Friday, November 27, 2015

२२. गोष्टी सांगणारा माणूस...


पूर्वेकडील पहाडी प्रदेशात एक प्रथा आहे.
ज्याने कुणी आमवस्येच्या रात्री जंगलातील डाकिणीच्या झिंझ्यातला एक केस काढून आणला,
त्याला कुबेराचा खजिना प्राप्त होतो.
त्यामुळे हा केस मिळवण्यासाठी पहाडी पोरां-सोरांपासून, म्हाताऱ्या-कोतारयांपर्यंत सर्वांत एक चढाओढ असते.
हा केसही काढायचा तो, 'भागती' आमवस्येला.
भागती आमवस्या ही सर्व आमवस्येंतील खतरनाक मानली जाते.
म्हणून त्या आमवस्येला संध्याकाळी सातलाच जेवण-बिवण आटोपून ‘जोंगोल बोश्ती’ झोपी जाते.
साडेसातला जरी गेलात, तरी मिट्ट अंधार आणि सन्नाटा.
अशा गावात जायला, संध्याकाळी सातला ‘जोंगोल बोश्ती’ला पोहोचू या बेताने मी आणि केएम, दार्जिलिंगहून निघालो,
पण वाटेत फॅनबेल्ट लुज होऊन आम्ही पोहोचेस्तोवर आठ वाजून गेले. राह में सन्नाटा.
गाडीवाल्याने वाजवून दोनशे रुपये सवारी घेऊन आम्हाला रस्त्यावरूनच खाली जंगल बस्ती दाखवून सोडले.
आज भागती आमवस्या असल्याने मी आणि केएम, डाकिणीला पहायला तिथे आलो होतो.

 आता जंगलात उतरणारा मळका खडकाळ रस्ता उतरायचे.
केएम तिथला स्थानिक, त्यामुळे मला एरियाची खासियत, इथे-तिथे टॉर्च फेकत सांगत होता.
इथे ब्रिटिश काळात एक शांतो बॅनर्जी नावाचा रईस चहा मळेवला राहत होता.
त्याने बांधलेला वाडा आज ओसाड पडून आहे.
शांतोला एव्हढा पैसा असूनही कुबेराचा खजिना हवा झाला,
आणि तो भागती आवसेला डाकिणीच्या झिंझ्या उपटायला घोड्यावरून निघाला.
सकाळी फ़क्त घोडा परत आला.
शांतो नंतर कधीच कुणाला दिसला नाही. त्याचा वाडा पडून राहिला आणि कालांतराने दंतकथा झाला.

 आम्हाला वाटेत एक वळलेली पायवाट दिसली. केएम म्हणाला, ही काली मंदिरच्या खण्डहरकडे जाते.
तिथे हल्ली कोणीच जात नाही, डाकिणीच्या भीतीने. आपण जाऊ. निघालो.
सहा डिग्री थंडीने काकडत होतो, फुल बदन लपेटून फायदा होत नव्हता.
त्यात डाकिणीच्या एरियात मणक्यातून चिल शिरशिरी. रस्ता असा नव्हताच.
जाळी, पाने बाजूला करत आम्ही पडक्या मंदिरापर्यंत पोहोचलो.
ती नुसती वास्तू आमची तीन हात करत होती. आर या पार. 
डाकीण भेटलीच, तर केएम कुकरी आणि मी कडकडी घेऊन तयार होतो.
आम्ही मंदिर शक्य तितक्या बाजूने फिरून पाहिले. डाकिणीचा पत्ता नव्हता.
आम्ही परत जायला वळलो. रस्त्याला यायला फक्त केएमचा अंदाज होता.
मला वाटते आम्ही चुकलो. आणि भलतीकडे गेलो. तिथे एक उतार होता.
आम्ही खाली पाहिले, टॉर्च पोहोचत होता, तिथवर अंधार होता. काही कळत नव्हते.
उलटे वळणार तोच, अंधाराच्या भुयारातून टापांचा आवाज ऐकू आला. काहीतरी येत होते.
केएम ने टॉर्च बंद केला. अंधारात डोळे फाडून आम्ही पाहत होतो.
काहीतरी सफेद, घोड्यासारखे दिसले. त्यावर काहीतरी बसलेले.
ते वाढत होते! पाच फूट-दहा फूट- वीस – च्यायला !! केएम बोलला, "भाग साले!!"

आणि आम्ही उलटे पळत सुटलो. केएम क्षणभर टॉर्च फेकायचा, बंद करायचा.
आम्ही अंदाजे पळत होतो. झाडे, फांद्या, काटक्या आणि पायाला दगड- बोचून काढत होते.
आम्हाला रस्ता दिसला. तो समोर गावात जात होता.
भागती आमवस्येच्या किर्र रात्री आम्ही
संध्याकाळी सातलाच गपगार झालेल्या ‘जोंगोल बोश्ती’कडे धावत होतो.

No comments:

Post a Comment