दुपारी भरपूर हुंदडून आणि खा-खा खाऊन झाल्यावर झोपलेलं माझ्या मेहुण्याचं पोरगं, अचानक किंचाळत उठलं, “मी अण्णा- मी अण्णा !” आम्ही बेडरूमकडे धावलो.
“काय झालं बेटा अक्षू ? स्वप्न पडलं का ?” मेहुणा.
बेटा अक्षू काय ऐकायला तयार नव्हता !
“माला टोपी आणून दे ! मी अण्णा !”
आता पोराला टोपी कुठली हवी विचारल्यावर ते टीव्ही कडे बोट दाखवायला लागलं .
“तश्शी पायजे ...”
“पोराला न्यूज -मॅनिया झालाय ! घाबरू नको .” मेहुण्याच्या चेहर्याला मी रीलीफ दिला.
“पन्नास रुपयात उतरेल.” करत आम्ही चपला सरकवल्या... नाक्यावर आलो.
“आव सेट !” गिजुभाई ( गुज्जूभाई ) माव्यात हसला.
“आमाला सेट करून जबरा सेटिंग केली तुमी लोकांनी !” मी गिजूला टोलावला.
“काय बोलते , सेट !” गिजू सेटिंग तोडायला तयार नव्हता !
“कस्टमर तो भगवान असते. बोला काय शेवा करू आमी ?”
“गांधी टोपी हवी होती एक !” मराठी किरकोळी !
“एकच ! मने लाग्या बे – त्रण दर्जन घेतो तुमी !”
गिजूने दारी आलेल्या ग्राहकाला आधी त्याची जागा, साखर पेरत दाखवली !
“किती ?” माझा मराठी सावध पवित्रा.
“पयले पसंद करा.. पैसा कुटे जाते ?”
“ते त्याच्यावर मी अण्णा असं लिहिलेलं आहे ती आहे का तुमच्याकडे ?” मेहुण्याने आपटी खाल्ली.
“एकदम हाय ! अरे बाबू , ते अण्णावाली टोपी दाखव !” अण्णावाली टोपी हाजिर झाली.
पोराच्या डोक्याच्या (?) अंदाजाने मेहुण्याने टोपी सिलेक्ट केली.
“किती ?”
“ हे टोपी प्योर खादीचा हाय. वर हे अण्णा ब्रॅंड हाय. याचा जास्त नाय घेते, दोनसे एकदम फायनल !”
“दोनशे !? गिज्जुभाय पन्नासला मिळते न ही ?”
“मिळायची ! आता बाजाराला मालच नाय धा दिवस ! आणि हे लिवलाय ना, मी अन्ना , त्याचे दोनसे !”
“ हे मी अण्णा लिहिले नसेल तर किती ?”
“तसा टोपीच नाय भेटत ! सब टोपी अण्णा !”
“काय करायचं ?”
“चल ! पोराला कागदाची करून देऊ !” मी .
मेहुणा ट्रान्समध्ये... समोर लाडकं, एकुलतं आणि जिद्दी पोर. वर याची लाखांची कमाई ...
“घेऊन टाकूया..” भ्रष्टाचारावर ठो-ठो लाल होणार्या मेहुण्याने पाकीट काढले.
“आता सेट, आमी काय जास्त नाय घेते तुमच्याकडून ! मुदलावर काय दस –बीस सुटते तेवडाच!”
माव्याने ओशाळ हसत आम्हाला कापले.
आम्ही बाहेर पडू लागलो तशी,
“झेण्डा नाय पायजे, तिरंगा ? गेटअप कंपलिट होएल !”
“आणि तुझा सेटअप !” मी मनात ...
“एकच साइज हाय … पाचसे !”
“आता नको , मगं बघू ! पोरगं कोमात गेलं तर घेऊ !” मी सटकेश !
“बगा, मर्जी ... पण मालाचा काय भरोसा नाय सेट .. स्टाक खत्म जाला काय भेटायचा नाय .”
आम्हाला उपकार केल्यासारखी वॉर्निंग देत गिजू दुसर्या ग्राहकाकडे वळला.
भ्रष्टाचाराची नेमकी व्याख्या काय ? मी भ्रष्ट- गिजू भ्रष्ट- माल लपवणारा स्टॉकिस्ट भ्रष्ट – की आंदोलनाचा मास हिस्टेरिया निर्माण करणारा मीडिया भ्रष्ट ? की वेड्यागत बाजारात एकाद्या गोष्टीची मागणी निर्माण करणारा समाज ?
“साला पंतप्रधानाने दोनशेला खड्ड्यात घातला मला !” मेहुण्याचा एकतर्फी निष्कर्ष. जगातला सगळा भ्रष्टाचार संसदेत निर्माण होतो ही खात्री आणि लोकपाल बिल हे त्यावर हमखास सोल्युशन !
वाटेत आमच्या एरियातल्या लोकांनी मोर्चा काढला होता. सगळे एकजात टोपी आणि तिरंगेधारी ! अण्णाजी तुम आगे बढो ...”
मोर्चाचे नेतृत्व नगरसेवकाकडे ... हा सोसायटीचे दोन वर्षांचे सगळे देणे थकवून आहे. चाळीत रहायचा आता एक करोडचा फ्लॅट आहे. त्याच्या मागे सोसायटीचे सभासद .. यांच्यावर अफरातफरीचे आरोप आहेत... डोक्यावर टोपी .. मी अण्णा !
“साला हे सरकार एक नंबर चोर आहे !” मागे सेक्रेटरी मला म्हणाला होता. म्हणजे आमच्या सोसायटीचा पैसा बहुतेक याच्या आडून मनमोहनसिंगांनी खाल्ला असावा ! मी अण्णा- मी अण्णा !
मीडिया नावाचा रोग जडलाय सध्या या देशाला ! पंचवीस- तीस वर्षांची पोरं बकताहेत ,
पंतप्रधान चोर – सीबीआय लाचार , पोलिस बघे आणि न्यायव्यवस्था बेकार ! पुढे जाऊन घटना बेकार !
“अण्णा देवमाणूस ! त्याच्या हेतुवर शंका घेता ! ? साले बकवास बुद्धिजीवी !” आमच्या इथल्या समाजसेवकाने मला डब्यात घातला !
“या असल्या भंकस लोकांमुळे देशाची वाट लागली !”
गदारोळ इतका होता की तो 100 % बरोबर आणि मी 100% चूक हा ठराव मांडायची ही गरज नव्हती ! नुकताच “आरक्षण” विरोधी मोर्चा याच माणसाने काढला होता, पिक्चर न बघता!
“साला लोकपाल आणा ! सगळे आत जातील एका झटक्यात !”
“बरं ... मगं देश कोणी चालवायचा ?”
“शुद्ध माणसांनी, नॉन करप्ट लोकांनी !” उत्तर तयार होते. आमच्या सोसायटीतला प्रत्येक फ्लॅट 30-40% ब्लॅक देऊन घेणारे तार स्वरात किंचाळत होते. मी अण्णा- मी अण्णा !
ते “शुद्ध” लोक आणायचे कुठून हा प्रश्न नव्हताच ! एकदा का 545 जणांना घरी (की तुरुंगात?) पाठवले की काम होणार होते. अण्णानी परवा टीव्हीवर सांगितले की राज्यसभेत ही सगळे चोर आहेत ! म्हणजे आणखी 245 जण तुरुंगात ! शासन स्वच्छ ! भ्रष्टाचार खत्म ! इतका सोपा मार्ग असताना सरदार झोपा काढतोय !
आज आपल्या घरात सगळे सामान बिला शिवाय येते. अगदी सोन्यापासून कपड्यांपर्यंत बिल वाचून पहा, वर लिहिलेय ‘इस्टिमेट मेमो’ व्यापारी ओरडतायत, “मी अण्णा ! मी अण्णा !”
ऑफिस मध्ये काम टाळणारे, दुसर्यावर ढकलणारे, महत्वाचे काम आले की दांडया मारणारे धावतायत रस्त्यावर, “मी अण्णा ! मी अण्णा !”
मतदान न करता त्या दिवशी सुटी घेऊन , वेळ आली की स्थानिक आमदार, खासदाराकडे “चिठ्ठ्या “ घ्यायला धावून मुला/ मुलीला चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवून देणारे , त्या साठी डोनेशनरूपी दान अर्पण करणारे कोकलतायत , “मी अण्णा ! मी अण्णा !”
पासपोर्ट ऑफिस , पोलिस वेरीफिकेशन , विसा , एन ओ सी सगळीकडे पैसे देणारे आणि घेणारे , सगळेच !
पासपोर्ट ऑफिस , पोलिस वेरीफिकेशन , विसा , एन ओ सी सगळीकडे पैसे देणारे आणि घेणारे , सगळेच !
पोरगं शिकून बाहेर पडलं की त्याच्या नोकरीसाठी “ओळखी” काढून कुणाचातरी हक्क डावलंणारे छाती फुगवतायत, “मी अण्णा! मी अण्णा!”
सार्वजनिक पैशांवर दोन महीने नाष्टापाणी ओरपणारे बेभान झालेत, “मी अण्णा! मी अण्णा!”
.... “मी अन्ना ! मी अन्ना !” माझं मन ओरडलं की काय म्हणून दचकून मी भानावर ....मेहुण्याचं पोरगं डोक्यावर ब्रांडेड टोपी घालून बेडवर नाचत होतं.. मेहुणा दोनशे रुपयांच्या कौतुकाने त्याच्याकडे पाहत होता.
“तुम्ही सगळे असाल बाबांनो अण्णा ! मी नाही ! लोकपाल आलेच... तर कदाचित मी आत असेन 545 + 245 लोकांसोबत !”
..लोक उगीच नाही मला सर्किट म्हणतात !