लग्न म्हटलं की
माझी फाटते. “लोक लग्न का करतात?” इथपासून, “ लग्न हा
एक कृत्रिम प्रकार आहे.” इथपर्यंत अनेक विचारवंतांनी, अर्थात स्वत: लग्न करून आपापली
मतं मांडलेली आहेत. पण, ज्या वयात “लग्न कोणाशी करावे?” इथपासून, “ही बरी दिसते!” इथपर्यंत विचार
माझ्या मनात यावेत, त्या
वयातच एक असा प्रकार घडला की मी लग्न या प्रकाराचा धसकाच घेतला “किती ही
जणींवर प्रेम करीन, पण लग्न अजिबात करणार नाही !” असा कठोर निर्धार मी केला. त्याला कारण सुध्दा झालं
एक लग्नच. या लग्नाने मला लग्न या प्रकाराचाच नॉशिआ आला. या लग्ना नंतर पुढे वर्ष दीड वर्ष मला, घरी लग्नाची पत्रिका घेऊन आलेला माणूस , हा दारी वॉरन्ट घेऊन आलेला
पोलिस असे वाटून मी मागल्या
दाराने सटकायचो.
एखादी मुलगी रस्त्यात आडवी आली, तरी मी
वेडा किंवा चकणा असल्याचं नाटक करून त्या मुली पासून स्वत:ला वाचवत असे.
पुढे मला खरोखरीचे वेड लागलं आणि मी
यथासांग लग्न केलं.
ऐंशी सालच्या
आसपास एका गुलाबी रविवारच्या सकाळी हे लग्न माझ्यावर कोसळलं. मस्तपैकी बिछान्यात लोळत होतो, तोच दारात एक सायलेन्सर
बिघडल्याने फाटाक्यासारखे आवाज करणारी स्कूटर येऊन थांबली.
ही स्कूटर व्होल बोरीवलीमध्ये तेव्हा, नार्याची फटफटी म्हणून प्रसिध्द होती. सकाळी सातलाच नार्या माझ्या दारात? मी खिडकीतून पाहिलं नार्या स्कूटर स्टॅण्डला
लावायचा आटोकाट प्रयत्न करत होता.
स्कूटर होकायंत्रासारखी उत्तर
दक्षिण करत होती. शेवटी मोठया मुश्किलीने स्कूटरचे सुकाणू स्थिर करून नार्या
माझ्या समोर आला. मी, “काय नार्या , आज सकाळीच?” असा सवाल करताच नार्या सुटला आणि
शेवटी-
“तर हे असं कॉन्ट्रॅक्ट आहे.” नार्याने
माझ्याकडे आशाळभूतपणे पाहिलं.
माझी एव्हाना नालच गेली होती. एकतर नार्याने मला न विचारता हा घोळ घालून
ठेवला होता आणि आता तो मी निस्तरावा म्हणून त्याने सेटींग चालवलं होतं.
“भोसडीच्या !
तुला ही नसती आफत ओढवून घ्यायला कोणी सांगितलं होतं?” मी नार्याला हिंट दिली.
“बरं घेतलीस ती घेतलीस, वर त्यात माझी मुंडी कशाला
अडकवतोस?”
“सॉरी यार दादू-”
नुकत्याच लागलेल्या चष्म्याच्या वरून केविलवाणेपणाने माझ्याकडे पाहत नार्या शरण आला.
“अरे कोणीच तयार नाही. काय करू
रे , मीच
फसलोय, हे
कॉन्ट्रॅक्ट घेऊन. प्लीज यार, काहीतरी कर !”
नार्याचा
बोरिवलीमध्ये मंडप, डेकोरेटर्सचा धंदा आहे. तो हे कॉन्ट्रॅक्ट
घेऊन बसला होता, आणि त्यातले लाऊड स्पीकर, साऊंडसर्विस वगैरे, मी सांभाळावे म्हणून तो
मला गळ घालत होता. नार्या अडला होता
त्याला कारणही तसंच होतं. दहिसर धोबीघाट हा भागच त्यावेळी तसा होता. ज्या भागात कॉन्ट्रॅक्ट घ्यायला भलेभले तयार झाले
नसते, तिथे नार्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन बसला होता.
मी पण नाहीच म्हणणार होतो. पण नार्या पडतो दोस्त आणि दोस्ती आपला
वीक पॉइण्ट.
“यार , दिवसाचे हजार रूपये देतो हवंतर. पण
एवढी वेळ निभावून ने बाबा.”
“हे बघ , मला तुझ्या हजार रूपयांची
पडलेली नाय! काय? पण
तू फसलायस तर बघतो. विचार करतो.”
“विचार कसला करतोस?” माझ्या डोक्याकडे साशंकपणे पाहत
नार्या ओरडला, “तयारी
कर! आज रात्रीच सामान पोहोचव.” नार्या हातात आलेला चान्स सोडायला तयार नव्हता.
“काय नाय रे , फक्त रेकॉर्डस् लावायच्या दोन
दिवस.”
“दोन दिवस!” आता कुठे मला धोका
जाणवला, “काय वेड लगलंय?”
“ए बाबा दादू , आता उंगल्या करू नको! एवढी वेळ
निभावून ने”
दादूचे दिवस खराब होते. दादू हो म्हणाला.
दहिसर धोबीघाट . त्यावेळी मुंबईची हद्द दहिसरला
जिथे संपायची ना, तिथेच हे लग्न होतं. दोन दिवस कॉन्ट्रॅक्ट होतं. एक दिवस जेवणाचा आणि दुसरा लग्नाचा. नार्याने जरी त्याच दिवशी
सामान पोहोचवायला सांगितलं होतं तरी त्या दिवशी काही मी तिथे गेलोच नाही. म्हटलं उद्या
सकाळीच जाऊ. माझा दोस्त अजय करू ,माझ्या साथीला असायचा
म्हणून त्याला बोलावून घेतलं. करूने काय काम आहे ते ऐकलं आणि माझ्याकडे खुन्नस दिली.
“ एक तर तुम्ही मरा ! आणि वर
आम्हालाही पोचवा !” पण शेवटी किती झालं तरी करू पडतो दोस्त. आणि दोस्ती आपला वीक
पॉइन्ट. करेल काय ? चार
शिव्या घालेल. आणि येईल झक मारत.
“म्हणजे तू येणार नाहीस?” माझी रोकडी .
“भोसडीच्या! तू मेलास तर
वहिनींना सांगायला नको कोणतरी, कुठे मेलास ते?” करू ब्लाइंड आला. मी हसलो तशा करूने आणखी तीन-चार
शिव्या घातल्या. करू शिव्या देतोय म्हणजे येणार. “आला!” म्हणत मी करूला विल्स दिली . विल्स पेटली आणि करू थंड
झाला.
या लग्नाचे आम्ही हे जे टेन्शन घेत होतो त्याला कारणही तसंच होतं. ज्या समाजातलं लग्न होतं त्या समाजात लग्न म्हणजे राडा! लग्नात राडा झाला नाही तर ते लग्न फेल! आणि
लग्नात जितकं भांडणं जास्त तितकं ते लग्न जास्त यशस्वी असा त्यांचा समज असतो.
आणि म्हणूनच शहाणे लोक अशा लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट घेत नाहीत मी घेतलं होतं…
सकाळी करू वेळेवर आला. देवासमोर जशी कायम
उदबत्ती असते तशी करूच्या हातात विल्स अखंड जळत असते. मी तयारच होतो
म्हटलं,
“उदबत्ती आहेच ना, चार आण्याचा हार मागव, बाकी मी बघतो.”
करूला राख देऊन मी ऍम्प्लिफायर
काढला. करू वायर्स, भोंगा, रेकॉर्डस् वगैरे घेऊन
लोड झाला आणि दोघं निघालो. बोरिवली आणि दहिसर यांच्या मधून दहिसर नदी वाहते. ही बहुदा कोरडीच
असते पावसाळ्यात जरासं पाणी असतं, तेव्हा कधीकधी पूरही भयंकर येतो. अगदी घरादारात पाणी
शिरतं. पण एरव्ही ही नदी कोरडी
ठणठणीत असते. लग्न नदीच्या पलिकडे, मुंबईची हद्द तेव्हा जिथे
संपायची तिथे होतं. आम्ही नदीच्या कोरड्या पात्रातून उतरलो. विल्सचे धुरांडे हवेत सोडत, एकाद्या
वाफेच्या बोटीसारखा करू नदीच्या कोरडया पात्रातून जात होता. मात्र या बोटीच्या
तोंडात भोंग्या ऐवजी शिव्या होत्या.
“दादू , भ्यांचोद, भैयांचे वाढदिवस! केक बघ किती!”
शेवटी मी आणि करू सर्व सामानासह तिथे पोहोचलो. नदीच्या काठीच मंडप
घातलेला. मी पहिल्यांदा विचारलं, “नार्या कुठे आहे?”
नार्या शाणा कौआ. एक दिवस आधीच मंडप वगैरे बांधून नार्या पसार. नार्या सूम निघाला. साऊंड सर्विससाठी म्हणून मला दोन्ही दिवस तिथे थांबणं भाग होतं.
म्हणजे मंडप आणि साऊंड दोन्हीची
जबाबदारी माझ्यावर टाकून नार्याने कलटी खाल्ली होती.
“दादू , लफडा!” करू मंडपाकडे पाहत
विल्सच्या रिंग्ज सोडत बोलला.
मी ही समजून गेलो. इथे
लाइटसचं कनेक्शनच नव्हतं. कारण ना धड मुंबई ना धड ठाणे
जिल्हा. त्यांना वीजेचं कनेक्शनच नव्हतं. आता
आला का वांदा!
“करू! भडव्या डोकं घास! काय
करायचं?”
“नदीच्या पलिकडून केबल टाकून
कनेक्शन घ्यायला लागेल” करू जज! त्याने जजमेंट दिली. तोच
दोन चार बाप्ये पुढे झाले.
“या जी ! या जी ! आरं
लाऊसपिक्चरवालं आल्याती रं
!”
आम्ही कामाला सुरूवात केली. करूने सुरूंग लावल्यागत नदी पलिकडून लांबच लांब केबल टाकून सप्लाय घेतला. आमची कामगिरी बघायला
पाच-पंचवीस पोरं पोरी आणि तितकेच बाप्ये, उद्योग
नसल्यामुळे उभे राहिले. करू केबल टाकायला आणि भोंगा बांधायला मंडपाच्या बांबूंवर चढत होता. डोंबार्याचा खेळ पहावा
तसे सारे करूच्या लीला पाहत होते. ते पाहून करूच्या पुन्हा शिव्या सुरू झाल्या.
“भ्यांचोद ह्या नार्याच्या!
मंडप बांधतो का घरटं ? हे
बांबू मयताला वापरले तर तिरडी धनुष्यासारखी वाकेल!”
“करू ! डर मत ! पडलास तर नदीतच
पडशील.” मी
“अरे,
पण नदीत पाणी असेल तर ना. आता तू मूत म्हणजे नदीला पूर येईल.” करूने वरून राख दिली.
मी मनापासून हसलो. करूने
भोंगा बांधला आणि खाली जंप मारली. पोरांनी टाळ्या मारल्या.
त्यावर करू,
“टाळ्या कसल्या मारता रे
भोसडीच्यांनो!? बाप
चढलेला काय कधी?” करू करपला का काहीही बोलतो. त्यावर पोरं खिदळली.
तोच एक बाप्या आमाच्यासाठी ‘च्या’ घेऊन आला. करूने लगेच -
“पहिल्या धारेची आहे काय?” असा सवाल केला.
बाप्ये मनापासून हसले. करू जिथे जाईल तिथे तिथल्या लोकांच्या भाषेत बोलतो.
“गुळाची है रे चा भौ?” करूने दुसरा गुगली टाकला.
“न्हाई जी. गुळाची तिकडं जाळीत !”
बाप्याने माहिती पुरवली. आम्ही ‘च्या’
पीली. अहो एवढी आपुलकी चांगल्या-चांगल्या घरचे
लोकसुध्दा दाखवत नाहीत.
आमचं काम झालं. मी सनईची एलपी घेतली आणि प्लेयरवर चढवली. सनईच्या सूरांनी माहौल बदलायचा ट्राय मारला. मंगल वातावरण
निर्माण झालं. थोडयाच वेळात जंगल
में मंगल होणार आहे, हे मला कुठे माहीत होतं. आता पाहुणे मंडळी यायला सुरूवात झाली होती. पांढर्या टोप्या येत
होत्या. कोल्हापुरी वहाणा येत होत्या. सफेद सदरे ,लेंगे येत होते. मळकट अनुभवी मुंडाशी
येत होती. जाड सफेद आकडे बाज
मिशा येत होत्या. काठपदरी साडया ल्यालेल्या, पाचवारी लेकी आणि नऊवारी माय येत
होत्या. कपाळाला गोंदवण, आणि लाल चंद्रकोर
रेखलेल्या बाया. कुणी काळ्या मण्यांचे
जाड मंगळसूत्र घातलं होतं तर कुणी चांदीचे , वरून
सोन्याचे पाणी दिलेले साजच चढवले. होते सगळयांच्या गळ्यातले मणी असे मजबूत का धन्याच्या
बेवडयाला धोकाच नाय. हिरव्या बांगडया तर बहुतेकींनी
कोपरापर्यंत चढवलेल्या. मुलींना स्पेशल निळ्या, पिवळ्या किंवा पिवळ्या लाल फुलांचे डिझाइन्स असलेले फ्रॉक्स. पोपटी रिबिनी. गळ्यात प्लास्टिकच्या
माळा. पोरांना फुलपॅन्टी. शर्टस् बहुतेक दोन किंवा तीन कापडांच्या जोडाचे, रस्त्यावर मिळणारे.
आज हौशीचं लगीन काडलंया बबनरावानं.
त्याची धाकली म्हंजी बगा स्हावी ल्येक . आधीच्या तिघी बी उजिवल्या. मदी दोन प्वारं. हा काशा आन् दगडू. न्हान आस्ताना त्येला देवी आल्या म्हून दगडू नाव ठेवल्यालं. शेवटाला हौशी. येकडाव हौशी उजिवली का बबनराव सुटले.
टेन्शनच मिटलं का बबनरावांचं. तसं त्यांनी कधी टेन्शन घेतलं नव्हतचं म्हणा. ते येऊ नये म्हणून ते पास्कलच्या अड्ड्यावर नेमाने
कार्ड पंच मारायचे. मिलमदी नेमानं खाडे. सारं टेन्शन
असलंच तर बबनरावांच्या कारभारनीला ,काशीबायला. काशीबाय मजबूत
बाई. फाटेला लोकांची धुनी-भांडी,
मग दुपारच्याला इद्यामंदीर साळेभायेर चिचा बोरं इकायची, सांच्याला पुन्हा
बाजारला. भाजीपाला इकूनशानी, काशीबाई घरला येस्तोर आट वाजायचं. घरला येऊन ह्या
भाकर्या बडवायच्या. राबता योक आन खानारं आट. इक्त सारं
करून सवरून हौशीच्या लग्नाची बबनरावांना काय पडल्यालीच नाय ! सकाळला चाय-विडी आणि सांच्याला पास्कलची
जीरा सुटली काय बबनराव सातवे आसमान पे. काशीबाय बगायचीच नाय, असला-नसला नवरा सारकाच. शेवटी तिनेच मोठया हिकमतीने ही सोयरिक जुळवून आणलेली. नवरा बगा भैणीच्या मेवणीच्या रिश्त्यातला. चांगला कमावता है. भायखळ्याला मालट्रकावर कामाला म्हणजे बास की! बबनरावापेक्षा ठीकच. निदान दोघांचं प्वाट भरू शकत होता. आसंल बेवडा पीत तर काय झालं? बबनराव
नाय पीत! दारूने
का कधी संसार बुडतात?
आजचा दिवस लग्नाच्या जेवणाचा. त्यांच्यात आदल्या दिवशी वर्हाडाला जेवण घालायची प्रथा होती. आमची त्याला काहीच हरकत नव्हती. हरकत घेऊन करणार काय? जेवण तयार
होऊ लागलं. मांडवात गर्दी जमली. भिम्या, तुक्या, सक्या. मंडळींची खलबतं सुरू होती. थोड्या वेळाने अख्ख्या मांडवालाच पंढरपुरी वास यायला लागला. करूने तेवढयात
चार-पाच बाप्यांना पकडून गोळ्या लावल्या आणि-
“आत्ता कसलंच टेन्शन नाय, दादू! गोळी लावलीय! किक् आली तर नदी जवळच आहे!”
करू इतका डायरेक्ट कोणच नाय.
इकडे एल.पी., आर.डी. वगैरे मंडळी लग्न साजरं करत
होती. थोड्या वेळाने खलबतवाल्या
मंडळींची बोलणी यशस्वी झाली आणि मंडळी दोन-चार करून पांगली. जेवण तयार झालं. मटणाचा मसाला हवेत
पसरला. आम्हाला भूक लागली होती, पण जेवणाला
सुरूवातच होत नव्हती. कशी होणार? मांडवात कुणाचा पत्ताच नाय. दीड वाजून गेला. पोटातले कावळे मेले. नंतर एक-एक बाप्या यायला
लागला. आलेले बाप्ये चांगल्या चालीचे नव्हते. बहुतेकांची चाल बिघडलेली. पहिल्या धारेचा माल बहुतेकांच्या घशाखाली चांगला उतरलेला. त्यातली एक पांढरी
टोपी मंडपात शिरली आणि मंडपाची लांबी रुंदी मोजत थेट माझ्याकडे आली.
“ ओए विलेट्रिवालं! ह्ये पिरपिरं बंद करा राव.”
तो तिसरीकडेच बघत बोलत होता.
“न्हाईतरी लाऊसपिक्चर बंद करा.”
“ऑं! अहो लग्नाची वेळ आहे चांगली
सनई लावलेली आहे-” माझा मुद्दा.
“न्हाई !
अजाबात बंद!” भौ मुद्यावरून गुद्दयावर आला.
“म्हणजे रेकॉर्ड बंद करू?”
“न्हाई,
लावा. पर्मिशण है. पन पिरपिरं बंद!”
“अहो मग काय लावू?”
“याराणा! याराणा मंगताय!
मंगताय-मंगताय!”
यारानाची तबकडी आणि सफेद टोपीची
दुनिया, एकदम फिरायला लागली. ‘सारा जमाना’ वर त्याने जो नाच
केला, तो अमिताभने पाह्यला असता; त्याचा राजेश खन्ना झाला असता.
एवढयात आणखी एक बाप्या माझ्या दिशेने सरकला. तोवर पहिली पंगत बसायची तयारी सुरू झाली होती. ताटं वगैरे मांडून
होताच बाप्ये सरसावून पुढे झाले. मग थोडी झुंबड उडली. काहीना बसायला मिळालं,
काहींना नाही ,पंगत फुल. इथे माझ्याकडे
आलेल्या बाप्याने फर्माइश दिली-
“ इच्या एैले डान लाव ना भौ !”
हा भौ खास ठेवणीतला होता. आलिया भोगासी, म्हणत मी डॉनची एलपी
काढली आणि फिरत्या तबकडीवर चढवणारच होतो…एवढयात एक अख्खे ऍल्युमिनिअमचे ताट, त्यावरच्या जेवण, वाटयां सकट, एखाद्या उडत्या तबकडी सारखं भिरभिरत गेलं, आणि मांडवाच्या
बाबूंवर आदळलं. जोरदार खडखडाट झाला आणि
त्यातले पदार्थ माझ्या डोळयांदेखत
मातीमोल झाले.
पहिल्या पंगतीत बसायचा मान मिळाला नाही, त्याचा अपमान झाला होता आणि पोटातल्या नवसागराने घात केला होता. समोर आपला दुश्मन
पहिल्या पंगतीत बसलेला पाहून त्याची नालच
गेली आणि सरळ दुश्मनाच्या समोर वाढलेले ताट उचलून त्याने भिरकावून दिलं. मी चकित होऊन
पाहिलं, मंडपभर ताटं - वाटयांची एकच
फेकाफेक सुरू झाली होती. लॉरेल- हार्डीच्या
पिक्चरमधल्या केक फाइट सारखी ताटं हवेत भिरभिरत होती. सर्व जण एकमेकावर
ताटं, पेले, वाटया,
काय मिळेल ते फेकून मारत
होती. मांडवभर एकच खणखणाट मध्येच कोणतरी, “शिवाजी महाराज की जय !” असं ही ओरडला. एकजण पावन खिंडीत सापडला. त्याच्या डोक्यावर अख्खी
सागुतीची वाटी उपडी झाली, वर भाताचं डेकोरेशन. डोळ्यात मसाला गेल्याने तो डोळे चोळत ओरडत श्या देत होता. एका म्हातार्याला पाण्याचा
जग लागला. तो जग सोडल्यागत गपगार पडून होता. झालं काय, जेवणावळ बसताना, “ पहिल्या पंगतीचा मान कुणाचा?”
यावरून वाद सुरू झाला आणि बाप्ये पिसाटले. ज्याना जागा मिळाली
नव्हती ते बसलेल्या बाप्यांना खेचून उठवत
होते. बसलेले सतरंजी पकडून जाम उठायला मागत नव्हते. शेवटी एक लाल
मुंडासेवाला, ज्याला भरघोस झुपकेदार मिशा आणि
बुजुर्ग म्हणून बर्यापैकी मान होता, असा बाप्या मध्ये पडला कणखर आवाजात त्याने
दम दिला,
“ह्ये झोंबाट बंद करायले भौ! का
मांडव उठिवतो?” सगळे
एकदम चित्रासारखे स्तब्ध. लाल मुंडाश्याने
दोन्ही पक्षाच्या लोकांना एकत्र जमवलं. पानांची वाटणी करून दिली,
हिकडं तुमची इक्ती. आणि भांडण मिटलं. मी मात्र वैतागलोच होतो.
तीन वाजत आले होते. पोटात आग. सकाळी च्या दिली तेवढीच,
नंतर काय नाय. मी हळूच मांडवा बाहेर जायचा प्रयत्न केला.
एका बाप्याने मला हेरलं.
“कुठिसा चालला रे भौ?”
“नाही, जरा चहा पिऊन येतो.”
“हिथच बनिवली है रे च्या भौ!
जायाचं न्हाई.”
“अहो, जेवण राहिलंय माझं जरा जेवतो
आणि येतो.”
“ज्येवा की हिथंच! लै ठेसदार
सागुती है.”
ती ठेसदार सागुती , मांडवभर विखुरलेली…
“अहो पण नको, घरीच जाऊन येतो”
“शाप जायाचं न्हाई! काय बी मागा, हिथंच द्येतो. पर जायाचं न्हाई.”
त्याचं आपलं एकच पालुपद “ जायाचं न्हाई.”
कोण मला हलूच देईना. विखुरलेलं अन्न पाहून माझी भूक मेलीच होती. इतक्यात समोरुन जळती विल्स आणि
तिच्या मागून करू आला. तो जेवून आलेला!
“ए दादू! मांडवात बघ भाताची रांगोळी काढलीय !”
“हो! आता वर मटणातल्या नळयांच्या
मेणबत्त्या लावायच्यात.”
मी करूकडे सर्व ताबा दिला , मांडवातून
बाहेर पडलो आणि समोर दिसलेल्या पहिल्या हॉटेलात जेवलो. तिथून सरळ घरी.
संध्याकाळी पुन्हा मी
कुरूक्षेत्रावर प्रकटलो सर्व ठीकठाक होते करू म्हणाला,
“एवढयात वरात
येईल. वरातीच्या ताशात रेकॉर्डी कशाला?”
मी धोका ओळखला करू कलटी खायच्या
बेतात होता.
“करू! कुठे बसूबिसू नको रे बाबा! नायतर मी एकटा पडेन”
“बसतो कसला? इथे वासानेच लागलीय!”
आता वाजंत्री जवळ यायला लागली. आधी पोरं आणि मग बाप्ये मंडळी नाचू लागली वरात म्हणजे एक घोळका समोरून नाचत
येत होता. पुढे वाजंत्री आणि त्यांच्या समोर तोच! ‘सारा जमाना’! या घोळक्यात नवरदेवाला पाहून घ्यावं म्हणून मी पुढे
झालो
“करू! अरे घोडा कुठेय?” नवरा दिसावा म्हणून मी विचारलं.
“गाढवाखाली असेल!” करू
“भंकस नको रे!”
“आता घोडा कशाला?”
“ गाढव दिसावा म्हणून!” मी जवाब
ठोकला
“बघायचाय?मग घरी जा आणि आरशात बघ!
कॉन्ट्रॅक्ट घेतोय!” करूने रागाने
विल्स पायाखाली तुडवली.
वरात पुढे आली. नाचणारे जरा बाजूला झाल्यावर मला नवरदेव दिसला. सुरवार आणि झब्बा. डोक्यावर टोपी आणि त्या टोपी पासून संपूर्ण चेहरा झाकून टाकणारा सेहरा. या मुंडावळ्यांमुळे
नवरदेवाला समोरचं काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्याला त्याचं वाहन हाकता येत नव्हतं. दुल्हेराजा एका काळ्याशार... सायकलवर बसला होता ! रीकिबीत ठेवावे तसे त्याने दोन्ही पाय सायकलच्या पॅडलवर ठेवले होते. पण तो पॅडल मारतच
नव्हता. त्याची सायकल दोन जण दोन्ही बाजूने धरून ढकलत होते. त्यांच्या
नवसागरमुळे ती मध्येच तिरपी तिरपी होत
होती. सायकलचा स्टॅण्ड मध्येच लागल्यासारखा वाटला म्हणून मी पाहिलं. तो स्टॅण्ड नव्हता… सायकल
वर रुबाबात बसलेल्या नवरदेवाच्या कमरेला, एक दीड हात लांब
तलवार, तिच्या म्यानासकट लटकत होती!
मग इतर बरेच विधी झाले. लोकं भन्नाट नाचत होते. लग्नाला रंग भरला होता. लेकी -माय लगाबगा लगाबगा इथे तिथे
करत होत्या. मी खुश. चला अजून काय गडबड नाहीए. पण शांतता, भारत
पाक युध्दबंदी इतकीच टिकली. एका कोपर्यात विहिणबाई रुसल्या. त्यांच्या मानपानात काही उणे पडले असावे. माय-लेकी त्यांची समजुत काढायला धावल्या. तोच दुसर्या कोपर्यात एकाने श्या द्यायला सुरूवात केली. त्याची समजूत काढायला कोणीच जात नव्हतं. त्यामुळे त्याच्या रागाला दिशा सापडत नव्हती. म्हणून तो हवेत श्या देत होता. मी मिनिटभर त्याला
न्याहाळलं. तोच विहिणबाईंनी जमलेल्या बायकांना लेक्चर सुरू केलं. “आपण माला ओळखणं असंभव हाए. त्यामुळे ते अशक्य हाए.” त्या हाय
लँग्वेजचा परिणाम म्हणून त्या बाया पदर तोंडावर धरून खुसूखुसू करत होत्या. तोच एक बाप्या
धुण्याची काठी आडवी व्हावी तसा आडवा झाला. मी तिकडे पहातोय तोच एक अख्खा
पाण्याने भरलेला तांब्या, माझ्या डोक्यावरून पलिकडे गेला आणि समोरच्या ऍम्प्लिफायरवर दाणकन आदळला. आता मात्र मी पूर्ण
हादरलो शंभर वॉटचा तो शिकागो ऍम्प्लिफायर, ते
धूड नाराज तर होणार नाही ना? अशी भीति मला वाटली. न जाणो, ते यंत्र बंद पडलं तर पुढे काय? ‘सारा जमाना’ बंद पडताच संपूर्ण वर्हाडी मंडळी, नवरदेवासकट माझ्यावर तुटून पडण्याची शक्यता होती. मी ऍम्प्लिफायरला
प्रेमाने थोपटलं म्हटलं, “बाबा एवढी वेळ निभावून ने.” तो ही बेटा खाल्ल्या वीजेला जागला. त्या नंतर रात्रभर
त्याने आणि पिऊन टेर झालेल्या वर्हाडाने काही गडबड केली नाही. मीही थकलो होतो नऊ साडे नऊला सारं आवरायला घेतलं. तोच दोन चार बाप्ये
प्रकटले.
“कुटं निगाले राव? बसा आक्षी” काय करतो,
बसलो.
“मिशिन नेऊ नगस सायबा.” एकाने वायर्सची पिशवी काढून घेतली.
मशिन तिथे ठेवायचं म्हणजे संपलंच. वास्तविक सर्व सामान घेऊन निघण्या आधी, करू म्हणाला होता,
“तेल लावत गेले ते हज्जार रुपये! आता वटूया, ते पुन्हा येतोय कशाला?”
पण प्लान फसला. आम्ही पकडले गेलो. नाइलाजाने सर्व सामान आणि त्या सोबत अर्धा जीव एका झोपडीत ठेवून आम्ही
घरी निघालो. वाटेत करूने माझी आय माय काढली.
“भडव्या! पुलावर भीक माग, पण असली कॉन्ट्रॅक्ट घेऊ नको!
उद्या हे लोक पुस्पी नायतर गंगीशी लग्न लावतील तुझं जबरदस्ती! बायको
तर बायको,
वर धुण्या-भांड्याला बाई नको!” करूचा भेजा रात्री आठ नंतर जबरा
चालतो.
दुसरा दिवस लग्नाचा आम्ही जीवावरच मंडपात पोहोचलो. पहिल्यांदा सामान चेक केलं. सारं जाग्यावर होतं. पुन्हा जोडणी
केली. करू चतुर त्याने याराणा प्लेअरवर चढवली. सारे खुश! रेकॉर्ड लागली की मांडवातली
पन्नास एक लहान पोरं एकदम चावी दिल्यासारखी मांडवभर उधळायची. ही पळापळ ! गाणं संपलं की त्यांची चावी संपायची. नवं गाणं लागलं की
पुन्हा चावी. ती एकमेकांना पकडत होती, पाडत होती
आणि रेकॉडच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तोंडून , “भिश्युम! भिश्युम!” चं बॉलीवूड पेटण्ट! आज वातावरण तसं बरं
होतं. बहुतेक कालचे सर्व अजून उठलेच नसावेत. कारण अजून मोगरा फुलला नव्हता. जेवणंही व्यवस्थित पार पडली. करू म्हणाला,
“भ्यांचोद! यांच्यात लग्नाच्या दिवशी ड्राय डे असतो.” आम्हीही बाहेरच जेवून घेतलं.
जरा विश्रांती घेतली. बरं वाटलं.
संध्याकाळी पुन्हा कालचाच प्रकार.
सायकल वरून नवर्याला देवळात नेलं
आणि आणलं. मंडपाच्या दारात त्याची नजर
काढली. नारळ ओवाळून फोडला. मग विधी सुरू झाले. लग्नाचा मेन आयटम
रात्री सर्वात शेवटी होता. आता गाणी थांबली होती
आणि माइक वरुन-
“गणप्या शिरपा, सव्वादोन रुपये! साहेबराव दुधे, तीन रुपये!”
अशा घोषणा सुरू होत्या ज्याचे नाव जाहीर व्हायचे तो मोठया रूबाबात सगळीकडे
नजर टाकत खाली यायचा, इथे तिथे पाहून हळुच बाहेर सटकायचा!
हळुहळू सारा मांडव, बाप्यांच्या निर्गमनाने वसाड झाला. अनेक जण अक्षरश:
दशदिशांना पांगले. मग पुन्हा गाणी आणि त्यावर पोरांची पळापळ सुरू झाली. मांडवात लग्नाला फक्त पोरंसोरं, लेकी
सुना आणि म्हातारे. अहेर म्हणून तांब्याच्या कळशा आणि पितळेच्या टाक्या एका कोपर्यात रचलेल्या. सुट-बुटाचा संपूर्ण
लग्नात पत्ताच नव्हता.
शर्ट पॅन्टमध्ये करूच त्यातल्या त्यात पॉश दिसत होता.
“क्या बात है करू! एकदम हीरो
बनुन आलायस? हौशीला
पटवणार काय?”
“हौशी वटली ! आता हौशीची आई पटली
तर बघतोय!” करू धुसफुसला!
रात्र चढू लागली तशी नवसागर
चढलेले बाप्ये परतू लागले मी कंटाळून एका खुर्चीत बसलो होतो, तोच माझ्या नाकात चीरपरिचित मोगरा दरवळला म्हटलं,
आहे बाबा! आज पण आहेच!
आजचा रंग काही औरच होता. समस्त बाप्ये नवसागरमय झालेले त्यातला एक मंडपात, “खीसा
पाकिट सम्हालो! खीसा पाकिट सम्हालो!” बोलत फिरत होता. दुसरा मंडपाच्या कडेला उभा राहून आपल्या खीशातल्या कोणत्या वस्तू नाहीशा झाल्यात याचा अंदाज घेत होता. एक जण
आकाशाच्या फलक पे कितने सितारे है, याची गिनती
करत होता. मोजताना चूक झाली की मध्येच तो हाताने आकाश खोडायचा, आणि नव्याने
गिनती सुरू ! मंडपाच्या बांबूला टेकून एक वल्ली शून्यात नजर लावून बसलेली. जवळच एक
सुतारफेणीसारखे केस असलेला म्हातारा, ‘मयत’झालेला. त्यातल्यात्यात कमी
नवसागर पोटात गेलेले लोक सरळ चालायचा प्रयत्न करत
इतराना सांभाळतानाच आपला तोल गेला नाहीतर आपण शेफ हाय, हे दावत होते. काही देवानंद सारखे
बागडत होते. काही बायांनीसुध्दा आस्वाद घेतलेला. त्या एकमेकींकडे बघून फक्त हसत होत्या. बरेचसे बाप्ये
मांडवा बाहेरच उभे होते. ते आत येतंच नव्हते. त्यांचे बाहेरच कसलेतरी वाद सुरू होते
एकजण सरळ श्या देत मंडपात शिरला. त्याच्या डोक्यावरची टोपी काहीशी
चुरगळलेली होती. अंगावर कडक कांजीचा सफेद सदरा, लेंगा होता. त्या सफेदीवर दृष्ट
लागू नये म्हणून लेंग्याच्या मागे कोणीतरी एकच चपलेचा चिखली शिक्का उमटवला होता. त्याचे डोळे गुलाल
टाकल्यासारखे लालेलाल होते. एक हीरवा लाल रूमाल त्याने मनगटाला बांधला होता. मिशीची टोके वर
होती आणि सदर्याच्या बाह्या दंडापर्यंत वर दुमडल्या होत्या. तो हातात एक
दगुड घेऊन माझ्याच दिशेने आला.
“बोंगा बंद!” दगुड दाखवत तो
किंचाळला, “ टकुरं
फोडून दीन!”
“ये गनपा आयकतो का-”
“माह्याईले शानपन शिकवतंय! गाप!”
“आरं गनपा, खुळा का तू ? बोंगा काहून बंद करून राह्यला?”
“बोंगा बंद!” इति गनपा.
चारचौघं जमले गणपा सोबतची त्यांची मांडवळ यशस्वी होत नव्हती. जेवढं समजवावं तेवढा
गणपा जास्तच पिसाळत होता. एक पेकटवली
असती तर डायरेक लाकडावर गेला असता, पण हा आवाज! एवढयात दुसर्या कोपर्यात खाडकन आवाज
झाला. कोणीतरी करवलीच्या कानाखाली
वाजवली होती. मंडळी तिकडे धावली. संधी मिळताच गणपाने हातातला दगुड ऍम्प्लिफायरच्या दिशेने हाणला. तो नेम चुकून एका बाप्याला लागला. खोक पडली आणि भळाभळा रक्त वाहू लागलं. गलका वाढला तसे
बाहेरचे सगळे तराट मंडपात धावले. त्यांचे दोन तट पडले काही जणं
लग्न लागलं म्हणत होते. पण उरलेल्यांना ते मान्य नव्हतं. एकजण सरळ नवर्या मुलाकडे गेला. त्याच्या हातात मूठभर चिखल होता, तो
त्याने रापकन् नवर्याच्या
डोक्यावर मारला. नवरदेवाची टोपी चिखलमय झाली. तो रागावला आणि बोहलं सोडून मांडवाच्या
एका कडेला जाऊन उभा राहिला. त्याने कपडयाचे दोनशे रुपये मागितले ही त्याची चूक झाली होती. कोणीतरी एक खुर्ची भिरकावली, त्यामुळे आणखी दोन चार खुर्च्या आडव्या झाल्या. माझ्या डोळ्या देखत एकाने नवरीच्या भावाच्या छातीत एकच ठेऊन दिली. तो जो पडला तो उठत नव्हता. “पाणी पाणी” करत होता॰ मंडपात पाणी कुठेच नव्हतं.
एवढं सार पाहून विहिणबाई पिसाळल्या. त्यांनी सरळ नवरीच्या मंगळसूत्राला हात घातला,
“असली सोयरिक नगं! माह्या लेकाले
लई भेटतीत!”
तिने एक हिसडा दिला नवरी पण काय कमी नव्हती-
“सटवी! रांडेच्ची! माह्या मन्याक
हात घातला गे...”
असे किंचाळत तिने सासूच्या पाठीवर धपाधप धपाटे
घातले. तिनेही नवरीच्या झिंज्या धरल्या.
अनेक
मायलेकी आता युध्दात उतरल्या.
खेचाखेच सुरू होती श्या
ऐकू येत होत्या धपाटे ऐकू येत होते.
आम्ही ... एन्जॉय करत होतो.
नवरा मुलगा मांडवाच्या खांबाला धरून कडेला उभा होता. एक मामा सरळ
त्याच्याकडे गेला आणि कानाखाली पाच बोटं उमटवली. एका गर्दीत मध्ये कोणाला तरी घेतला होता. त्यातून फक्त
धप्पाधप आवाज येत होते. कोणी रडतंय कोण श्या देतंय, त्यात मघाचा टकुरं फुटलेला किंवा
त्याचा सगेवाला बहुदा पोलिस स्टेशनला गेला असावा. काही मिनिटातंच सायरन वाजवत पोलिसांच्या गाडीने
ब्रेक मारले. सब
इन्स्पेक्टर राणे आणि सोबत चार पाच पोलिस
मांडवात घुसले. आत शिरतानाच साहेबांनी पहिला प्रश्न केला,
“काय रे? काय गडबड लावलीय?”
लगेच सारेजण आपापल्या तक्रारी घेऊन इन्स्पेक्टर साहेबांकडे धावले. साहेब तापले.
“तुमचा सगळयांचा आवाज आधी बंद
करा बघू! काय रे ए! तू सांग काय चाललंय?”
साहेबांनी एका बुजुर्गाला सवाल केला त्याने सर्व
प्रकार सांगितला मग इन्स्पेक्टर साहेबांनी सर्वांना जमवून डोस दिला,
“आता परत जर गडबड केलीत, तर मी नवरा नवरी सकट सागळयांना
आत टाकेन!”
सार्यांनीनी माना डोलावल्या का त्या आपोआप डोलत होत्या कुणाला ठाऊक. पण साहेब समाधानी दिसले. सर्वांना पुन्हा एकदा ताकिद देत साहेब व्हॅनमध्ये शिरले. हवालदारांनी मागून
गाडीत उडया मारल्या. व्हॅन सुरू झाली आणि एक वळण घेऊन दिसेनाशी होणार…इतक्यात पुन्हा प्रचंड स्वरुपात राडा आणि
श्या सुरू झाल्या. अर्ध्यावर गेलेल्या व्हॅनचे लाल दिवे लागले. पोलिस व्हॅन रीवर्स
आली. साहेब पुन्हा खाली उतरले. या वेळी उतरलेल्या हवालदारांचा नूर काही वेगळाच होता. ते हातातल्या लाठया
शाखेतल्यासारख्या फिरवू लागले. हा कोहरा मचून गेला. कोणी ही कुठेही पळत होता. इन्स्पेक्टर साहेबांनी बुजुर्गांना धारेवर धरलं.
“ अरे काय चालवलंय काय? ऑं? आत्ता तर तुम्ही कबूल केलंत ना, काही गडबड करणार नाही म्हणून?”
बुजुर्गांनी इन्स्पेक्टर साहेबांच्या पायावर लोळण घेतली.
“येक डाव माफी द्या सायेब.
पुन्हा न्हाई व्हनार जी.”
“नाही नाही! हे असे ऐकणार नाहीत.
तीनशे चाळीस, ते
नवरा -नवरी बघा कुठेयत ते.”
तीनशे चाळीस पुढे झाला त्याने गर्दीतून नवर्याला शोधून काढले. सासू बरोबरच्या
राडयाने नवरी पुरती विस्कटली होती. त्यामुळे गर्दीतली नवरी कोण हे त्याला कळेना. उगीच चुकीचं पाप
नको म्हणून त्याने फक्त नवर्यालाच साहेबांपुढे उभं केलं.
“साहेब सस्पेक्ट सापडत नाय.”
“सस्पेक्ट. म्हणजे नवरी? तीनशे चाळीस उगीच नको तिथे इंग्रजी वापरू नका, किती वेळा सांगायचं? काय रे, नवरी कुठेय तुझी? का गेली पळून लग्ना आधीच?”
इन्स्पेक्टर साहेबांनी जोक मारला. चारही हवालदार खदाखदा हसले. गर्दीतलं कुणीच हसलं नाही. जोक फुकट गेला तसे साहेब तापले.
“साले हे लोक
असे ऐकायचे नाहीत हवालदार, तो
गुरव बघा कुठे सांडलाय. आणा त्याला.”
मग विस्तृत प्रमाणात गुरवाचा शोध घेतला गेला. तो मिळेच ना. बहुतेक एव्हढ्या भीषण हाणामारीत कुठेतरी जायबंदी
होऊन पडला असावा, नाहीतर पळून गेला असावा. तोवर कुणीतरी नवरीला
आणून समोर उभी केली गुरव मिळत नाही कळताच साहेब भडकले.
“इकडे या रे तुम्ही दोघं”
नवरा-नवरी पुढे झाले.
“का रे, तुला हिच्याशी लग्न करायचंय?”
“हां जी.” नवर्याने मुंडी हलवली
“का ग ए, तुला याच्याशी लग्न करायचंय का?”
नवरीनं खाली बघत लाजून होकार दिला.
“ अरे, जाधव शिंदे! तो पडदा धरा
दोघांच्या मधे! धरा धरा!”
दोन हवालदारांनी नवरा नवरीमध्ये आंतरपाट
धरला. स्वत: इन्स्पे. साहेब कन्यादानासाठी उभे राहिले
“ ओ बाई! या इथे अशा.
काही मंत्र बिंत्र येतात का?” तिने होकार दिला मग दुसर्या
बाजूने तिने काही मंत्र म्हटले त्यात,
“संत्री
...लिंबू ...इलायचीच
महुआ..”
असं काही
तरी ऐकू येत होतं. ‘सावधान’ला मंडपात सावध फक्त पोलिस ! युनिफॉर्म मधले
हवालदारच अक्षता टाकत होते. शेवटी पडदा बाजूला झाला आणि इन्स्पे. साहेबांनी कन्यादान केलं. दोघांनी एकमेकांना हार घातल्यावर त्यांचे हात एकमेकांच्या हाती देऊन
साहेब गरजले,
“ या दोघांचं लग्न लागलंय. यावर
कुणाला काही म्हणायचंय?” कुणाची
काही म्हणायची हीम्मत नव्हती.
“सर्वांना लग्न मंजूर?” हां जी. हां जी वगैरे झालं.
सर्वांना पुन्हा एकदा ताकिद देत इन्स्पे साहेब गाडीत बसले. हवालदार मागे घुसले
जीप सुरू झाली आणि वळणावरून दिसेनाशी झाली. मी ही सर्व
सामान आवरायला घेतले तोच-
“ तुह्या मायले ! जबरदस्तीनं लगीन
लावायचं?”
अशी आरोळी ऐकू आली.
पाठोपाठ धबाधबा आवाज सुरू झाले. दोन चार दगड माझ्या आजुबाजूने गेले.
एखादा मशिनवर आपटला. एकूणच परिस्थिति बिकट होती.
प्रत्येक जण युध्दात उतरला होता. कोणी
मंडप गदागदा हलवत होता. लाठया काठया बाहेर आल्या होत्या, डोकी फुटत होती. दगडफेकीचं प्रमाण वाढलं तशी मी
त्या हजार रूपयांवर पाणी सोडलं. डोक्यावर ऍम्प्लिफायर घेतला बाकी सामान करूने.
त्याने डोक्यात कर्णा घातला होता. पाय लावून आम्ही नदीत उतरलो,
“ च्या
मायले ! पळान राह्यले!”
काहीजण आमच्या मागे धावले.
पळणारे फायटर्स नदीतपण उतरले होते. सोळाव्या रीळागत फायटींग सुरू होती.
आमच्या आजुबाजूने दोन चार दगड
गेले. नदीत ड्रेनेजचे
मोठे पाइप्स इथेतिथे पडलेले. आम्ही
त्या पाइपात शिरलो, लपून राहिलो.
तिथून आम्हाला श्या ऐकू येत होत्या, पळापळ दिसत होती आणि पाइपावर धडाड!
धुडुम! असे बॉम्ब पडल्यागत आवाज येत होते.
खंदकात लपलेल्या सैनिकाप्रमाणे आम्ही त्या पाइपात अर्धा
तास बसून होतो. दगडफेक कमी
झाली तशी रात्री बारा वाजता आम्ही घरी पोहोचलो.
करू वाटेत,
“ या लोकांनी हौशीला सुध्दा ठेवली
नाय! फोडून टाकली!” वगैरे बोलत
होता.
दुसर्या दिवशी सकाळीच दारात पुन्हा फटाके वाजले. समोर नार्या त्याचं तोंड तर एकदम पहाण्यासारखं. त्याने खिशातून हजार रूपये काढले-
“साल्या, काय लाज बिज वाटते का? परत असलं कॉन्ट्रॅक्ट आणशील तर बघ!”
नार्या उदास होता.
“अरे तुला कशाला? मीच आता असलं कॉन्ट्रॅक्ट घेणार नाहीए.
अरे, सकाळी
गेलो तर साला मांडवाचा पत्ताच नाय
! कापडाच्या चार दोन चिंध्या
पडलेल्या, बाकी
काय नाय ! साल्यांनी एक बांबूसुध्दा ठेवला नाहीए जाग्यावर !
माझंच दहा हजाराचं नुकसान झालंय.”
लग्न म्हटलं की
माझी फाटते. पब्लिक लग्न का करतं?
त्यात व्होल पब्लिक कशाला जमा करतं?
-आभास
आनंद
******




No comments:
Post a Comment