Sunday, December 20, 2015

२७. गोष्टी सांगणारा माणूस...

"बोल कांच्या, ग- ग रेss गुत्त्यातला, म-म रे ss मटक्यातला, भ-भ रे ss"
सळया, विटांनी भरलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवर नव्याने लागलेल्या कांच्याची माल्ट्या, मराठीची शिकवणी घेत होता.
साइटवर रहायचं तर मराठी यायलाच हवं, नाहीतर उद्या सकाळी काठमांडू! असा दम भरलेला.
ते नेपाळी पोर भेदरलेलं... माल्ट्याच्या ढुसला नाही, मराठीला!
पहिल्याच दिवशी ष क्ष ळ वगैरे उच्चारायला लावून कांचा जेरिस आणलेला.
माल्ट्या एका हाती चार इंची प्लायवुडची पट्टी घेऊन प्रत्येक चुकीला त्याच्या पोटरीवर चपाती काढत होता.
पोर बाप जन्मात मराठी शिकणार नव्हतंच! ते मार खात होतं, नंतर पैशा मिळणार म्हणून.
रोज तीन शब्द आणि एक जोडाक्षर बोलला की त्याला रूपया मिळायचा. तो रुपया जपून ठेवायचा.
त्याला पैसे मिळत होते ते रात्री साइटचा पोरांना मुक्त वापर करू देण्यासाठी.
मग तेलाचे झाकणदिवे लावून कुठे फोर-एट फिल्ड लागे. कुठे मैफल. दुनियेला ताप नाय, मेंढीचा खतरा नाय की रेडची डर नाय.
एकेका टायमाला तीन-तीन फिल्ड सेट व्हायची. टेबलच दोन-तीन हजार निघायचं.
त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून आरुमुगमला संचार दिसणार होता.
आरुमुगम साइटवर बिगारी, त्याला शक, त्याच्या बायकोवर, येरिमलईवर कोणी करणी केलीय.
त्यावर उपाय करायचा तर माल्ट्याला केस हिस्टरी माहीत हवी, म्हणून कांच्याला हाताशी घेतलेला.
आम्हाला पता काय, आम्ही कोणती बला खड़ी करतोय!
आरुमुगमला सांगितलेले, करणी काढायची तर पैसे खर्च करावे लागतील.
त्यात एक कोंबडी, बैदा, हळद, गुलाल, धूप अगरबत्ती, कणीक आणि लिंबू लागेल.
कोंबडीचा नंतर येरिमलई प्रशाद बनवेल, दारू आमची. खुशी खुशी तयार झाला आरुमुगम.
त्याची पनौती सस्त्यात कटणार होती. पैसे घेऊन कांच्याला संध्याकाळी मार्केटला पाठवला.
विडी,सिग्रेटी, सोडा-दारू टेबलखर्चीतून, आपल्याला ताप नव्हता.
पोरांनी लाकूड-पाचोळा पहिल्या मजल्याच्या स्लॅबवर आणून ठेवला. जय्यत तयारी होती.
करणी काढायची म्हणजे साधीसुधी बाब नव्हती.

माल्ट्या ही एक वल्ली आहे.
सुपीक डोके, त्यात बडे खानदान का पोता.
वर मुंबई सर्किटला गाजलेले थिएटर केलेला.
संचार म्हणजे त्याच्या सुपीक डोक्याला आणि अभिनयाला पर्वणी.
रात्री नऊला खोलीच्या मध्यात लाकुड- पाचोळा रचला.
उतार्‍याच्या कामात बाईमाणूस चालत नाही- म्हणून येरिमलईला, साइटपाठी त्यांची झोपडी होती
तिथे नारियल-मसाला बनवायला सांगितले.
मुरगी बळी दिली की चवन्नी ती साफ करून तिला देणार होता. कशी साफ करणार होता माहीत नाही.
कारण चवन्नीकडे फक्त पॅरापीटवर लपवलेल्या हत्यारातला एक चॉपर होता.
मुरगीची गेम करणार होता चवन्नी.

अंधार पडला, झाकणबत्त्या लागल्या तशी माल्ट्याने सुरुवात केली.
आधी कपडे उतरवले आणि इनरवर हातात उदबत्त्या धरून तो खाली साइटच्या टाकीवर गेला. मागे आरुमुगम - नंतर सेना.
कुठलेतरी अगम्य मंत्र उच्चारात माल्ट्याने टाकीत मुटका मारला. आर्किमिडीजच्या नियमाप्रमाणे टाकी बाहेरची पब्लिक चिंब!
टाकीत आवाज घुमवत माल्ट्याने तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओल्या अंगाने बाहेर आला.
चवन्नीने त्याच्या डोक्यावर गुलाल उधळला. माल्ट्या लालमलाल. विश्याने गवताची एक चूड करून पेटवली.
ती घेऊन माल्ट्या पुढे आम्ही मागे. मंत्रात मध्ये-मध्ये शिव्या यथेच्छ पेरलेल्या.
त्या करणी करणार्‍याला आहेत- असे आरुमुगमला पटवले.
पहिल्या मजल्यावर येताच माल्ट्याने जमवलेला फाटा, चुडीने पेटवला. लिंबू समोर ठेवले.
बाजूने हळद, कुंकवाचे सर्कल काढत मान हलवत तो तोंडाने बुगू-बुगू आवाज काढत होता.
अंग अजून ओलेच असल्याने पेटलेल्या कुंडासमोर तो हबशाची शिसवी मूर्ति वाटत होता. ब्युटिफुल ब्लॅक.
आता त्याने भूतांना बोलावत, आणलेली कणीक इथे-तिथे उडवायला सुरुवात केली.
माहौल इतना खतरनाक की, कांचाचे डोळेसुद्धा उघडलेले!
मग संचार सुरू झाला. माल्ट्याचे सगळे अंग थरथरू लागले. तोंडाला फेस आला. बुबुळे गारगोट्या झाली.
आरुमुगम दहशत बसून बघत होता. अचानक माल्ट्या किंकाळ्या फोडू लागला.
साइटवर रात्री भुता-खेतांचा संचार असतो- अशी हवा असल्याने कोणी फिरकणार नव्हतेच. भुते एकदम सेफ होती!

किंकाळी फोडून माल्ट्या धाडकन खाली कोसळला. मग हळूहळू उठला तेव्हा नजर आरुमुगमवर रोखलेली.
'तुम्हारा नाम आरुमुगम... बाप सिलवाराज .... बिबी येरिमलई. तुम्हारा बाप मरा, अम्मा बिमार, भाई खेती करता.
बहन शादी करके गयी. इस में सब अच्छे। एक चाचा खराब। उसका बेटा झगड़ा करता। मैं सब को देख लूँगा।
तुम हर रविवार को येरिमलाई के साथ समुंदर जाना, उसकू नारियल पानी पिलाना,
ठंडा खिलाना, सब ठीक हो जाएगा।' भूताने एकदम सही विलाज दिला.

आरुमुगम थक्क! एव्हढी सही हकीकत माल्ट्या नाही- भूतच देऊ शकणार.
सही हकिकत कांच्याला रोज रूपया देत काढवून घेतलेली.
आता माल्ट्या करणी उतरवू लागला. मुर्गीला हळद-कुंकू फासले.
चवन्नीकडून चॉपर घेतला. आता मुरगी कटणार एव्हढ्यात एक भयंकर किंकाळी फुटली.
कांच्या भेदरून आडवा झालेला.
किंकाळीने दचकलेल्या माल्ट्याच्या हातून मुर्गी सुटली. ती फड-फड करत धूंनीभोवती पळू लागली.
तिच्या मागे आम्ही. मुर्गी पळ-पळ पळाली आणि पीलरच्या बाजूने पॅरापीटवर उतरली.
तिथुन स्ट्रक्चरची एक बीम जिला पुढे सळया होत्या, त्यावर गेली. पार सळीच्या टोकावर जाऊन उभी राहिली.
चवन्नीने बीमवर तोल सांभाळत जायचा ट्राय मारला पण त्याचाच आरया व्हायची वेळ होती.
आम्ही शिव्या घालून मागे खेचला त्याला.
मुर्गी वातकुक्कुटासारखी शिगांवर उभी. मागे खोलीत घुमण्याचा आवाज येऊ लागला.
माल्ट्याची काही नवी आयडिया असावी म्हणत आम्ही मागे धावलो तर माल्ट्या पॅंट चढवत होता.
आणि शेकोटी समोर गुढग्यावर बसुन, डोळे फिरवणार्‍या आरुमुगममध्ये संचार झाला होता!

मुर्गी सलियापे, आरुमुगम में संचार, कांच्या बेहोश और हम सब माल्ट्या को गाली देते रहे.

No comments:

Post a Comment