Friday, November 27, 2015

२३. गोष्टी सांगणारा माणूस...


बालक ऋषिराज जन्मला तेव्हाच त्याला US ला सेटल करायचे ठरले.
नाव ऋषिराज अर्थात त्याच्या आजीने ठेवलेले. आजोबा दुर्वास किंवा जमदग्नी कॅटेगरीतले.
स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन ते नित्यानेमे अंमळ देशी लावायचे म्हणून दुर्वास.
 ऋषिराजला संस्कृत आणि संस्कृति परायण करण्याच्या प्रयत्नात होते,
तेव्हा दुर्वासपुत्र उर्फ ऋषितात, ग्रीनकार्ड आणि इतर नियमांची छान -बिन करत होते.
दुर्वासपत्नीकडून बालक ऋषिराज जेव्हा गीतेतील अध्याय सुरात
आणि अर्थाची अजिबात चिंता न करता मुखोद्गत करत होते,
तेव्हा ममी नावाच्या घरात नव्याने घुसलेल्या असंस्कृत वस्तूने बालकास कुक्कुट गर्भ खावयास घालून हाहा:कार उडवून दिला.
बालक पंचम वयीन होताच त्यांस हिंदोस्तानी संगीताचे धडे सुरू करीत सेंट फ्रान्सिस नामे आंग्ल पाठशालेत प्रवेश मिळवून दिला.
असे प्रगति आणि संस्कृतीरक्षण एकसमयावच्छेदेकरून सुरू होते.

बालक ऋषिराज सर्व क्षेत्रांत प्रथम राहील हे पाहणे, ममी नावाच्या वस्तुचे प्रमुख कार्य होते.
या व्यतिरिक्त फावल्या वेळात करमणूक म्हणून तिने बँकेत वगैरे सेवा देण्यास दुर्वासांची काही हरकत नव्हती.
ते एकाचवेळी संस्कृतीरक्षक आणि प्रागतिक विचारांचे होते.
दुर्वास पत्नी दुपारी श्रांत महिला मंडळात रसाळ आणि सुश्राव्य अशी
हिन्दी चित्रपट गीतांच्या चालीवर बांधलेली भजने गात आपला संस्कृती रक्षणाचा कोटा पुरा करीत.
त्याचवेळी दुर्वास आपले स्वदेशी व्रत अंगिकारित असावेत, असा ऋषितातास संशय होता, पण पुरावा नसल्याने ते गप्प राहिले.
पुरावा अर्थात घरातील पाण्याच्या टाकीमागे दडवून दुर्वासांनी ती सुरू-बंद करणे आणि भरेपर्यंत शिडीवर उभे राहणे,
हे काम मोठ्या आवडीने स्वीकारले होते. प्रगतिशील कुटुंबात असेच सर्व घटकांचे कार्यरत असणे अभिप्रेत असते.
तरच संस्कृती टिकते आणि तिचे संवर्धन होते.

सेंट फ्रान्सिस नामक शाळेची प्रेयर जेव्हा बालक घरी ' ओ द अलमाइटी..' वगैरे स्वरांत मुखोद्गत करू लागले,
तेव्हा ईश्वर एक आहे, हे दुर्वासांनी ठणकावून सांगितले, त्यामुळे संस्कृती अबाधित राहिली.
शालेय शिक्षणाच्या प्रथम वर्षांत जेव्हा वर्गमित्राच्या बर्थ-डेला केक खाण्याची वेळ आली तेव्हा,
त्यांस परवानगी नाकारली गेली. त्याने घरी काय ते खावे, पण चारचौघांत संस्कृतीचे पालन करावे असे सर्वानुमते ठरले.
ऋषितात मात्र त्यावेळी वसईच्या मित्राकडे कुक्कुट सुपाचे आस्वाद घेऊ लागले होते.
बघता बघता ऋषिबाळ मोठे झाले आणि ९५ प्रतिशत गुण प्राप्त करीत
शालान्त आणि कनिष्ठ विद्यापीठ परीक्षा उत्तीर्ण झाले, कारण ते अपरिहार्य होते.
त्या नंतर लगेचच बालक ऋषिराज यांची रवानगी सरकारी कोशातील डॉलर्सचा विनियोग करीत,
स्थापत्यशास्त्राचे उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत करण्यात आली.
तेव्हा कोलंबसाने शोधलेला भारत, म्हणजेच अमेरिका, असा युक्तिवाद दुर्वास करू लागले.
तोवर ते त्यांच्या निवृत्तकर्मचारी हास्य मंडळात हास्याचा विषय झालेलेच असल्याने सभासदांस वेगळे हसण्याचे प्रयास होत नसत.
दुर्वास बोलले की मंडळात हास्याचे स्फोट सुरू होत. याने विभागातील शांतताभंग होत असल्याची तक्रार पोलिसांत आली होती,
पण तपासावर आलेले पोलिसही भरपेट हसू लागल्याने त्या विरूद्ध कोर्टात याचिका करावी असे तक्रारदारांस
म्हणजे दुर्वास यांचे खडूस शेजारी, आणि मंडुकशास्त्री असे टोपणनाव दिले गेलेले, बेडेकर (बेडूक!) यांस सुचवले गेले.
पण खर्च फार असल्याने त्यांनी तो बेत रहित केला.
त्या ऐवजी ऋषितातास, बाल्कनीत तुळशीच्या कुंड्या ठेवून सोसायटीचे नियम तोडल्याच्या पोलिस तक्रारीत गोवून,
ऋषीराजाचे अमेरिकेला जाणे अशक्य करावे, असा नवा उपाय त्यांना सुचला.
अशा खमक्या योजना त्यांस नित्यनेमाने सुचत, त्यामुळे आपले बेडेकर नाव मुंडकेश्वर असे बदलून घ्यावे, अशी इच्छा त्यांस होत होती.

सर्व अभद्रांवर मात करून आणि कुलस्वामिनीस चांदीचे मुकुट दान करून, ऋषिराजास अमेरिकेत धाडले गेले.
तिथे स्ंनातकोत्तर प्रशिक्षण घेऊन बालक तिथेच स्थिर झाले. अमेरिकेत दीड शतकांपूर्वी इटलीतून स्थलांतरित झालेल्या
कन्यकेशी त्याचा एका सुमुहुर्तावर विवाह संपन्न झाला.
त्यावेळी आर्य हे मूळ इटली आणि रोममधून भारतात स्थलांतरित झाले असा रोमांचक युक्तिवाद दुर्वासांनी केला
आणि त्यासाठी स्वरचित 'आर्यांचा इतिहास' या पुस्तकातील दाखले दिले.
या पुस्तकाचे नंतर जाहीर वाचन करायचे हास्यमंडळातर्फे ठरले.
पण विभागातील शांतताभंग होईल या डेसीबलिक कारणाने पोलिसांनी ते डीसेबल केले.
काही वर्षांनी ममी नावाची असंस्कृत वस्तू आणि ऋषितात कोलंबसी भारतात,
आद्य आर्यकुलीन स्ंनुषेसोबत स्थिरावण्यास निघून गेले.

तिथून ते सध्या भारतातील असांस्कृतिक राजकीय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असतात.

No comments:

Post a Comment