आमचे सट्ट्याचे प्रयोग...
सत्यावर सट्टा लावावा अशी परिस्थिति या भारतवर्षात अनेकदा उभी राहते.
सत्याचे दोन तट पडतात. प्रत्येक म्हणतो माझे तेच सत्य, तुझे ते असत्य.
एकाच वेळी सत्याची दोनच नव्हे तर अनेक वर्जन्स घेऊन उभा राहिलेला समाज म्हणजे आम्ही.
ही परिस्थिति बदलायचा जो प्रयोग मी जेव्हा-जेव्हा केला, तेव्हा-तेव्हा माझ्या सत्याचे वरील शीर्षकात रूपांतर झाले.
८० चे दशक असेल. आमच्या एरियात कोणातरी ‘आर’ ला. रीटयर्ड हर्ट नाही, व्यवस्थित जगण्याची हेलपाटी टाकून, ‘राम बोलो.’
आमच्या एरियात आम्ही नामचीन खांदेकरी. पालखीचे भोई असतात तसे आम्ही तिरडीचे ढोई.
आम्हाला हमखास आमंत्रण, फिक्स. ज्या घरात कधी बारशाला, पूजेला, एंगेजमेंट इतकंच काय, लग्नालाही बोलावत नाहीत,
त्यांचे हे एक आमंत्रण फिक्स आम्हाला. बरं ही आमंत्रण कधी काळ-वेळेला?
अर्थात काळ-वेळ बघून जाण्याची पद्धत नाही ना.
रात्री-बेरात्री, दसरा नाही, दिवाळी नाही- कॉल आला की ढोई निघाले.
इतके ट्रेन्ड लोक झालेत, की मयताच्या सामानाच्या दुकानातही समान चेक करून, वाजवून घेतात.
मागचे हिशेब काढून आज भाव घासघीस करतात. त्या दुकानवाल्यांनी पण आता हात टेकलेत.
असो, मुद्दा तो नाही. आज तिरडीवर काढतोय, ते आहे सत्य.
आता तुम्ही विचारलं, शाश्वत सत्य की अशाश्वत वगैरे , तर त्याला काही अर्थ नाही.
सत्य नेहमी कालसापेक्षच असतं.
तर ८० च्या दशकात आमच्या स्मशानात नुकतेच इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम सुरू झाले होते.
भाव मुदडी-दीडशे रुपये फक्त. तर सवा खंडीचा विषय निघाला, तसे मी पर्याय सुचवला.
फक्त दीडशे रुपये. घ्या सावलतीत आहे. च्यायला जुर्म हो गया.
“लाकडावर दहन ही आमची संस्कृती आहे. ती आम्ही जपणार. इलेक्ट्रिक वगैरे अमेरिकन नखरे आहेत. ते इथे नकोत.”
“अरे, पण एक मुडदा जाळायला लाकडे किती लागतात? म्हणजे झाडांचा- पर्यायाने पर्यावरणाचा नाशच ना?”
“हे तुमचे बुद्धिवादी तत्व तुमच्याकडेच ठेवा. नाहीतर त्यांना जाऊन सांगा, जे जमिनी खराब करतात.
आमची संस्कृती बघा. सारं काही राख होऊन जातं. म्हणजे खराब काहीच नाही.”
“अरे, पण जंगल, झाडे यांचा नाश होतो की. पर्याय नव्हता तिथे आणि तेव्हा ठीकाय.
पण आता सरकारने स्वस्त पर्याय उभा केलाय, तर वापरायला काय हरकत आहे?”
यावर मोठा वाद होऊन मी अधर्मी, धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि अतिशहाणा ठरलो.
ते दहन रीतसर सवाखण्डीवर झाले. खरे तर सत्य तेव्हा असत्य ठरले म्हणजे, त्या लाकडांवर तेच जळले होते.
पुढे विद्युतदाहिनी नीट वापरात यायला आणखी चार-पाच वर्षे गेली,
आणि दहा वर्षांनी तर , तेव्हा ज्यांनी मला भ्रष्ट, अतिशहाणा ठरवले होते,
त्यांच्या घरातील उत्तरक्रियाही विद्युतदाहिनीवरच झाल्या.
आता पुरोहितांनी ही पद्धत सशास्त्र धर्मातही आणली आहेच.
थोडक्यात- धर्म म्हणजे कर्मकांडे आणि परंपरा, यांचा एव्हढा झापडी पगडा आपल्यावर आहे,
की त्यात बदल म्हणजे धर्मनाश, असे काही आपल्या डोक्यात रुजते.
यात सत्याचा प्रयोग सट्ट्याचा ठरतो, याचा हा एक अनुभव.
असेच एकदा भारत देश आणि त्याच्या महानते विषयी गप्पा सुरू होत्या.
म्हणजे तो भारत नाही, जो १९४७ साली स्वतंत्र झाला, तर तो भारत जो प्रत्येकाच्या कल्पनेत अस्तित्वात आहे.
या चर्चेचे नमुने:
“लंका आणि भारत यांना जोडणारा सेतू आहे. आजही दिसतो. नासाने ही मान्य केलेय, आता बोल!”
“काय बोलू? सेतू होता म्हणून आपल्याच जहाजांना संपूर्ण श्रीलंकेला वळासा घालून मद्रास नाहीतर कलकत्त्याला जावे लागते.”
“जाऊ देत ना! त्यांना लांब पडते म्हणून आम्ही आमची ऐतिहासिक रचना तोडणार नाही.”
“अरे सुवेझ, पनामा असे कालवे झाल्याने समुद्रप्रवास, किती वेळ, श्रम आणि पैसा वाचवतो आहे.”
“तुला शेवटी सेतूवरच घाव घालायचाय ना? हीच अपेक्षा तुझ्याकडून.”
मी तिरडीवर.
“भारत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडे एव्हरेस्ट आहे, त्यावर पहिल्यांदा जाणारा तेनसिंग नोर्गे आहे.”
“तो तेंझिंग आहे.” करेक्ट?
“म्हणून काय झालं?”
“अरे तेंझिंग नेपाळी होता. आणि हे जे एव्हरेस्ट म्हणतोयस ना, त्याचा अर्धा भाग नेपाळमध्ये आहे आणि अर्धा चीनमध्ये.
आपल्या हद्दीत एक कण नाहीये.”
“काय बोलतोस!” पूर्ण अविश्वास!
“तुला खूप बरं वाटलं असेल ना? ते भारतात नाही म्हणून?”
हा अस्सल प्रतिवाद झाला. घालशील! घालशील परत वाद?
काढ तिरडी!
“जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक , ताजमहाल, आपल्याकडे आहे, हे तर मानशील?”
“हे मी का मान्य करू नये? कारण देशील?”
“आता बघ! झटक्यात मानतोय! कारण तो मुसलमानांनी बांधलेला ना!”
नशीब याने तेजोमहालाची स्टोरी ऐकली नाहीये.
“साले हे फुरोगामी असेच! आपल्या कशाचं कौतुकच नाही आणि जरा दुसर्याचं दिसलं की डोक्यावर घेऊन नाचा!”
“एक मिनिट, मी कंफ्यूज आहे. मला समजावं जरा. आपलं, दुसर्याचं म्हणजे नक्की काय?
इतिहास घडताना त्या लोकांना काय स्वप्न पडलेलं का?
की पुढे असा-असा एक महान देश जन्म घेणार आहे- तेव्हा घडायचं तर त्याच्या हद्दीत घडू या, नाहीतर नकोच ते!”
“म्हणजे? काय म्हणायचंय? स्पष्ट बोल?”
“बघ आपल्या पुराणात वर्णन केलेले कित्येक प्रांत, राज्ये आज बांगलादेशात आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानात आहेत.
तर आज त्यांचा अभिमान बाळागायचा की नाही?”
“म्हणाजे पाकिस्तान आणि बांगला देशचा?”
“नाही प्राची आणि तक्षशीला वगैरे?”
“का?”
“नाही तुमची परमिशन नसेल तर आपण १५ ऑगस्ट १९४७ पासून नको मानुया त्याचा अभिमान. गांधारचाही नको.”
“आता ते आपल्या देशात नाहीत ना, संपलं!”
“हो पण ते आता दुसर्या देशांत आहेत, तर त्यांचा द्वेष करायला (च) हवा का? ते ही सांगा.”
“हा हरामखोर आहे. शब्द गोल-गोल फिरवून फसवतोय.”
“यांच्यामुळेच तर वाट लागली.”
भारताच्या फाळणीत माझा वाटा आहे, हे मला असे समजले. तिरडी!
“मला सांगा, भारताच्या पश्चिमेला काय आहे?”
“अरबी समुद्र”
“का?”
“का म्हणजे काय? आहे म्हणून आहे!”
“पण अरबी समुद्रच का? भारतीय का नाही? साला रोज तुम्ही चौपाटीवर जाता, ते अरबी समुद्र पाहायला?”
माझ्या आता मस्तीच आली होती.
“समुद्राच्या पाण्याची कसली जात पाहतोस? नावात काय आहे? समुद्र तो समुद्र ना?”
इतका सुंदर लॉजिकल विचार करू शकणार्या मित्राचा मला हेवा वाटला.
समुद्र –समुद्र, जमीन-जमीन नाही.
“मला एक डाऊट आहे.”
“आता आणखी काय?”
“समजा, भारताचा एक मुस्लिम सैनिक, लढाई करत पाकिस्तानच्या हद्दीत गेला.
खूप पराक्रम केला त्याने, आणि समजा, युद्धात जखमी होऊन पडला त्यांच्या हद्दीत... तर त्याचे प्राण कुणी वाचवायचे?”
“म्हणजे काय? आपले सैनिक जातील आणि वाचवतील!”
“नाही, समजा जबरदस्त शेलिंग सुरू आहे. कोणी जाऊ शकत नाही. त्याचे प्राण आता फक्त देवच वाचवू शकतो. तर..?”
“तुला काय म्हणायचंय? स्पष्ट बोल!”
“नाही म्हणजे, त्याचे प्राण वाचवायचे कोणी?
भारताचा सैनिक आहे म्हणून देवाने की, मुस्लिम आहे, म्हणून अल्लाने?
आपला देव पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्या सैनिकाचे प्राण वाचवेल?
की अल्ला, त्याच्या बंद्यांशी युद्ध करणार्या काफिराला वाचवेल?”
“तू स्वत: कंफ्यूज आहेस, आणि आम्हा क्लीयरहेड लोकांचा बुद्धिभेद करतोयस!”
“याच्या नादाला लागू नका, हा दुंनियेवरून ओवाळून टाकलेला आहे.”
“कोणी का वाचवेना! तुला काय पडलीय?”
“फक्त तिरडी बांध तू !”
-देव एकच आहे हे शेवटपर्यंत कोणी बोललाच नाही.
तिरडी !
No comments:
Post a Comment