू लागला.
डोक्यात राख घातल्यासारखा वरचा बाप आग ओकत होता.
अचानक एक उग्र गुरगुराट सुरू झाला.
वांती होत असल्यागत ते स्वर आसमंतावर उमटू लागले.
पहाडाखालच्या कोरी जमातीची पर्वताला शांत करण्याची तयारी वाया गेली.
जीवाच्या आकांताने बापापासून दूर पळण्याची शर्यत लागली.
पळतानाही कोरींना आपल्या जंगमाची आस सुटत नव्हती.
पेलेल न पेलेल अशी चीजवस्तू ओढ़त-फ...रफटत, विनोदी दिसत,
ते बापापासून फार दूर जाऊ शकत नव्हते.
गावयेडा फेशा दांत विचकत, उड्या मारत त्यांना पाहत होता.
मध्येच किंचाळून हाकत, जोश भरत होता.
बाप पेटल्याचा सर्वात आनंद झालेला दिसला, तो फेशाला.
अचानक पर्वताने भेदक आरोळी ठोकली आणि तो उलटला.
उष्ण तांबडे पित्त, कोरींचा घास घ्यायला वेगाने धावू लागले.
फेशाने एकवार बापाकडे पाहिले.
डोळ्यात अपार आनंद आणि चेहऱ्यावर रुंद आडवे हास्य थापत
त्याने बापाला आलिंगन देण्यासाठी आपले दोन्ही बाहू पसरले...

No comments:

Post a Comment