Thursday, December 24, 2015

२९. गोष्टी सांगणारा माणूस... आमचे सट्ट्याचे प्रयोग...


आमचे सट्ट्याचे प्रयोग...

सत्यावर सट्टा लावावा अशी परिस्थिति या भारतवर्षात अनेकदा उभी राहते.
सत्याचे दोन तट पडतात. प्रत्येक म्हणतो माझे तेच सत्य, तुझे ते असत्य.
एकाच वेळी सत्याची दोनच नव्हे तर अनेक वर्जन्स घेऊन उभा राहिलेला समाज म्हणजे आम्ही.
ही परिस्थिति बदलायचा जो प्रयोग मी जेव्हा-जेव्हा केला, तेव्हा-तेव्हा माझ्या सत्याचे वरील शीर्षकात रूपांतर झाले.

८० चे दशक असेल. आमच्या एरियात कोणातरी ‘आर’ ला. रीटयर्ड हर्ट नाही, व्यवस्थित जगण्याची हेलपाटी टाकून, ‘राम बोलो.’
आमच्या एरियात आम्ही नामचीन खांदेकरी. पालखीचे भोई असतात तसे आम्ही तिरडीचे ढोई.
आम्हाला हमखास आमंत्रण, फिक्स. ज्या घरात कधी बारशाला, पूजेला, एंगेजमेंट इतकंच काय, लग्नालाही बोलावत नाहीत,
त्यांचे हे एक आमंत्रण फिक्स आम्हाला. बरं ही आमंत्रण कधी काळ-वेळेला?
अर्थात काळ-वेळ बघून जाण्याची पद्धत नाही ना.
रात्री-बेरात्री, दसरा नाही, दिवाळी नाही- कॉल आला की ढोई निघाले.
इतके ट्रेन्ड लोक झालेत, की मयताच्या सामानाच्या दुकानातही समान चेक करून, वाजवून घेतात.
मागचे हिशेब काढून आज भाव घासघीस करतात. त्या दुकानवाल्यांनी पण आता हात टेकलेत.
असो, मुद्दा तो नाही. आज तिरडीवर काढतोय, ते आहे सत्य.

आता तुम्ही विचारलं, शाश्वत सत्य की अशाश्वत वगैरे , तर त्याला काही अर्थ नाही.
सत्य नेहमी कालसापेक्षच असतं.
तर ८० च्या दशकात आमच्या स्मशानात नुकतेच इलेक्ट्रिक क्रिमेटोरियम सुरू झाले होते.
भाव मुदडी-दीडशे रुपये फक्त. तर सवा खंडीचा विषय निघाला, तसे मी पर्याय सुचवला.
फक्त दीडशे रुपये. घ्या सावलतीत आहे. च्यायला जुर्म हो गया.
“लाकडावर दहन ही आमची संस्कृती आहे. ती आम्ही जपणार. इलेक्ट्रिक वगैरे अमेरिकन नखरे आहेत. ते इथे नकोत.”
“अरे, पण एक मुडदा जाळायला लाकडे किती लागतात? म्हणजे झाडांचा- पर्यायाने पर्यावरणाचा नाशच ना?”
“हे तुमचे बुद्धिवादी तत्व तुमच्याकडेच ठेवा. नाहीतर त्यांना जाऊन सांगा, जे जमिनी खराब करतात.
आमची संस्कृती बघा. सारं काही राख होऊन जातं. म्हणजे खराब काहीच नाही.”
“अरे, पण जंगल, झाडे यांचा नाश होतो की. पर्याय नव्हता तिथे आणि तेव्हा ठीकाय.
पण आता सरकारने स्वस्त पर्याय उभा केलाय, तर वापरायला काय हरकत आहे?”
यावर मोठा वाद होऊन मी अधर्मी, धर्मभ्रष्ट, नास्तिक आणि अतिशहाणा ठरलो.
ते दहन रीतसर सवाखण्डीवर झाले. खरे तर सत्य तेव्हा असत्य ठरले म्हणजे, त्या लाकडांवर तेच जळले होते.
पुढे विद्युतदाहिनी नीट वापरात यायला आणखी चार-पाच वर्षे गेली,
आणि दहा वर्षांनी तर , तेव्हा ज्यांनी मला भ्रष्ट, अतिशहाणा ठरवले होते,
त्यांच्या घरातील उत्तरक्रियाही विद्युतदाहिनीवरच झाल्या.
 आता पुरोहितांनी ही पद्धत सशास्त्र धर्मातही आणली आहेच.
थोडक्यात- धर्म म्हणजे कर्मकांडे आणि परंपरा, यांचा एव्हढा झापडी पगडा आपल्यावर आहे,
की त्यात बदल म्हणजे धर्मनाश, असे काही आपल्या डोक्यात रुजते.
यात सत्याचा प्रयोग सट्ट्याचा ठरतो, याचा हा एक अनुभव.
 
असेच एकदा भारत देश आणि त्याच्या महानते विषयी गप्पा सुरू होत्या.
म्हणजे तो भारत नाही, जो १९४७ साली स्वतंत्र झाला, तर तो भारत जो प्रत्येकाच्या कल्पनेत अस्तित्वात आहे.
या चर्चेचे नमुने:

“लंका आणि भारत यांना जोडणारा सेतू आहे. आजही दिसतो. नासाने ही मान्य केलेय, आता बोल!”
“काय बोलू? सेतू होता म्हणून आपल्याच जहाजांना संपूर्ण श्रीलंकेला वळासा घालून मद्रास नाहीतर कलकत्त्याला जावे लागते.”
“जाऊ देत ना! त्यांना लांब पडते म्हणून आम्ही आमची ऐतिहासिक रचना तोडणार नाही.”
“अरे सुवेझ, पनामा असे कालवे झाल्याने समुद्रप्रवास, किती वेळ, श्रम आणि पैसा वाचवतो आहे.”
“तुला शेवटी सेतूवरच घाव घालायचाय ना? हीच अपेक्षा तुझ्याकडून.”
मी तिरडीवर.

“भारत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याकडे एव्हरेस्ट आहे, त्यावर पहिल्यांदा जाणारा तेनसिंग नोर्गे आहे.”
“तो तेंझिंग आहे.” करेक्ट?
“म्हणून काय झालं?”
“अरे तेंझिंग नेपाळी होता. आणि हे जे एव्हरेस्ट म्हणतोयस ना, त्याचा अर्धा भाग नेपाळमध्ये आहे आणि अर्धा चीनमध्ये.
आपल्या हद्दीत एक कण नाहीये.”
“काय बोलतोस!” पूर्ण अविश्वास!
“तुला खूप बरं वाटलं असेल ना? ते भारतात नाही म्हणून?”
हा अस्सल प्रतिवाद झाला. घालशील! घालशील परत वाद?
काढ तिरडी!  

“जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक , ताजमहाल, आपल्याकडे आहे, हे तर मानशील?”
“हे मी का मान्य करू नये? कारण देशील?”
“आता बघ! झटक्यात मानतोय! कारण तो मुसलमानांनी बांधलेला ना!”
नशीब याने तेजोमहालाची स्टोरी ऐकली नाहीये.
“साले हे फुरोगामी असेच! आपल्या कशाचं कौतुकच नाही आणि जरा दुसर्‍याचं दिसलं की डोक्यावर घेऊन नाचा!”
“एक मिनिट, मी कंफ्यूज आहे. मला समजावं जरा. आपलं, दुसर्‍याचं म्हणजे नक्की काय?
इतिहास घडताना त्या लोकांना काय स्वप्न पडलेलं का?
की पुढे असा-असा एक महान देश जन्म घेणार आहे- तेव्हा घडायचं तर त्याच्या हद्दीत घडू या, नाहीतर नकोच ते!”
“म्हणजे? काय म्हणायचंय? स्पष्ट बोल?”
“बघ आपल्या पुराणात वर्णन केलेले कित्येक प्रांत, राज्ये आज बांगलादेशात आणि पाकिस्तान, अफगाणिस्तानात आहेत.
तर आज त्यांचा अभिमान बाळागायचा की नाही?”
“म्हणाजे पाकिस्तान आणि बांगला देशचा?”
“नाही प्राची आणि तक्षशीला वगैरे?”
“का?”
“नाही तुमची परमिशन नसेल तर आपण १५ ऑगस्ट १९४७ पासून नको मानुया त्याचा अभिमान. गांधारचाही नको.”
“आता ते आपल्या देशात नाहीत ना, संपलं!”
“हो पण ते आता दुसर्‍या देशांत आहेत, तर त्यांचा द्वेष करायला (च) हवा का? ते ही सांगा.”
“हा हरामखोर आहे. शब्द गोल-गोल फिरवून फसवतोय.”
“यांच्यामुळेच तर वाट लागली.”
भारताच्या फाळणीत माझा वाटा आहे, हे मला असे समजले. तिरडी!
“मला सांगा, भारताच्या पश्चिमेला काय आहे?”
“अरबी समुद्र”
“का?”
“का म्हणजे काय? आहे म्हणून आहे!”
“पण अरबी समुद्रच का? भारतीय का नाही? साला रोज तुम्ही चौपाटीवर जाता, ते अरबी समुद्र पाहायला?”
माझ्या आता मस्तीच आली होती.
“समुद्राच्या पाण्याची कसली जात पाहतोस? नावात काय आहे? समुद्र तो समुद्र ना?”
इतका सुंदर लॉजिकल विचार करू शकणार्‍या मित्राचा मला हेवा वाटला.
समुद्र –समुद्र, जमीन-जमीन नाही.

“मला एक डाऊट आहे.”
“आता आणखी काय?”
“समजा, भारताचा एक मुस्लिम सैनिक, लढाई करत पाकिस्तानच्या हद्दीत गेला.
खूप पराक्रम केला त्याने, आणि समजा, युद्धात जखमी होऊन पडला त्यांच्या हद्दीत... तर त्याचे प्राण कुणी वाचवायचे?”
“म्हणजे काय? आपले सैनिक जातील आणि वाचवतील!”
“नाही, समजा जबरदस्त शेलिंग सुरू आहे. कोणी जाऊ शकत नाही. त्याचे प्राण आता फक्त देवच वाचवू शकतो. तर..?”
“तुला काय म्हणायचंय? स्पष्ट बोल!”
“नाही म्हणजे, त्याचे प्राण वाचवायचे कोणी?
भारताचा सैनिक आहे म्हणून देवाने की, मुस्लिम आहे, म्हणून अल्लाने?
आपला देव पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन त्या सैनिकाचे प्राण वाचवेल?
की अल्ला, त्याच्या बंद्यांशी युद्ध करणार्‍या काफिराला वाचवेल?”
“तू स्वत: कंफ्यूज आहेस, आणि आम्हा क्लीयरहेड लोकांचा बुद्धिभेद करतोयस!”
“याच्या नादाला लागू नका, हा दुंनियेवरून ओवाळून टाकलेला आहे.”
“कोणी का वाचवेना! तुला काय पडलीय?”
“फक्त तिरडी बांध तू !”

-देव एकच आहे हे शेवटपर्यंत कोणी बोललाच नाही.
तिरडी !

२८. गोष्टी सांगणारा माणूस...ललित कथा


"या माणसाला शिस्त कशी ती नाहीच. वर लाज-शरम सारे कोळून प्यालाय!"
"अष्टभुजे, हा माणूस- नात्याने कोणीतरी लागतो, आपला." लाज-शरम कोळून प्यालेला माणूस, वात नीट करतो.
"कुठल्या मुहूर्तावर या माणसाची गाठ पडली, माहीत नाही. देवा, इथे भेटलाय, वर भेटवू नकोस?" ...
"इथे तरी का भेटवले, माहीत नाही!" ला.श.को.प्या. माणूस फुसुक्.
"काय-काय? मोठ्याने बोल ना! हिम्मत असेल तर!"
"जन्म झाला तेव्हा मी मोठ्याने बोलायचो. अगदी आईसमोरसुद्धा."
"मग पुढे काय झालं?"
"पुढे लग्न झालं."
"आवाजाचं काय झालं?"
"ते कळलंच नाही. बरा होता बिचारा!"
"फालतू जोक! फेसबुकवर टाक तो! इथे नाय हसणार कोण!"
देवीने परफेक्ट पकडला.


अष्टभुजेच्या नात्यात कसलंतरी फंक्शन होतं. तेच, सोन्याने लगडलेल्या म्हशी फिरत असतात, तसलं.
हमखास टाळावी अशी इव्हेंट. मी बॉसला ब्लाइंड लावला. ऑफिसात सीधे नऊ वाजवले.
मुश्किल में काम आनेवाला दोस्त, जगू को साथ लिया, टॅक्सी मारके सीधे ललित.
फोन सायलेंटवर ठेवून अपलवले. तिथूनच प्लान करून जगुलाच इमर्जन्सी वॉर्डमध्ये फेकला,
आणि त्याच्याकडेच झोपलो. नेक्स्ट डे सॅटरडे...

अष्टभुजा मूर्ख नव्हती. ती या केसवर रीसर्च करणारच.
म्हणून फुल सेटिंग केली होती. जगुलाच फोन करून इमर्जन्सी वॉर्डची आणि त्याचीच चौकशी,
पुढचे चोवीस तास कसे क्रिटिकल आहेत, वगैरे करत होतो, तर डिंग-डाँग!
एंटर्ड अष्टभुजेची सहेली फॉर्म गिरगाव! शत्रुपक्ष आला तो थेट किचनमध्ये.
गुप्तवार्ता झाल्या. दोन तासांनी शत्रुपक्ष छद्मी नजर टाकत गेला, तेव्हाच लकाकली होती.
अष्टभुजेने काहीवेळ शांतता राखली. ती अंगावर येऊ लागली म्हणून,
"काय म्हणत होती रेखा?" असा टाकला.

 "जिला-तिला रेखा म्हणू नको! तुला वाटत असली तरी! नीता नांव आहे तिचं."
"अरे वा!"
"अरे रे म्हण! तुझे कालचे ललित लेखन वाचले तिने."
"मग? आता काय इथे समीक्षा करायला आली होती?"
"ती मी करते. रेखा म्हणे! रेखा!!"
साला हा बाण वर्मी बसला वाटतं.
"काय करतो तिचा नवरा हल्ली?" मी हवाबाण हरड़े बदलू घातले.
"ललितमध्ये मॅनेजर आहे."

सन्नाटा...... साला बार बदलायला हवा- एव्हढाच विचार करू शकलो.
पुढे कानात अनेक आवाज आणि डोळ्यांसमोर फिरते नेहरू तारांगण.

जाग आली तेव्हा मी वार्ड नंबर तेरा सर्जिकल.
" पुढचे चोवीस तास क्रिटिकल आहेत.", एक बावा बोलत होता.
"डॉक्टर काहीही करा! त्याला वाचवा! माझं मॅक्विन्टोशचं दुकान आहे हो तो!
तो गेला तर माझं कसं होईल? मी कुणाकडे बघू?"

साला जगू! हा मेलोड्रामा त्याचाच!
अष्टभुजेचे डायलॉग्ज दुसरा कोण मारणार?

Sunday, December 20, 2015

२७. गोष्टी सांगणारा माणूस... टोटका

"बोल कांच्या, ग- ग रेss गुत्त्यातला, म-म रे ss मटक्यातला, भ-भ रे ss"
सळया, विटांनी भरलेल्या कन्स्ट्रक्शन साइटवर नव्याने लागलेल्या कांच्याची माल्ट्या, मराठीची शिकवणी घेत होता.
साइटवर रहायचं तर मराठी यायलाच हवं, नाहीतर उद्या सकाळी काठमांडू! असा दम भरलेला.
ते नेपाळी पोर भेदरलेलं... माल्ट्याच्या ढुसला नाही, मराठीला!
पहिल्याच दिवशी ष क्ष ळ वगैरे उच्चारायला लावून कांचा जेरिस आणलेला.
माल्ट्या एका हाती चार इंची प्लायवुडची पट्टी घेऊन प्रत्येक चुकीला त्याच्या पोटरीवर चपाती काढत होता.
पोर बाप जन्मात मराठी शिकणार नव्हतंच! ते मार खात होतं, नंतर पैशा मिळणार म्हणून.
रोज तीन शब्द आणि एक जोडाक्षर बोलला की त्याला रूपया मिळायचा. तो रुपया जपून ठेवायचा.
त्याला पैसे मिळत होते ते रात्री साइटचा पोरांना मुक्त वापर करू देण्यासाठी.
मग तेलाचे झाकणदिवे लावून कुठे फोर-एट फिल्ड लागे. कुठे मैफल. दुनियेला ताप नाय, मेंढीचा खतरा नाय की रेडची डर नाय.
एकेका टायमाला तीन-तीन फिल्ड सेट व्हायची. टेबलच दोन-तीन हजार निघायचं.
त्या दिवशी पौर्णिमा होती, म्हणून आरुमुगमला संचार दिसणार होता.
आरुमुगम साइटवर बिगारी, त्याला शक, त्याच्या बायकोवर, येरिमलईवर कोणी करणी केलीय.
त्यावर उपाय करायचा तर माल्ट्याला केस हिस्टरी माहीत हवी, म्हणून कांच्याला हाताशी घेतलेला.
आम्हाला पता काय, आम्ही कोणती बला खड़ी करतोय!
आरुमुगमला सांगितलेले, करणी काढायची तर पैसे खर्च करावे लागतील.
त्यात एक कोंबडी, बैदा, हळद, गुलाल, धूप अगरबत्ती, कणीक आणि लिंबू लागेल.
कोंबडीचा नंतर येरिमलई प्रशाद बनवेल, दारू आमची. खुशी खुशी तयार झाला आरुमुगम.
त्याची पनौती सस्त्यात कटणार होती. पैसे घेऊन कांच्याला संध्याकाळी मार्केटला पाठवला.
विडी,सिग्रेटी, सोडा-दारू टेबलखर्चीतून, आपल्याला ताप नव्हता.
पोरांनी लाकूड-पाचोळा पहिल्या मजल्याच्या स्लॅबवर आणून ठेवला. जय्यत तयारी होती.
करणी काढायची म्हणजे साधीसुधी बाब नव्हती.

माल्ट्या ही एक वल्ली आहे.
सुपीक डोके, त्यात बडे खानदान का पोता.
वर मुंबई सर्किटला गाजलेले थिएटर केलेला.
संचार म्हणजे त्याच्या सुपीक डोक्याला आणि अभिनयाला पर्वणी.
रात्री नऊला खोलीच्या मध्यात लाकुड- पाचोळा रचला.
उतार्‍याच्या कामात बाईमाणूस चालत नाही- म्हणून येरिमलईला, साइटपाठी त्यांची झोपडी होती
तिथे नारियल-मसाला बनवायला सांगितले.
मुरगी बळी दिली की चवन्नी ती साफ करून तिला देणार होता. कशी साफ करणार होता माहीत नाही.
कारण चवन्नीकडे फक्त पॅरापीटवर लपवलेल्या हत्यारातला एक चॉपर होता.
मुरगीची गेम करणार होता चवन्नी.

अंधार पडला, झाकणबत्त्या लागल्या तशी माल्ट्याने सुरुवात केली.
आधी कपडे उतरवले आणि इनरवर हातात उदबत्त्या धरून तो खाली साइटच्या टाकीवर गेला. मागे आरुमुगम - नंतर सेना.
कुठलेतरी अगम्य मंत्र उच्चारात माल्ट्याने टाकीत मुटका मारला. आर्किमिडीजच्या नियमाप्रमाणे टाकी बाहेरची पब्लिक चिंब!
टाकीत आवाज घुमवत माल्ट्याने तीन डुबक्या मारल्या आणि तसाच ओल्या अंगाने बाहेर आला.
चवन्नीने त्याच्या डोक्यावर गुलाल उधळला. माल्ट्या लालमलाल. विश्याने गवताची एक चूड करून पेटवली.
ती घेऊन माल्ट्या पुढे आम्ही मागे. मंत्रात मध्ये-मध्ये शिव्या यथेच्छ पेरलेल्या.
त्या करणी करणार्‍याला आहेत- असे आरुमुगमला पटवले.
पहिल्या मजल्यावर येताच माल्ट्याने जमवलेला फाटा, चुडीने पेटवला. लिंबू समोर ठेवले.
बाजूने हळद, कुंकवाचे सर्कल काढत मान हलवत तो तोंडाने बुगू-बुगू आवाज काढत होता.
अंग अजून ओलेच असल्याने पेटलेल्या कुंडासमोर तो हबशाची शिसवी मूर्ति वाटत होता. ब्युटिफुल ब्लॅक.
आता त्याने भूतांना बोलावत, आणलेली कणीक इथे-तिथे उडवायला सुरुवात केली.
माहौल इतना खतरनाक की, कांचाचे डोळेसुद्धा उघडलेले!
मग संचार सुरू झाला. माल्ट्याचे सगळे अंग थरथरू लागले. तोंडाला फेस आला. बुबुळे गारगोट्या झाली.
आरुमुगम दहशत बसून बघत होता. अचानक माल्ट्या किंकाळ्या फोडू लागला.
साइटवर रात्री भुता-खेतांचा संचार असतो- अशी हवा असल्याने कोणी फिरकणार नव्हतेच. भुते एकदम सेफ होती!

किंकाळी फोडून माल्ट्या धाडकन खाली कोसळला. मग हळूहळू उठला तेव्हा नजर आरुमुगमवर रोखलेली.
'तुम्हारा नाम आरुमुगम... बाप सिलवाराज .... बिबी येरिमलई. तुम्हारा बाप मरा, अम्मा बिमार, भाई खेती करता.
बहन शादी करके गयी. इस में सब अच्छे। एक चाचा खराब। उसका बेटा झगड़ा करता। मैं सब को देख लूँगा।
तुम हर रविवार को येरिमलाई के साथ समुंदर जाना, उसकू नारियल पानी पिलाना,
ठंडा खिलाना, सब ठीक हो जाएगा।' भूताने एकदम सही विलाज दिला.

आरुमुगम थक्क! एव्हढी सही हकीकत माल्ट्या नाही- भूतच देऊ शकणार.
सही हकिकत कांच्याला रोज रूपया देत काढवून घेतलेली.
आता माल्ट्या करणी उतरवू लागला. मुर्गीला हळद-कुंकू फासले.
चवन्नीकडून चॉपर घेतला. आता मुरगी कटणार एव्हढ्यात एक भयंकर किंकाळी फुटली.
कांच्या भेदरून आडवा झालेला.
किंकाळीने दचकलेल्या माल्ट्याच्या हातून मुर्गी सुटली. ती फड-फड करत धूंनीभोवती पळू लागली.
तिच्या मागे आम्ही. मुर्गी पळ-पळ पळाली आणि पीलरच्या बाजूने पॅरापीटवर उतरली.
तिथुन स्ट्रक्चरची एक बीम जिला पुढे सळया होत्या, त्यावर गेली. पार सळीच्या टोकावर जाऊन उभी राहिली.
चवन्नीने बीमवर तोल सांभाळत जायचा ट्राय मारला पण त्याचाच आरया व्हायची वेळ होती.
आम्ही शिव्या घालून मागे खेचला त्याला.
मुर्गी वातकुक्कुटासारखी शिगांवर उभी. मागे खोलीत घुमण्याचा आवाज येऊ लागला.
माल्ट्याची काही नवी आयडिया असावी म्हणत आम्ही मागे धावलो तर माल्ट्या पॅंट चढवत होता.
आणि शेकोटी समोर गुढग्यावर बसुन, डोळे फिरवणार्‍या आरुमुगममध्ये संचार झाला होता!

मुर्गी सलियापे, आरुमुगम में संचार, कांच्या बेहोश और हम सब माल्ट्या को गाली देते रहे.

२६. गोष्टी सांगणारा माणूस...एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

एका भग्नाची..भाग -2 अर्थात,

भग्न तळयाकाठी...

फेड इन-
पुलियापे कावळा, चिमणी आणि बाज़ आमने-सामने, खंदकात सेना, बारूद के साथ-
पलिकडे नामधारी रणगाडे, बांबू होविट्ज़र तोफा... आणि बटकी खंदकात फळीला आय-माय वरून शिव्या देतोय.
समोरचा सीन हलत नाय, हे पाहून वकिलने कॉमेंट्री सुरू केली-

" स्लो मोशन में बाज़ कौऐ को - बाज की ये बात थोडीसी ऑफ़ स्टंपपे के बाहर और बाहर की तरफ.
जाती हुई, कौएने छेड़ने की कोशिश की, भाग्यशाली रहे, थोबड़े का बाहरी किनारा नहीं फूटा,
बाज ने छोड़ दिया- कोई रन नहीं."

इतक्यात छ: फ़ीट बाज़ने आपले विशाल बाहू पसरले आणि कौव्याला मगरमिठीत घेतले.
"और ये अफ़जल ने सिवा को बीच पुलिया दबोच लिया! सिवाकी पसलिया तोड़नेकी कोशिश,
सीवा परिंदे की तरह फड़फड़ाता हुआ, और ये आउट!"
प्लग काढ़ायला लागला वकीलचा!
"कौवा, वाघनख काढ! कौवा वाघनख काढ!!" मॅक ओरडत होता. सिवा कुठे ऐकतोय. तो फडफडतोय!
तोवर "फायर!!" असे ओरडून काबाने ढेकळे फेकायला सुरुवात केली!
ती पुलावर आसपास पडून बंबार्डींग झाल्याचा फील आला.
होविट्झर तोफा आता लुंगी आणि बांबू सावरत पुलाकडे धावू लागल्या.
"भाग कौवा भाग!!" आमचे कौव्याला इशारे- पण हे काय!?
बाज़ आणि कौवा आम्हाला हात करून बोलवताहेत.
साले हसतायत! मग सेना काय फुकट बोलावलीय?
आम्ही मजबूत ढेकळे फेकून पुलावर कोहरा मचवून दिला.
नामधारीचे पैलवान आधी पोहोचले, पण कौवा सेफ होता. आम्ही खंदक सोडले आणि पुलावर पोहोचलो.

"अरे, ऐसे राड़ा नहीं कराते, दोस्तों। अब जो हुवा सो हुवा, मगर मानता हूँ आप लोगों को!"
बाज़ जावयावर खुश होता की आम्ही दिलेल्या फाइटवर , माहीत नाही, पण त्याने काबाला मिठी मारली.
नशीब काबा पाठमोरा नव्हता!
तोच पलिकडून टेंशन ढोलक घेऊन आला. त्याने पुलियावरच वाजवायला सुरुवात केली.
कौवा-चिमणी मध्ये आणि आम्ही बाजूने फेर धरला.
नामधारीचे पैलवान ऑफ बीट टाळ्या वाजवत होते, म्हणून मॅक ने त्यांना नाचायला खेचले.
आता ती धुडं ऑफबीट नाचू लागली.
"आवरी मोटी SSS" पासून काय वाटेल ते गायलो! वरात घरी नेली.
कर्नलीण बाय साफ दारं-खिडक्या बंद करून कानाला हिमालय लावून झोपलेल्या!
आज त्या बाज़ला घरात झोपायला घेणार नाहीत- हे फिक्स झाले.

चिमणीला भेटायला बाज़ला बंदी.
सकाळी गच्चीत कपडे वाळत घालायला चिमणी आणि बाय समोरासमोर आल्या की चेहरे वाकडे करायची कॉम्पिटिशन!
त्यात अर्थात चिमणी जिंकायची.
तिने पृथ्वीला अॅक्टिंग कोर्स केला होता, म्हणजे बोला!
बाज़ नाक्यावर आमच्याकडून चिमणीची खबर काढायचा.
चिमणीला काय पडलेली नव्हती.
असा महिना गेला.
मग चिमणी आणि बाय एकमेकींना चोरून भेटतात अशी खबर नाक्यावर आली.
बाज़नेच आणली.
खबर खरी होती- कारण कौवा अचानक पुलियावर यायचाच बंद!
कुठे दिसला की गल्ली बादलायचा. ही बेईमानी!!
एकदा मॅकने सोमावाण्याकडे रंगेहात पकडला त्याला.
एक हात में थैली दुसरे में यादी! बाराच्या भावात पोहोचला होता कौवा.
तीन महीने गेले, मी घसा धरला म्हणून काणे डॉक्टरकडे गेलो, तर बाहेर ही SS रांग.
रांगेत कौवा. चेहरा मायूस, दुनियेची उदासी घेऊन.
“साला कौवा, तुला काय कावळा शिवला, की तीन महीने नाक्यावर पत्ता नाय तुझा?”
कौव्याने मला बाजूला घेतला-
“यार नाग्या, तुला म्हणून सांगतो- कुठे बोलू नको..” ही कौव्याची नेहमीची स्टाइल.
कुठे बोलू नको, करत दुनियेला सांगेल.
“अरे कौव्याचा चिमणा करायचा फुल प्लान तयार आहे.
माझ्या ज्या-ज्या सवयी बाय ना पटत नायत त्या-त्या बंद!
नाका बंद, विल्स बंद, लाईफबॉय बंद, मच्छी बंद, बियर बंद, फटी जीन पहनना बंद,
दाढी साफ पायजे. भांचो लिपस्टिक लावायची बाकी ठेवलीय मला!
साला मी कोणाला पटवलीय, चिमणीला की बायला, टोटल नाय रे मला!”
कौवा भडाभडा बोलत होता. तीन महिन्याची भडास निकालत होता.
“तू बाज़ला बोल ना! तो तर आपली पार्टी आहे ना?” मी
“अरे बोललो त्याला. तो म्हणतो काही उपयोग नाहीत, माझ्यावर पण सेम ट्रीटमेंट केली होती बाय ने!”
मी खल्लास!
हल्ली कौवा सफेद तलावाच्या भिंतीवर सफेद लिबासमध्ये देवदास सारखा बसून असतो.

ते तळेही आता भग्न झाले आहे.

२५. गोष्टी सांगणारा माणूस ... एका भग्नाची गोष्ट...

एका भग्नाची गोष्ट...

लोक लग्न का करतात?
करतात तर करतात, पण त्यात आपले दोस्त स्टेकला का लावतात?
आमच्या दोस्ताच्या मनात तशी चिमणी भरायचं काही कारण नव्हतं.
तो काही चिमणा नव्हता... आम्ही त्याला कावळा म्हणायचो.
आता कावळ्याने चिमणीशी रिश्ता करायचे ठरवले,
मुख्य म्हणजे चिमणीही राजी झाली, त्याला कोण काय करणार? क़ाज़ी बी पॅक!
म्हणतात ना, जवानी की नज़र- दीमाग बेअसर, अशी वार्ता झाली.
सुख-दु:ख में साथ निभने का वादा किए यार, एकसाथ दोस्त के लिये शहीद होने चले.

कावळ्याने, चिमणीच्या बापाकडे केलेली अर्जी खारीज हो गयी.
"दुंनियेतला कुठलापण मच्छर आण, पण हा कावळा नको."
चिमणीचा बाप कर्नल, पब्लिक टरकून त्याला. बॉर्डरवर मशिनगन चालवलेला माणूस. आता
रिटायर होऊन, नामधारीच्या आखाड्यावर घुमत असतो.
सोबत आकडेबाज मिशांचे दोन-तीन महाराज घेऊन फिरतो.
कावळा, खीशातले पाकीट, बेल्ट आणि बुटांसकट चाळीस किलो.
त्याचे घर चिमणीच्या बरोब्बर समोर, त्यामुळे त्याच्या रोज़ाना लीला पाहून
कर्नलसायबीणीने त्याची किंमत ऑलरेडी दो कौड़ी केलेली.

चिमणीने बापाचा गोल करायचा ट्राय मारला पण,
“रिश्ते में हम तुम्हारे बाप होते है, नाम है बाज़!” असे आपल्या आकडेबाज़ मिशांना पिळत बाज़.
चिमणी इमोशनल, 'बाज़ की पर्मिशन बगैर रिश्ता नई हो सकता!'
गँगचे एकत्रित वजन नामधारीच्या महाराजांपेक्षा चौतीस किलोने कमी.

“हे लोक आपली हड्डी चरकात घालून रस काढतील.” घंसा टरकलेला.
“यांना मारायला रणगाडा बोलवावा लागेल.” युद्धखोर काबा.
“रणगाडा नको ए काबा, तू नुसता तोफ करून उभा राहिलास, तरी दाणादाण उडेल.”
काबाने युद्धात पाठ दाखवली की तुम्ही मेलात! अस्सल बारूद उडवतो!
“यार कौवा, सोडून दे रे, चिमणी-बिमणी. नायतर नाक्यावर आपले हुतात्मा स्मारक.”

पण कौवा साला आम्हालाच इमो देत होता. एकदम जीव द्यायच्या गोष्टी.
मग दीमागवाला म्हणून पब्लिक मला वरवंटा घासायला अर्ज़ करू लागली.
गुरिल्ला वॉर ! गनिमी कावा पर्याय निघाला.
चिमणीने रोज दोन दोन ड्रेस पाटलांच्या प्रेसवर टाकायचे, तिथून थेट कावळ्याकडे!
ड्रेसिंग टेबल, मैत्रिणींनी उधारीत साफ केले. थेट कावळा.
वह्या-पुस्तके, नोटस- बापजन्मात अभ्यास न करणार्‍या पोरांनी ‘काढायला’ नेल्या.
घंसाचा दोस्त बांद्रा रजिस्ट्रार ऑफिसला होता. ती सेटिंग झाली.

सकाळी चिमणी उठून कॉलेजला निघाली , तिथून थेट रजिस्ट्रार ऑफिस!
सेफ साईड म्हणून एका हवालदारालाच विटनेस केला.
चिमणी आयुष्याची परीक्षा पास झाली. कावळा तर पार धंद्याला लागला.
चिमणी रडेल म्हणून मी बघत होतो, पण तिची रोज़ाना भंकस सुरू होती.
थेट सिद्धीविनायकाची फिरकी घेत होती,
म्हणे, “कावळा म्हणून वरलाय, त्याचा चिमणा करू नकोस रे SS बाबा!”
पण तिचा प्लान तोच होता. कावळ्याचे रिइन्कार्नेशन.
सिद्धिविनायकाला पटवून टॅक्श्या मारल्या ते थेट कॉलनी.
तिथे बाज़सोबत नामधारीचे महाराज हातात बांबू घेऊन उभे.
आम्हाला दुरून पॅटर्न टँकसारखे दिसले.

समोर रस्ता खणला होता, पुलाचे काम सुरू होते. आम्ही पटापट खंदकात.
दोनच रस्ते होते, 'भागी नाख ना ते फोडी नाख!'
ढेकळांचा बारूद घेऊन तयार होतो. ‘फायर!’ के इंतज़ार में.
कावळा- चिमणीना हातात हार देऊन पुढे केले. दोघे पुलिया क्रॉसवर थांबले.
ऑपोजिट पार्टीतून बाज़ पुढे झाला. आम्ही श्वास रोखून... हातात ढेकळे.
त्या टोकाला नामधारीचे पैलवान.
बाज- कावळा- चिमणी, आमने-सामने. क्या बोल रहे है? सस्पेन्स....
काड ! एकच आवाज झाला....

साला, बटकी खड्ड्यात !
खड्ड्यातून दिसत नाय म्हणून फळीवर उभ्या बटकीच्या वजनाने फळीच तुटली.
बाज़ आणि कावळा अॅट निगोसिएशन. चिमणी अंगठ्याचे नेलपॉलिश ताकती...
आम्ही खंदकात, ढेकळांनी नेम धरून...

ब्लॅकआऊट.....