Friday, November 27, 2015

१९. गोष्टी सांगणारा माणूस... धंदा समाजवादाचा- १


धन्नोचा बाप समाजवादी नेता होता.
म्हणजे जेव्हा समाजवादी फॉर्मात होते, तेव्हाची गोष्ट.
समाजवादी फॉर्मात कधी होते? तर होते एकदा.
खूप-खूप वर्षांपूर्वी समाजवादाला बरें दिवस होते,
तेव्हा चड्डीला कंटाळून काही लोक समाजवादी झाले, त्यात धन्नोचा बाप होता.
पण तो ज़माना जाऊं दे, मी धन्नोची इस्टोरी सांगतोय.
तर समाजवादी बापाचा लेक काहीच करे ना!
समाजवादात सर्वांनी कष्ट करायची गरज नसते, असे त्याने कुठेतरी वाचले.
राबवले.
बापाशी वाद झाला तेव्हा त्याला पटवून दिले!
लायसन्स टू चिल!
धन्नो सकाळी स्टेशनरोडला पुलावर हमाल- कड़ियांत असायचा,
रात्री भाजीमार्केटचे भैये भिशीवर राहयाचे, त्यांत असायचा.
सकाळी सातारी आणि रात्री लंगरवर.
बाप खुश... पोरगा नाव काढणार...
गरीब, पददलित आणि उपेक्षित, म्हणजे समाजवादाचे फ्यूअल. 
सगळा  करोबार, या फ्यूअलवर बेतलेला. 

आपल्या बापाची लाइन, धन्नोने  पाळण्यातच  ताडली असणार. कारण पाळण्यात असल्यापासूनच तो काही करत नाही. त्याची ही लाइन बघूनच त्याच्या आत्याने त्याच्या कानात, धन्नो sss अशी फुंकर घातली असणार. असा समाजवाद्याच्या  घरात धन्नो पैदा झाला. शाळेत घातल्यापासून  धन्नोने शेवटच्या बाकावर बसण्याखेरीज काहीच केले नाही. शाळेच्या प्रोटोकॉल प्रमाणे वरचे वर्गात गेला / घातला/ ढकलला शेऱ्यांनी  त्याचे प्रगतीपुस्तक लालमलाल दिसत असे. थोडक्यात, शाळेत अभ्यासातला अ सुद्धा न काढता धन्नो मॅट्रिक झाला. संपूर्ण पस्तीस टक्के! हा सृष्टीतला एक चमत्कार होता. धन्नोलासुद्धा अजून तो समजलेला नाही. मात्र त्या वर्षी, धन्नोच्या पाठी बसणारा मुलगा सर्व विषयांत फेल् झाला म्हणतात. होणारच! त्याने धन्नोची कॉपी केली असणार! 

मॅट्रिक झाला आणि प्रथे-परंपरेने  तो कॉमर -आठ- नायतर  सायनला गेला. वर्ग कोणताही असो, धन्नोला त्याच्याशी काही देणे-घेणे नव्हते. हा, इथे त्याची प्रगती होऊन तो मळणी करू लागला. बोलताना तोंडात गोटी ठेवून बोलायचं- त्याची लाळ  गळायची, असा भलताच आजार त्याला झाला. मात्र गाडी बारावीला अटकल्याने कॉलेज सुटले- तमाखू नाही. आता धन्नो बारा महिने, तेरा काळ कॉलनीत नाका, कट्टा, मंदिर, चौरसियाचा ठेला- इथे पडून असायचा. कुणाशी काही बोलायचाच नाही, काही विचारलं तर खुणा करत उत्तरे द्यायचा. 

धन्नोच्या बापाला आता टेंशन आले. समाजवाद असला म्हणून काय झाले? त्यात एकाने काहीच काम करायचे नाही, असे कुणी लिहून ठेवलेले नव्हते. धन्नोने काही उद्योग धंद्याचे करावे म्हणून त्याने नाना प्रयास केले. एकदा तो जोशी काकांच्या वाणसामान दुकानात पुड्या पण बांधायचा. मग एक दिवस त्याने जोशी काकांचीच पुडी बांधली, आणि ते सुटले! मग मंडप- डेकोरेटर्सचे काम करणाऱ्यांवर देखरेख करायला याला ठेवला, पण याच्यावर देखरेख करणार कोण? म्हणून ते ही सुटले.धन्नोच्या आयुष्यात उद्योग-धंदा असा सणासुदीला येऊन जायचा. बाकी बारा महिने बेकार.आपल्या या स्वयंभू पोराचे  करायचे काय? हे समाजवादी बापाला कळेना.. 

No comments:

Post a Comment