“असा एक ही मराठी माणूस नसेल ज्याने कधी तोंडाला रंग फासला नसेल!”
प्राध्यापक नेसवणकर डी.पी.त माझ्या समोर बसत आपले आवडते वाक्य फेकते झाले. संध्याकाळी साडेसातला आपले एक्स्ट्रा लेक्चर आटोपून ते आले होते. त्यांची आवडती स्ट्राँग नेस्कॅफे मागवून आम्ही डॉक्टरची वाट पाहू लागलो. मला आलेल्या रायटर्स ब्लॉकवर सल्ला हवा होता.
“कोण म्हणतो वाईट दिवस आलेत? सगळं चांगलं चाललंय!”
नेसवणकर नेहमी माझ्या विरुद्ध बोलणार!
“अहो ते मराठी निर्माते बोलताहेत… आता तेच बोलणार ना? पैसे लावतात ते!”
“लावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय.पण नाटक म्हणजे सुपर लोट्टो असल्यासारखे लावू नका!”
“म्हणजे काय?” नेसवणकर इकॉनॉमिक्सचे तज्ञ असल्याने मी जिज्ञासू झालो..
“म्हणजे बघ, मराठीतले जे छोटे किंवा नवे निर्माते आहेत ते नाटकाकडे लास-व्हेगासच्या स्लॉट मशिनसारखे बघतात.”
“आणि जुने निर्माते?”
“ते कन्फ़्युज आहेत. वेगवेगळे प्रयोग करुन पाहताहेत, कुठे यश मिळतंय का ते.”
“ आणि तुम्ही म्हणताय सगळ चांगलं चाललंय?”
“अरे कुठल्या ही व्यवसायात असे उतार-चढाव येतच असतात. त्यातून दरवेळी रंगभूमी आपल्या पद्धतीने मार्ग काढती झालीय!”
“आता तिचे मार्ग काढण्याचे मार्ग कसे होते हा प्रश्न अलाहिदा!” आपल्या लॅपटॉपची लेदर बॅग माझ्या बाजूला आदळून डॉक्टरने प्राध्यापकांच्या शेजारी बैठक मारली!
“कधी हीट अँड हॉट मार्ग, कधी ऑर्केस्ट्रा मार्ग, कधी लावणी मार्ग!”
डॉक्टर हे वाक्य कडवटपणे म्हणाला असावा, कारण अजून कॉफी आली नव्हती आणि डॉक्टर कडवट झाला होता.
“सध्या हा मार्ग संतोषच्या घरावरुन जातोय.” मी काहीतरी मार्मिक बोलायचा प्रयत्न केला!
“बोलू नकोस! अजिबात बोलू नकोस!” नेसवणकर खवळले ,
“संतोषने सद्यस्थितित मराठी नाटक जगवलंय!” मी काहीतरी कुत्सित बोललो असा त्यांचा समज दूर करावा म्हणून मी-
“तसं नाही नेसवणकर-” असं काहीतरी बोलतोय तोच ते आणखीच भडकले.
“हेच! हेच कुजकं बोलणं! एक तर मला तू नेसवणकर का म्हणतोस?”
“तुम्ही नेहमी माझ्या विरोधात बोलता म्हणून! मी नागडा, तुम्ही विरुद्ध पार्टी, म्हणजे नेसवणकर!”
“हे असे शब्दच्छल करण्यापेक्षा काही क्रिएटिव कर ना!”
“हो इथे कॉफीच्या वाफा सोडत वल्गना नकोत, काही नाटक-बिटक लिहून दाखव !” डॉक्टरने ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला.
“हे बघ डॉक्टर, एकतर मी संतोष विरोधी मुळीच नाही… त्यात कुठल्याही स्तरावर थिएटर करणार्याला मी आपला मानतो… यात समांतरवाले ही आहेत."
“बघ, पुन्हा कुजके बोल… समांतर हा शब्द तू कोणाला पर्यायी म्हणून वापरतोयस मला कळत नाही काय?”
“का हे वृथा आरोप डॉक्टर ?” मी शून्य तासात प्रश्न उपस्थित करावा तसा निरर्थक झालो,
“नाटकात समांतर आणि व्यावसायिक अशा पोटजाती नाहीत.”
“पण तुम्ही व्यावसायिकवाले तसं समजता ना!”
“मी व्यावसायिक! कधी झालो!?” माझे भान हरपत चालले!
“नाटकाच्या जाती-पोटजाती, भेद वगैरे काय... तुझ्या मते!”
'तुझ्या मते' वर श्लेष देत प्रा. खर्जात.
“माझ्या मते ला महत्व ते काय सर? नेहमी तुमच्या मतांवरुनच तर माझं मत बनवतो मी !”
यावर तिथे प्रचंड गदारोळ माजला! प्रा.आणि डॉ. दोघे ही पिसाळले!
“तुझी मतं ती आमची मतं? काय वेड लागलंय! तुला एक तर मतच नाही आणि असलं तर ते वापरायचा अधिकार नाही! शिवाय तुझी मतं एवढी भिकारचोट आहेत कि तुला कोण शिवाजी मंदिरच्या दारात पण उभा करणार नाही!”
“मला नाही वाटत तिथे लेखकाला उभं करण्याची प्रथा आहे.”
आज मी स्लॉगिंगच करत होतो. या गदारोळातच कॉफी आली.
“सांग, नाटकातला जातिभेद.”
नेसवणकर कॉफी एवढ्या वेगाने स्टिर करत होते कि आत एक भोवरा तयार झाला. त्यात मराठी नाटक जातंय की राहतंय अशी मला भीति,
“चांगलं, बरं किंवा वाईट नाटक असू शकतं, नंतर कळणारं आणि न कळणारं असे भेद येतात. मग चालणारं– न चालणारं आणि शेवटी धंदा करणारं– न करणारं असा भेद येतो.”
“धंदा! शेवटी तू जातिवर गेलास! नाट्य व्यवसाय आणि दारूचा धंदा याना तू एकाच पातळीवर आणतोयस!”
“नाही सर, हा खालच्या पातळीवर जाऊन शब्द वापरतोय, याला काय मी आज ओळखतो?”
कोण कशाचा अर्थ काय काढेल ते काय आपल्या हातात आहे? माझा विचार…अर्थात कॉफी ढवळताना.
“तो जो काय धंदा म्हणतोस, तो तू का नाही करत?”
“कारणं माझा व्यवसाय वेगळा आहे.”
“डीपीत बसून सगळ्यांची करत बसणं…”
“डॉक्टर… तो माझा उपव्यवसाय आहे! त्यावर माझा इगो जगतो. ”
मी प्रामाणिक महर्षि.
“मला माहित्येय स्वत:ला मोठा विद्वान समजतोस तू ! तुझ्या दृष्टीने आम्ही दोघे ही मच्छर आहोत, काय सर?”
“काही नाही! या माणसावर संस्कार झालेले नाहीत.” नेसवणकर हताश.
“स्वत:ला मोठं समजणं आणि इतरांना तुच्छ लेखणं याला दुसरं काय म्हणणार?”
“याला जर संस्कार झालेले नाहीत असं मानलं तर सम्पूर्ण महाराष्ट्र असंस्कृत मानायला लागेल!”
मी पुन्हा गदारोळ माजवला! आज आपली बॅट चालत होती!
“उर्मट शिरोमणी, कॉफीतला राक्षस, रीकामचा हज्जाम.” असे वाक्प्रयोग सुरु झाले.
“आपण इथे कामासाठी जमलोय, सर. मी तुम्हाला इथे भेटायला सांगितलं ते मला कॉफीचे पैसे जास्त झाले होते म्हणून नाही. आणि मी नेमका काय आहे हे तुम्ही दोघांनी ही वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे.. तेव्हा आता मुद्धा?”
“हां तू काय ते फॉर्मचं बोलत होतास…” मी थोडक्यात आणि पुन्हा मला आलेला ब्लॉक सविस्तरला.
“ब्लॉक व्हायला तू काय स्वत:ला तेंडुलकर समजतोस?”
“ते ब्लॉक व्हायचे का नाही ते मला माहीत नाही, पण मला ब्लॉक व्हायचा अधिकार ही नाही हे जरा जास्तच झालं! मी नम्र निषेध नोंदवू ?”
परवानगी घेऊन मी सरळ कॉफी घटाघटा पिऊ लागलो. त्यावेळी प्राध्यापक आणि डॉक्टर मला न कळणार्या भाषेत काही अगम्य बोलत होते.
“सररीअलिझम!” डॉक्टर ने तोडगा दिला.
“मान न मान, तू हा जो विषय मांडणार आहेस तो सररीअलिस्टिक आहे.”
“इथे मानण्या न मानण्याचा प्रश्नच नाही, सरळ- सरळ निर्णय आहे हा!”
“तुझ्यात हा जो उर्मटपणा आहे ना, त्याला हाच फॉर्म शोभेल.” नेसवणकर.
“सर, आपण नाट्य विषयाला काय शोभेल याचा विचार केला तर ते आपल्या गंभीरपणाला शोभेल. पण आपण गंभीर झालो कि विनोदी दिसतो!”
“झालं! फॉर्म सांगितला तर लगेच तलवारी चालवायला लागला.”
“तलवार नाही कुर्हाड, छोट्या वॉशिंग्टनला कुर्हाड मिळाली तर तो ती चौफेर चालवायला लागला!” नेसवणकर,
“मी मला जमतं का पाहत होतो..”
“जमेल! आम्ही कशाला आहोत? आम्ही तुला मार्गदर्शन करु, तुझ्या सार्या प्रसव वेदना सुसह्य करु आणि शेवटी तुझ्या नाटकाचं मढं वर्ल्ड हेरिटेज म्हणून जतन करु…”
“थँक्स, तुम्ही दोघं आहात म्हणून मराठी रंगभूमी अजून धुगधुगी धरुन आहे.”
“तुझ्या नावातच जे वीष आहे ना, त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही.” सर,
“तुला भेटायचं म्हणजे आम्ही घरुन अॅन्टीडोट घेऊनच निघतो.”डॉक्टर.
“तसं नाहीए, कॉफीत वीष असतं ते माझ्या वीषावर उतार्याचं काम करतं. मग नाटक कुठे करु?”
“रस्त्यावर कर!”
“कशाला तुमची संस्था आहे ना?”
“ती रस्त्यावर येईल !”
“चालेल, आपण रस्त्यावरच करु !”
“नको, त्या पेक्षा तू व्यावसायिकला ट्राय कर! त्यांना आण.”
“त्यांना आता सरकारी अनुदान पण आहे. म्हणजे माझं नाटक करताना धुपलं तर सरकार धुपेल!”
मी टाळीसाठी पुढे केलेल्या हाताकडे प्रा. तुच्छतेने आणि डॉ. तिरस्काराने पाहत होते म्हणून मी टेबलावरची माशी मारल्याचा आव आणला. मग्जच्या काळजीने वेटरची धावपळ उडाली.
“मला सांगा नेसवणकर, नक्की प्रॉब्लेम काय झालाय.”
“ कसला?”
“या धंद्याचा?”
“ते नक्की कुणालाच माहीत नाही.”
“हो तुम्ही दोघं सोडून !”
“एका अर्थी ते खरंय. आता मी जे सांगतो ते नीट ऐक, म्हणजे तुझ्या ज्ञानकक्षा विस्तारित होतील! मराठी नाटकाचा प्रॉब्लेम हा आज निर्माण झालेला नाही… त्याचा एकूण परिणाम म्हणून आज चांगली संहिता दुर्मिळ झालीय खरी, पण हा अनेक वर्षांचा बळावलेला रोग आहे.” डॉक्टर.
“म्हणजे कॅन्सर लास्ट स्टेजला जाऊन सिम्पटम्स दाखवतो तसा?”
“हे कॅन्सरपेक्षा वाईट आहे.”
“मग हा रोग बरा करायला डॉक्टर लागेल, नाही, चांगलासा!”
मी डॉक्टरला कचाटयात पकडला.
“तो मी नाही, मी तत्वज्ञानाचा डॉक्टर आहे.”
डॉक्टरने मराठी रंगभूमी क्युअर करायची जबाबदारी झटकली.
“हे दुखणं साधारणपणे सत्तरीच्या दशकात सुरु झालं.”
“काहीतरीच काय, तेव्हा तर चार-चार संस्था दणक्यात प्रयोग आणि दौरे करत होत्या.”
“मान्य. पण नाटकं कोणती होती? तीनच नाटककारांची… अत्रे, दळवी आणि कानेटकर. त्यापैकी दोनच इहलोकी..तिसरा लेखक तयार करायचा कुणी? चांगल्या संस्थांनी वर्षानुवर्षे नव्या संहितांकडे पाहिलंच नाही. नव्या संहिता कपाटात कुजल्या.” सर कदाचित आपला प्रदीर्घ अनुभव सांगत होते!
“दहा वर्षांत लेखकांची एक पिढी संपली.”
“पण दुसरी पिढी तर आलीच ना? शफाअत,संजय, जयंत, प्रशांत, अभिराम, चेतन, त्यांचं काय?”
“तेव्हा वेगळाच प्रकार सुरु झाला. चार-दोन दिग्दर्शक स्वयंभू झाले. त्यांना नाटककाराचा क्राफ़्ट त्रासदायक व्हायला लागला. ते कथा विरहित संहितेची मागणी करायला लागले.”
“मग? मिळाल्या त्यांना तशा संहिता?”
“त्यांनी बराच प्रयत्न केला. कादंबरीकारांपासून न लेखकांपर्यंत संहिता तपासल्या.. काही केल्या. त्याचा परिणाम काय झाला? या स्वयंभू दिग्दर्शकांकडे नाटककारांनी आणि नंतर निर्मात्यांनी पाठ फिरवली. त्यांना अकाली रीटायर्ड केलं. आम्हाला वाटलं होतं की काही काळाने हे एकत्र येतील, पण ते आलेच नाहीत, अज्ञातवासात गेले..”
“म्हणजे नाटककारांच्या एका अख्ख्या पिढीने दखलपात्र लिखाण केलंच नाही?”
“नाही… कारण स्वयंभू दिग्दर्शकांच्या दृष्टीने तो दखलपात्र गुन्हा नसता का झाला?” डॉक्टर.
“त्या बदली आली दिग्द-लेखकांची एक नामी फळी. हे बेसिकली दिग्दर्शक, पण स्वत:ची नाटकं लिहून बसवायचा पायंडा यांनी पाडला. ते तिसर्या पिढीतल्या नाटककारांकडे पाहत ही नव्हते. ती पिढी गर्भातच जळून गेली. हा झाला आपल्याला क्रिएटिव्ह बाजूने लागलेला रोग.” डॉक्टरचा अॅनालिसिस परफेक्ट होता.
“आता आर्थिक बाजूने लागलेला रोग तपासून पाहू.” नेसवणकरांनी इकॉनॉमिक्स सुरु केलं.
“नव्वदच्या दशकात मराठी वाहिन्या सुरु झाल्या. आधी त्या फार नव्हत्या, त्यामुळे त्यांचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम लगेच लक्षात नाही आला. पण दोन-तीन वाहिन्या सक्रिय व्हायला लागल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली, दोन तीन बिझी कलाकारांना घेऊन नाटक करणं यापुढे अशक्य आहे. त्यांच्या एकत्र तारखा मिळत नाहीत आणि शो करण्याची कसरत करावी लागते. त्यात शूटींग्जमुळे दौरे आटोपते घ्यायला लागले. पुन्हा दोन-तीन चांगल्या कलाकारांनी एकत्र काम करावं अशा संहिता दुर्मिळ झाल्याच होत्या. मग नव्या लेखकांवर कसदार नटांची गरज राहणार नाही अशा संहिता निर्माण करायची वेळ आली. नव्या दिग्द-लेखकांनी ती चोख बजावली. अशा प्रकारे मराठी नाटक चांगल्या लेखक, दिग्दर्शक आणि नटांच्या एकत्र येण्याला पारखे झाले. मराठी माणूस एक तर नोस्टॅल्जिक, तो घाणेकर, दुभाषींच्या आठवणी मनात वागवत यायचा, नव्या परिस्थतितलं नाटक पाहून हिरमुसून परत जायचा. त्यापेक्षा घरी बसून पाहिलेल्या सीरीअल्सचा दर्जा जेव्हा त्याला चांगला वाटायला लागला, तेव्हा त्याने थिएटरला येणं बन्द केलं… त्यानंतर मग नव्या दिग्द-लेखकांचा नवा प्रेक्षक तयार झाला आणि तू म्हणतोस तसं त्यांनी मराठी नाटक जगवलं किंवा तगवलं. अशा प्रकारे अभिजात कलाकृतीची अपेक्षा धरणारा प्रेक्षक आणि ती घडवण्याची कुवत असलेले नट, दिग्दर्शक आणि लेखक यांची नाळ एकमेकां पासून आणि मराठी नाटकांपासून तुटली. ती पुन्हा जोडणं केवळ अशक्य आहे. यात नाट्यव्यवसायाची बॅलन्स शीट जी आतबट्टयाची झाली तिला मराठी वर्तमानपत्राच्या जाहिरात दराने पूर्ण नामशेष केलं. आज मराठी नाटकांमुळे जर कुणाचा धंदा होत असेल तर तो फक्त मराठी वृत्तपत्रांचा. नाट्यधंद्याचा सगळा किंवा नसलेला फायदा आज वृत्तपत्र प्रकाशनांकडे जातोय. आणि ज्यांच्यापासून त्यांना अजिबात फायदा होत नाही त्या मालिकांचे सन्मान करण्यात ही प्रकाशनं मग्न आहेत. पुर्वी ही दोनच होती आज पाच आहेत.”
सर आता इकॉनॉमिकल अॅनालिसिस मध्ये मग्न झाले होते. मी कॉफीचे बिल चुकवत परिसंवादाची फिनान्शिअल स्पॉन्सरशिप लीगली पार पाडली.
“आता बिल भरल्यामुळे मी काहीही बोलू शकतो असे मला नम्रपणे वाटते.”
माझी सुरुवात. दोन्ही समंध त्रस्त दिसले.
“नम्रपणे म्हणजे उद्धटपणे?”
“हा ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.”
आम्ही बाहेर निघालो तेव्हा गल्ल्यावर आणि डी.पी.भर आनंदीआनंद पसरलेला दिसला!
“मुद्धा नंबर एक- मराठी नाटक लिहून फक्त अपमान आणि मनस्ताप नशिबी येणार असेल तर नाटक कोण आणि कशाला लिहील? दोन- एका दिवसात गाण्यांच्या किंवा खाण्याच्या मालिकेचं शूटींग करुन दहा प्रयोगांचं मानधन बसल्या मुंबईत मिळवणारा कलाकार थिएटरच्या वाट्याला कशाला जाईल? तीन- गाव तिथे थिएटर अशी संकल्पना नगरपालिकेतले कल्पक लढवत असताना पर युनिट कस्टमर (पक्षी प्रेक्षक) प्रयोग संख्या वाढवायला लागतेय आणि पर शो कस्टमर (पक्षी प्रेक्षक) कमी होतोय, हे गणित कसं बदलणार ? चार- लाखो रुपये कर्जात असलेला व्यवसाय फायद्यात अणण्यासाठी कॉर्पोरेट स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत ते कोण करणार? पाच- बाहेरगावी दौरे आणि कॉन्ट्रैक्ट शो करणारे दर्जावार घाबरलेत, त्यांना सक्रिय कसं करणार? सहा- नवरात्र-गणेशोत्सवातील नाटके बंद झाली आणि नकलांचे (!) प्रयोग रंगले ते शासकीय नियम आणि मंडळांची दिखावटी उत्सवप्रियता कोण बदलणार ? सात-”
मी दरवाजा उघडला.
मी दरवाजा उघडला.
“आता खाशील लाथ! स्वत:ला काय अमर्त्य सेन समजतोयस? उपाय कोण सुचवणार? प्रश्न उभे करुन पळून जाणं ही मराठी माणसाची फार जुनी सवय आहे.” नेसवणकर.
“मराठी माणूस आर्थिक आणि व्यावसायिक डेप्थ असलेले प्रश्न विचारतो का नेसवणकर?”
“तू आम्हाला grossly अण्डर-एस्टिमेट करु नको. एक तर उद्धट वर वर्णभेदी, या माणसावर संस्कार कोणी केले, त्याला पावनखिंडीत गाठला पाहिजे !” डॉक्टर ऑपरेशन टेबलवर व्हावा तसा हिंसक झाला. प्राध्यापक नेसवणकर तर माझ्या नेसत्याला हात घालायच्या विचारात होते.
“ज्याला स्वत:ला काही करता येत नसेल त्याने जे करताहेत त्यांना शहाणपण शिकवू नये. अशा माणसाला भर जिमखान्यावर निर्वस्त्र करुन झोडला पाहिजे.”
नेसवणकर आपल्या नावातला पॅरॉडॉक्स साधू लागले.
नेसवणकर आपल्या नावातला पॅरॉडॉक्स साधू लागले.
“मला काय फरक पडतो ? मी नावानेच नागडा आहे !”
“मग आम्हाला उपाय सांग..” बाटलीतला राक्षस डॉक्टर.
“कॅन्सरला उपाय असतो का डॉक्टर? तरी काही कॅन्सर पेशंट जगतातच ना?”
मी इंजिनमध्ये जान फुंकली.
मी इंजिनमध्ये जान फुंकली.
“लक्षात ठेव, सररीअलिझम! काय?”
“ थँक्स डॉक्टर…” मी क्लच दाबत गिअर टाकला. सर्कलवर वळताना मी विचार करत होतो. अवघड जागी दुखणे आणि तत्वज्ञानी डॉक्टर, यावर उपाय काय ?
- आभास आनंद
आम्ही मराठी- दिवाळी २००६
(हे नाटक कामगार राज्य नाट्यस्पर्धेत त्या वर्षी पहिले आले होते.)
*******
No comments:
Post a Comment