Friday, November 27, 2015

१७-१८. गोष्टी सांगणारा माणूस...

अहो बापट,
आमचा एक दोस्त बापट आहे.
-यात आश्चर्य ते काय? बापट अगदी कुणाचाही मित्र असू शकतो. पुण्या-मुंबईत अगदी कुठेही.
...
पण हा बापट, दादरमध्ये राहतो.
-ये भी ठीक, बापट दादर वेस्टला राहू शकतो.
अहो, हा छपराचा बापट आहे.
-त्यात काय आहे? बापट छपराचा- बिन छपराचा कसा का असेना, बापट आहे ना! बास्!
अहो, हा बापट, प्रत्येक वाक्यात हे आडनाव दोन वेळा तरी घेतोच!
-असते हो! काहींना सवय असते. अभिमान असेल आपल्या नावाचा.
अहो, हा बापट... म्हणजे बापट नाही आहे!
-तोंड करा इकडे! भर दुपारी बाराला तुमच्यात टुन्न होतात!?
तो प्रश्न नाहिये! हा जो बापट आहे, त्याचे नाव जाधव.
-बंटी sss बाहेर वॉचमन आहे का बघ! एक-दोघांना घेऊन ये म्हणावं, कुठून कुठून येतात!
बाबा ss वॉचमन अंकल टाइट आहे!
-भरदुपारी बाराला!?
का? कॉमन आहे हे!
-सांगा, त्या छपरी बापटबद्दल सांगाच्!
तर हा बापट, म्हणजे जाधव-
-बंटी sss
टाइटाय !!
तर हा जाधवच बापट आहे. कारण तो छपरामध्ये राहतो! कोई शक?
-बंटीची आई sss कांदा आणा ठेचून!
कांदा कशाला, बापट? पायतान आणा बारा नंबर बापट!
चित्रविचित्र चर्या करत बापट आडवे!
त्यांचे कलत्र कांद्यासहित धावते!
तर जाधव म्हणाला, कांदा काय भाव माहित्येय का बापट? शंभर बापट!
-अहो, माझा बाप धृतराष्ट्र बापट नव्हता हो, पांडुरंग नाव त्याचं! शंभर बापटही नाही!
ते एकशेएक बापट होते, जाधव म्हणाला. खरं तर तो दोनशेदोन बापट म्हणाला, म्हणजे होतात, एकशेएक.
-हे कोण बापट म्हणाला?
जाधव!
-दादर वेस्ट, छपराचा!
बरोबर बापट,
बिन छपराचा बापट, छपरात बसून म्हणाला... म्हणजे जाधव!
-@#$%!@#$£π¶ zzzz
बंटी sss अम्ब्युलंस सांग! बापट गेले !!
म्हणजे जाधव ना, अंकल ???
बापट अम्ब्युलंस बोलाव!

स्थळ: सुश्रुषा रुग्णालय, दादर- ICU
वेळ: कोमापूर्वीची...
मी आणि जाधव, डॉक्टरच्या विनंतीला मान देऊन पोहोचतो.
आम्हाला पाहताच बापटांचा ऑक्सीजन मास्क व्ह्यक्युम क्लीनरसारखे आवाज करू लागतो.
ते डोळे गरागरा फिरवतात, नर्स 'पल्पिटेशन!' वगैरे ओरडू लागते.
अहो, बापट, तुम्हाला भेटायचे होते ना? ते हे जाधव आलेत!
':जाधव की बापट?' क्षीण सूर
दोन्ही!
:पल्स! पल्स जातेय त्यांची! -नर्स.
:जाधव, तुम्ही पुढे व्हा. काय ते क्लीयर करा. असेच मेले, तर बापट अधांतरी लटकतील. मुक्ति नाही त्यांना.
"हेलो बापट! मी जाधव, बापट!" जाधवने हात पुढे केला, सलाइन पाहून मागे घेतला.
- जाधव-की बापट?
"ते सोड! किती बापट लावले तुला?"
बापट मान टाकू लागले.
:'सलाइन ना? सहा बापट! तीसरी आहे ही.' मी
"अहो यांना काय ते क्लीयर करा ना! कोमाच्या टचलाइनवर आहेत बापट" डॉ.
"तुला टचलाइनवर उचलतो, बापट! घाबरू नको, फिल्डिंग लावू आपण!" जाधव.
"मी मरू? जाऊ कोमात? जाऊ??" बापट निर्वाणीवर. कलत्र सूर धरते.
"बापट, तुझ्या बापटला बाहेर जायला सांग! नायतर रडून इथे पन्नास बापट जमवेल!" जाधवचा वैताग.
डॉ. कलत्राला समजावून बाहेर नेतात.
"अहो, याला आवरा हो? कोण ही व्यक्ति? हिला का आणलीत माझ्या आयुष्यात?
आधी ही जगात का आली? कोण म्हणून आली? जाधव की बापट? याची उत्तरे माहीत असून दिली नाहीस,
तर तुझ्या डोक्याचे 200 बापट होऊन तुझ्याच पटीत लोळू लागतील." बापट भूत बाधल्यागत मला.
"काय आहे बापट, आता तुमची पेटतेय, हळूहळू." मी सुरू.
" हा जाधव जो आहे तो राहतो दादरच्या छप्रा बिल्डिंगमध्ये म्हणून हा छप्राचा बापट.
आणि याची कौलं उडालीयत म्हणून हा बिनछप्राचा बापट." मी ट्युटोरियल मोडमध्ये.
:"पण बापटच का? जाधव का नाही??" बापट
"अरे बापट, छप्रा बिल्डिंग म्हणजे रावण!
"आता हे नविन पात्र रावण कोण? जाऊ कोमात!?" बापट धमकी मोड़.
" अहो बापट, रावण म्हणजे अमर बापट! बापट गँग! जाधव बापट गँगचा.
 ते एकमेकांना बापट नावाने बोलावतात आणि पुरे मार्केट बा-पटीने चालवतात!
दादर स्टेशनचे सगळे हॉकर बापट गँगचे. बाराचा भाव चोवीस बापट लावतात!
म्हणजे डबल रेट माल विकतात.
काल तुम्हाला बापट बारा नंबर पायताण सांगितलं म्हणजे सहा नंबर. तुमचीच वहाण.
202 बापट म्हणजे 101 कौरव आणि
50 बापट जमवेल म्हणजे 25 माणसं जमवेल, कळलं?
असा हा जाधव म्हणजे बापट, पेटली?"
बापटांनी हे ऐकलं आणि मान टाकली.
अर्थात त्यांना बा-पट मुक्ति मिळाली.

No comments:

Post a Comment