Friday, November 27, 2015

२०. गोष्टी सांगणारा माणूस...


वर्षे गेली आणि धन्नोच्या समाजवादी बापाला झटका आला.
त्याने धन्नोला अल्टीमेटम दिला.
अठ्ठेचाळीस तासांत पोटापाण्याचं काय करणार ते ठरव. समाजवादाचं काही खरं दिसत नाही.
नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचे डिपॉझिट काठावर वाचले होते.
ऑपोजिशनने मिरवणुकीत गाणी पण म्हटली होती.

 "गजा रे गजा काय तुझी मजा,
समाजवादाचा वाजवतो बाजा,...
डिपॉझिट वाचलंय थोडक्यावरी
न गजा बसलाय घोडीवरी."


समाजवादी राजकारणावर पोराला पोसता येणार नाही,
हे लक्षात आल्यावर बापाने धन्नोला 48 तासांचा अल्टीमेटम दिला.
धन्नो टेन्स होऊन मॅकला घेऊन माझ्याकडे आला.
"अड़तालीस घंटे में सोचो, बिझनेस क्या करनेका? सोचने का रिवॉर्ड मिलेगा!"
या देशात विचार करायचे पैसे मिळतात, हे आम्हाला पहिल्यांदा कळलं.

पुढचे अठ्ठेचाळीस तास, धन्नो बियरवर होता, सोबत आम्ही होतो.
फ़क्त लंडन पिल्सनर आणि विचार! धन्नोला कोणता क़ारोबार सूट होईल?
मॅकने स्टेशनवर तीन पत्ते फिरवण्यापासून, लकी सोडत स्किमपर्यंत अशा आयडिया दिल्या की,
मॅक देशाचा अर्थमंत्री झाला, तर देश कुठच्याकुठे जाईल, यावर आमचे एकमत झाले.
मात्र त्याच्या स्किमवर अंमल केला तर धन्नो कुठल्याकुठे न जाता बाराच्या भावात जाईल,
याचा आम्हाला अंदाज आला.
त्यातल्यात्यात मॅकने दिलेला बरासा धंदा होता, मंदिर टाकणे!
फूल टू कमाई आणि नो टॅक्स.
पण धन्नोचा बाप समाजवादी असल्याने मंदिराचा बेत मागे पडला.
धन्नोला समाजवादी टच असलेला कोणता धंदा द्यावा? समजेना.
यात भांडवलदार LP कंपनी मात्र रईस होत होती.
अठ्ठेचाळीस तासांनी निर्णय झाला. काहीच करायचे नाही. एकदम समाजवादी धंदा!
पैसेवाल्याकडून उधार घ्यायचे, गरीबाला मदत म्हणून.
सहसा तो परत मागत नाही. मागितले, तर दुसरा रईस पकडायचा.
त्याचा माल पहिल्याला द्यायचा. 52 दिवसांचे क्रेडिट रोलिंग!
दुसरयाने मागितले की तिसऱ्याकडून घ्यायचे! दुसऱ्याला द्यायचे!
सगळ्यांना सामान वाटणी की आला समाजवाद!

मॅक देशात समानता आणू शकेल असा एकमेव अवलिया आहे.
"अरे, पण बापाने विचारले, कसला धंदा करतोस? तर...?
"त्यात काय आहे? सांग रोलिंगचा धंदा!"
जगातील पहिल्या समाजवादी बिझनेसच्या शोधाचे श्रेय, मॅककड़े जाते !

No comments:

Post a Comment