Sunday, January 10, 2016

३०. गोष्टी सांगणारा माणूस ...


आज ही सांगणं भाग आहे. उद्या या प्रयोगाविषयी...before winding up.
माणूस हा एक जनावर आहे. जनावराच्या सर्व प्रेरणा त्याच्यातही आहेत.
आहार,निद्रा,भय, मैथुन या मुख्य प्रेरणा ‘स्व’ शी निगडीत आहेत.
त्यामुळेच जेव्हा तो स्वत:पुरता विचार करतो तेव्हा तो या पैकी एका भावनेचे चलन असतो.
यांचे शमन करतानाही तो 'स्व' निष्ठ असतो. मात्र या प्रेरणा सहजसिद्ध होण्यासाठी आवश्यक सुरक्षा तो कळपात राहून मिळवतो.
प्राणी हे समूहजीवन जगतात. त्यांत एक प्रकारची सुरक्षा आहे.
ही सुरक्षा मिळवताना त्यातील प्रत्येकाला काही किंमत चुकवावीच लागते.
उदा. कमजोराला बाहेरून होणाऱ्या हल्ल्यात आधी बळी जावे लागते.
तसेच बलवान म्होरक्याला बाहेरून होणारा हल्ला, स्वत: जीवाची बाजी लावून परतवावा लागतो.
समूहातील मादी, सर्वोत्तम आणि सबल नराला प्राप्त होते आणि तिला मात्र कधीही दुसर्याच सबल नराच्या कह्यात जावे लागते.
समुहाचे नियम असतात. ते निमुटपणे पाळणारा या समुहाचा सभासद राहू शकतो.

हे नमनालाच घडाभर तेल यासाठी की जेव्हा आपण माणूस नावाच्या, समुहातच राहणाऱ्या जनावराकडे पाहतो,
तेव्हा हे नियम पार उलटे-पालटे झालेले पाहतो. याला कारण त्याची बुद्धी आहे हे निश्चित.
या बुद्धीने त्याने समाज बांधला, त्याचे नीती-नियम बनवले आणि ते पाळावेत म्हणून बंधने, कायदे-कानून तयार केले.
हे करताना उद्देश हा होता की समूहाचे संकेत सर्वांना मान्यच असावेत- जर कधी एखादा ते तोडेल, तेव्हा कायद्याचा वापर व्हावा.
अशा आदर्श स्थितीत आपण सुरुवात केली असेल- ती आज कुठवर पोहोचली आहे?
तर माझा मित्र बळी पिळया म्हणजे, बळीराज पिळणकर, (याला पण यापुढे सोयीसाठी बळी-पिळयाच म्हणू.)
हा राजवंशात जन्माला आल्याने बळीराजाचे राज्य त्याच्यापुरते आलेले आहे.
बळी-पिळयाचा बाप झेडपीच्या अनेक कमिटयांवर चेयरमन आहे.
चार-दोन हॉटेल्स आहेत वर गॅस एजन्सी. त्यामुळे व्होल जिल्ह्यात त्याची चालते.
असा बळी मला मानतो हे एक आश्चर्यच. म्हणतो-
"यार, कधी काय ट्रबल आला की, तुला फोन लावतो. तेरे पास हर मर्ज की दावा होती हय दोस्त."
कपाळ! याला काय सांगणार वैद्याची गुटी, त्याला स्वत:च्या कामी येत नाही.
पण तो आपल्याला मानतो ही साची बात. म्हणजे आपल्यात पण कायतरी सॉलिड दुर्गुण असणारच!
अशी मी आपली समजूत काढून घेतो.

 "यार तू बाकी एकदम ओके आहेस, सिर्फ एक लफडा आहे तुझ्यात."
"काय तो बळी?"
"तुझा भरोसा देता येत नाय कधी. ठीक असलास, तर किंग जॉर्ज आणि बिनसला तर चंगीजखान ! काय गॅरेण्टी नाय तुझी."
"ती दुनियेत कसलीच मिळत नाय रे. चायनीज मालाचीसुद्धा!"
"बाईची गॅरेण्टी देता येते काय?" बळी थोडा टेन्स दिसला.
"काय येडा आहेस काय? एकवेळ चायनीज मालाची गॅरेन्टी देता येईल!"
"मग काय करायचं, ते सांग!"
"मला आधी वार्ता काय ती अगडम-बगड्म सोडून सांग."
बळीपिळ्याच्या हॉटेलात ही वार्ता सुरू होती, म्हणून त्याने दोन चिकन टीक्के स्टार्टर म्हणून मागवले, आणि पोराला स्टफ सांगितला.
"आज इथूनच जेवून जायचं, मी सांगतो वयनीला."
"नाही, ठीक आहे. तिला कल्पना दिलीय मी." आता वयनी कशाला मध्ये?
मग बळीपिळ्याने त्याची इस्टोरी टाइटल सकट सांगितली.

बळीपिळ्याच्या बापाच्या कुठल्यातरी झेडपी कमिटीतल्या एका सभासदाच्या पोराचं शिकायला गेला तिथे एका पोरीशी जमलं होतं.
पोरगी जरा ‘सभ्भे’ घराण्यातली होती. म्हणजे नावावरून तसं वाटत होतं.
आता या मेंबरचा पोरगा खानदानी असला, तरी सुसंक्रूत कसा दिसायचा?
म्हणून बळीच्या बापाने बळीला जरा ताम-झाममध्ये पोरा सोबत जायला सांगितलं.
बळीने पोरं जमा केली. एक स्कॉर्पिओ बळीची सवारी आणि पाच बुलेटी.
स्कोर्पिओ यायच्या आधी सायलेंसार काढलेल्या बुलेटी यायच्या.
रस्त्यावरचाच काय, दुकाना-हॉटेलातला माणूस पण चमकून बघायचा. कौन जा रहा हय?
अशे पहाटेचे निघाले. बुगुर्र बुग बुग बुग बुग... फाड फाड फाड फाड फटाक फाड फाड... गेले.

पोरीच्या घराजवळ पोचले तेव्हा वाजले होते सकाळचे अकरा.
अचानक तो शांत एरिया फडाडून उठला. लोक बाल्कनी, विंडो मिळेल तिथून पाहू लागले.
पोरीची माय आणि बाप बाल्कनीतून. च्यायला असा जावई पाहिजे! काय आलाय-काय आलाय!
बळीपिळयाचे अग्रदूत बुलेटी स्टँडला लावून धावले. त्यांनी बळीपिळ्याला दरवाजा उघडून कुर्निसात केला.
बळीचा रूबाब असा की जसा खासदारच उतरला. वधुमाय म्हणते, जावईबापू छानच!
मागे ते मरतुकडं डॉक्टर होऊ घातलेलं, बाहेर आलं त्याची कुणालाच पडली नव्हती. सारा शो बळीपिळ्याचा.
पोरीच्या घरात सगळे सेट झाले. पोरीने कायद्याने कांदेपोहे आणले. बळीपिळ्या हलला!
त्याला बच्चन द्यायची होती. घे SSS सुटला तो! साला पोराची मार्केट करायची तर कोण करूच देना त्याला.
सगळे त्याचीच खबर काढतायत. हा ही सुटला.
तुला चाळीस खाटांचं हॉस्पिटल बनवून देतो! बोलला.
लोक खुश दिसत होते- पण मध्येच नवरा मुलगा दाखवला. बोंबला! चेहरेच उतरले ना तिथले.
कुस्ती मारल्याच्या नादात बुलेटी सुटल्या, ते थेट झेडपी ऑफिस. बाप आणि त्याचे चमचे इंतेझार करत होते.
त्यांना दिल्ली काबिज केल्याची खबर दिली आणि सुटले.

पुढे दोन हफ्ते काहीच प्रोग्रेस नाही. पोराचा बाप घायकुतीला. अरे काय कळवलं नाही त्यांनी?
आम्ही काय अड्डम सड्डम आहोत का? एकदम प्रेस्टिजचा सवाल झाला. दोन हफ्त्यांनी पोरीचा फोन.
कुणाला? बळीपिळ्याला! आता बोला!
म्हणते, “ह्याचं माझं जमणार नाही, हे समजलंय मला.”
बळीपिळ्या त्या पोरीला समजावतोय,
“अरे असं करू नको हो! आम्ही काय कमी ठेवणार नाय. सगळं व्यवस्थित करू.” वगैरे.
पण पोरगी ऐकायला मागे ना. पण एक दिवसाआड तिचा फोन बळीपिळ्याला.
तिला समजावताना नाकी नऊ नाही, दहा,वीस बत्तीस आले बळीच्या. त्या पोरीने चक्क नकार दिला हो! कारण???
 ... अता नाय पता! पोराला, बापाला समोर घेतला, काय ते बोल. पोर अळीमिळी. हात तुझ्या!

एक वर्षाने बळीपिळ्याचा बाप पोराची पत्रिका गावभर वाटत होता. सांगत होता सुनबाई डॉक्टर आहे.
लग्नाची आणि चाळीस खाटांच्या हॉस्पिटलची तयारी एकसाथ सुरू. बळीपिळ्या फॉर्मात, कारण टोळीचा नियम.
सरदार एकच असतो. शादी झाली आणि हॉस्पिटल खुललं. ते पोरगं आता त्याच हॉस्पिटलला नोकरीला आहे.
सवाल ये हय की फंडामेंटल कुठे गेलं?

लक्षात घ्या, आपल्या सगळ्या अकलेसकट फंडामेंटल तेच आहे!

No comments:

Post a Comment