उठ मुला
उठ मुला, उठ मुला बघ हा रात्रोदय झाला
भुकभुकती, जुगजुगती रस्त्यावरती कुत्री किती
काळमिती चकचकती सुस्त सडक ही मंदगती
भरकटते फरफटते, घेऊन स्टेशनला जाते
स्टेशनच्या या वाटेला आपण रात्री बाराला... बघ हा...
धूसरती मिणमिणती , ‘काम सुरु’ची ही बत्ती
ढ्णढ्णता ना चंद्र नभा, इथे दिव्याचा खांब उभा
टेकून त्याच्या पायाला, बिडी पितो स्पेशलवाला.. बघ हा...
धडधडते- खडखडते, प्लॅटफॉर्म हे स्टेशनचे
त्यावरती किरकिरती, कुणी उपाशी कुरकुरती
तरीही कुणाच्या स्वप्नाला रंग गुलाबी आलेला .. बघ हा..
झगमगते, खळखळते स्टेशनवरचे कॅंटीन ते
लाळवती , आळवती , किती भिकारी त्यावरती
मुतारीच्या आडोशाला , तप्त चहाचा हा गाला.. बघ हा..
भकभकती, धगधगती, सीतारामची मैफल ती
त्यात कुणी बाळ गुणी चिलीमीत मारी फुकणी
मध्येच कुणीतरी कोकलला, सीताराम की जय बोला.. बघ हा..
गजबजती, बजबजती, अड्ड्यावरती गर्दी किती
कुणी छोटा ना कुणी मोठा, कुणी लुळा तर कुणी थोटा
सर्व थरांची गर्दी झाली, स्टेशनपाठी अड्ड्याला.. बघ हा..
फसफसती रसरसती, तप्त सूरा ही जळजळती
ही इलाची ती संत्री, इथे जीरा तर चालू ती
लाल शेंदरी रंग उसळला, स्टेशनपाठी अड्ड्याला.. बघ हा..
लांब किती, रुंद किती सुस्त सडक ही मंदगती
भरकटते, फरफटते घराकडे जाण्या निघते
गटरीच्या कोनाड्याला, सोय असे ही निजण्याला.. बघ हा..
- आभास आनंद
- आभास आनंद
No comments:
Post a Comment