Monday, April 18, 2016

३१. गोष्टी सांगणारा माणूस.

शेजारच्या पोरी, पण बघायची चोरी.

  आमचा काळच और होता. कोणता मुहूर्त पाहून आम्ही त्या काळात जन्म घेतला माहीत नाही. पण आमच्या आधी सर्व मुलं-मुली, छान-निरागस आणि आमच्या नंतर सगळं फ्री आणि कॅज्युअल होतं. 

हे मी आमच्या मैत्रिणींबद्दल बोलतोय. मैत्रिण ही त्या काळात नुसती यायची नाही, तर ती वर्ग मैत्रिण बनून यायची. त्या बाहेर ती नसायचीच. सोसायटीत ती असली, तर बोलायची टाप नव्हती. कुठेही गल्लीत, मंदिराच्या पटांगणात, सोसायटीच्या हॉलवर, लायब्ररीत, जाता-येता, कुणी बोलताना सापडलं की थेट घरी खबर. पोरांच्या नाही- पोरींच्या. त्यामुळे आम्ही बोलायला गेलो, तरी पोरी बोलायलाच मागत नसत. वर्गात एक वेळ ठीक. एकत्र शिकायचे असल्याने जुजबी बोलणे व्हायचे. पण ते ही, "पट्टी दे", "रबर आहे?", "तुझी वही मा‍झ्या हद्दीत येतेय" किंवा "बाईंना ना SSS व", एवढेच. अशातच आमची प्रथम मैत्रिण जन्माला आली. म्हणजे ती जन्माला आमच्या सोबतच आली असणार. थोडी पाठी- पुढे. पण ती मैत्रिण मटेरियल आहे, हे कुणालाच माहीत नव्हते. आम्हालाही- तिलाही. त्यामुळे इयत्ता चौथीत वगैरे, आपली मैत्रिण आपल्या बाजूला पाच तास बसते आहे, यातले सुख कळलेच नाही. तिचे काम एवढेच असे की, " गृहपाठ कुणी-कुणी केला नाही?" ( हे वाक्य बाई बहुतेक आम्हाला बघतच म्हणायच्या) असे विचारले की आम्ही उठून रोजची पट्टी खायला जात असताना आम्हाला जागा करून देणे. पुढे मोठे झाल्यावर पश्चाताप झाला की, या मैत्रिणीशी तेव्हा मैत्री करायची संधी असताना आम्ही फक्त भांडणे का केली? 
पण असो.

संध्याकाळी आमच्या या मैत्रिणी, खेळायच्या निमित्ताने एकत्र येत. मुलं-मुली एकत्र खेळायचो. सोनसाखळी, लंगडी, खो-खो, अमृत-विषामृत, लगोरी  किंवा बेस्ट म्हणजे चोर-शिपाई. यातही मैत्री कमी- भांडणेच फार. अशाने कशी मिळायची मैत्रिण? अचानक सातवीत आलो आणि रूल्स बदलले. तसे ते बदलतील, हे आम्हालाच माहीत नव्हते. वर्गात मुलं-मुली असे दोन तट पडलेच, पण एकत्र खेळायला येणार्‍या मुलीही बंद झाल्या. हे काय झाले ते आम्हाला कळले नाही, आणि त्यावर विचार करायला आमच्यापाशी वेळही नव्हता. आम्ही तोवर क्रिकेट टीम तयार केली होती, स्कुल चॅम्पियन होतो. शाळेतील खो-खो टीममध्ये होतो. तिथेेही चॅम्पियन. मरोत मैत्रिणी.

अशाने मैत्रिणी हा शत्रू पक्ष झाला आणि आम्ही वयात आलो. साला वर्गात आखडणारी आणि वर टॉप मार्क्स मिळवणारी काय मैत्रिण होणार? त्यामुळे दोन्ही पार्टीजनी इंटरेस्ट दाखवला नाही. मुलींनी अभ्यासात डोके खुपसले, आम्ही खेळात. आता जेव्हा, ‘जवानी छा जाती है, तब गधी भी घोडी नज़र आती है।' या उक्तीप्रमाणे, आमचीच मैत्रिण आम्हाला अजनबी नजर आने लगी. आम्ही तिच्याकडे चोरून नजरा टाकू लागलो. यथाकाल तीही चोरटे कटाक्ष फेकू लागली. बस ! एवढंच! या पलीकडे काही होतच नसे तेव्हा. वेळही नव्हता. आमचा कार्यक्रम सकाळी अभ्यासाची हेलपाटी टाकणे, नंतर बाराला बुट्टयाच्या घरी झोपाळ्यावर. तिथून साडेबारा शाळेत. सहाला शाळा सुटली की मैदानात. पवार सर मातीत घोळवायचे. साडेसातला घरी. मग वाचन- नंतर जेवून झोप. शाळेत प्रॅक्टीस नसेल तेव्हा क्रिकेट. पुढे कॉलेजला गेल्यावर, फूल डे इंजिनियरिंग, तिथून कॉलेजची नेटस, नसतील तेव्हा धावत मैदानावर, लास्ट हिटाउट ऑर गेटआउट इनिंग मिळायची. रविवारी- सकाळी पार्कात बेकन फॅक्टरीपर्यंत जॉगिंग. दहा ते बारा  अधिकार्‍यांच्या विहिरीत डुबक्या, चारला जीममध्ये घुमून पाचला क्रिकेट ग्राऊंड. बिचार्‍या मैत्रिणी.

मग मैत्रिण कधी? तर क्लासला जाता किंवा येताना. त्याने काय होतंय? त्यामुळे सार्‍या गॅंगने विचार केला की, काहीतरी करायला पाहिजे. अशाने जमायचे नाही. मग आम्ही काय केलं, एक-एक पोरगी प्रत्येकाने आपल्या चॉइस प्रमाणे  बुक करून टाकली. म्हणजे याची गोगोपा, त्याची भुईचक्र, एक उलट्या पीसांची कोंबडी, एक कंबाईन, एक तिची बॉडीगार्ड. एक ताईसाहेबा. पण हे बुकिंग म्हणजे नुसतेच रमीतले 'बारा बुक' . प्रत्यक्षात हाती 'नो टच' गेमच असायचा.  आमचे गाणे ही होते, ‘आरती सप्रेम जय-जय विठ्ठल परब्रह्म’च्या चालीवर. 'बारा बुक असू दे किंवा नो टच गेम असू दे. गेम न कधी दाखवी SSS ढुबूम ढुम ढुम- ढुमचिक ( हे जगाच्या अंतापर्यंत किंवा श्वास संपला की-) गेम न कधी दाखवी तयाला बंडूगिरी म्हणती- तयाला बंडूगिरी म्हणती. या प्रमाणे आमचे पान कधी उपडे पडलेच नाही. साला पायावर धड उभे राहत नाही तोवर या सो कॉल्ड मैत्रिणी संपल्या. संपल्या म्हणजे त्यांच्या बापांनी त्यांची लग्ने लावून दिली. या बापांनाही इंटरेस्टिंग नावे होती. सूर्याजी, ढाक्या, आय. एस. जोहर, टोणपे वगैरे. आम्ही नेक्स्ट बॅच म्हणत बॅच आफ्टर बॅच पास होऊ दिल्या. नो युज! साला पिकतं तिथे विकतच नाही. आम्ही आपली समजूत करून घेतली. अशा रीतीने आमच्या शेतातलं, आम्ही मेहनतीने पिकवलेलं पीक, टोळधाडीने लुटून नेलं. टोळधाडीचे  क्वालिफिकेशन? मोठा बाप किंवा, शिक्षण किंवा फक्त विशिष्ट जमातीत जन्म घेणे. साला, सारा चमन उजड गया. अशावेळी आम्हाला सपोर्ट केला, तो विजय माल्ल्याने. तो होता म्हणून वाचलो. तर असे क्लास 'सी' जेंडरल इंसुलेशन असलेल्या काळात आपण मुळात जन्मच का घेतला? असो.


पुढे घरी 'रोटीयों के लाले' पडतील अशी लक्षणे दिसू लागल्यावर आम्ही लग्न करायचे ठरवले. मग त्या काळात उरलेल्या मुलींशी आम्ही लग्ने केली. दिवसा नोकरी, संध्याकाळी नाका आणि रात्री संसार असे डिस्ट्रिब्युशन केले. सणासुदीला कधी आमच्या मैत्रिणी येत, त्या कधी बोलल्या तर ठीक, नाहीतर लांबूनच हसून पसार ! हाड तिच्यायला ! मैत्रिणीशी साधा एक शब्द बोलता येऊ नये? तसा तो आधीही येत नव्हताच. 
भंगार काळ!


असा बराच काळ गेला. मैत्रिणींची मुले मोठी होऊन त्यांच्या नवर्‍यांची पोटे सुटली किंवा ते म्हातारे दिसू लागले. आम्हाला यात आसुरी आनंदच झाला. तरी पण या काही आमच्याशी मैत्री करेचनात. मग सगळे करतात तो एक प्रकार केला. गेट टुगेदर. आपल्या मैत्रिणी पुन्हा पाहण्याचा एक नामी उपाय. जमला. नवी नावे, पत्ते, नंबर्स कळले. भेटत राहायचे नक्की झाले आणि खतम. पुन्हा काही कोणी भेटायचे नाव काढले नाही. काही भूमिगत झाल्या, काही गुडुप झाल्या. काय झाले, काय माहीत.

बुट्टया बिचारा जीवतोड मेहनत करायचा की सगळे एकत्र यावेत. तीन-चार महिन्यातून एकदा भेटावेत. पण नाही. जखमेवर मीठ म्हणून आमच्या आधीच्या आणि नंतरच्या बॅचेस येतं जाता भेटत. त्याचे फोटो फेसबुकवर अपलोड करत. आमचे मात्र नन्ना! तमाम संस्कृती, शालीनता, मर्यादा ही या आमच्या एका बॅचमध्ये एकवटलेली. आम्ही अचानक मित्राचे- परपुरूष झालो होतो. मोठ्या मुश्किलीने एकदा भेटलो- नंतर बंद. आपलेच असे का झाले? कालच बुट्ट्याशी बोलत होतो. मी म्हणालो, “आपल्या बॅचला बुट्टया, सगळ्या नेफर्टीटी, क्लियोपात्रा नाही तर रझिया सुलतान असणार. त्यामुळे आपण फक्त त्यांचे पुतळेच पहायचे.”

बुट्टया म्हणाला, “अरे, कदाचित त्यांना त्यांच्या नवर्‍यांची खात्री नसेल. शेवटी बायकोचा मित्र सहन करणे, ही एक कला आहे.”

 पण आमच्या दुर्दैवाचे दशावतार असे की, आमच्या बायकांना मित्र आहेत पण आमच्या मैत्रिणी, लाश गायब!!

“अरे! पण फक्त आपल्या बॅचच्या मैत्रिणींनाचअसे अरसिक नवरे मिळावेत! आपल्या पुढे-पाठी सगळे आधुनिक?”

बरं यांचे नवरे प्राचीन तर मग आपण अर्वाचीन कसे? तर याचे कारण विजय माल्ल्या! जगातील सारे भेदभाव मिटवते अशा औषधाचा निर्माता! जय किंगफिशर ब्रूवरीज !!


विचार आला, शेयरच्या जशा तीन वॅल्यूज असतात, एक बुक वॅल्यू, दुसरी फेस वॅल्यू आणि तिसरी मार्केट वॅल्यू. तशा यांच्यापण तीन वॅल्यूज आहेत. म्हणजे यांच्या नवर्‍याकडे यांची फेस वॅल्यू . ती स्प्लिट होत-होत आता एक रुपया झाली असणार! आई—बापा घरी बुक वॅल्यू- जावयाची पोस्ट, पगार, नातवंडांची हुशारी आणि आर्थिक स्थितीवर बेतलेली. मित्रांकडे येताना मात्र मार्केट वॅल्यू? ती पण बुल मार्केटमधली ?  अव्वाच्यासव्वा वाढवलेली? आमच्या नंतरच्या बॅचमध्ये गळयात गळे घालून सेल्फी काढतात. काही प्रॉब्लेम नाही. आम्ही मात्र एका गेट टुगेदरसाठी फोन झिजवायचे. कशासाठी? तर फक्त या नेफर्टीटी, क्लियोपात्रा किंवा रजिया दिसणे- या एका क्रियेसाठी? मी बुट्टयाला म्हणालो, “यांना परत एकदा गेट टुगेदर करायचे आहे, म्हणून सांग. सांग, वाटल्यास पर्दानशीन होऊन या. आम्ही आपल्या पायांची बोटे पाहून समाधान करून घेऊ. वाटल्यास मुँह दिखाईचे तिकीट ठेवा. आम्ही दोनशे रुपये खर्च करून, तिकीट काढून आपले दर्शन घेऊ. बरे हे सारे कशासाठी ? तर फक्त आम्ही पाहू म्हणून !? काय होते पहिले की? संस्कृती बुडित जाते? मा‍झ्या माहितीप्रमाणे, नुसते पाहून कुणी प्रेग्नंट झाल्याची इतिहासात नोंद नाही. ते ही या वयात!”


एखाद्या बॅचला जन्म घेऊन, आपल्या आधी आणि नंतर, सगळे सुखात सोशलतायत आणि आपण मैत्रिणीच्या एका शब्दाला महाग आहोत, ही भावना किती वाइल्ड आहे! चोर, दरोडेखोर किंवा जॅक द रिपरच्या मालिकेत आपण उभे आहोत, असे फीलिंग येते! संपूर्ण आयुष्य मैत्रिण नसणे आणि सहाराच्या वाळवंटात जन्म घेणे, यात फरक तो काय? लोकांना भरभरून मैत्रिणी देणारा देव, आम्ही त्याच्या दारी चाळणी घेऊन गेलो, तेव्हा काय झोपला होता? फ्रॉइड म्हणतो की एखाद्या गोष्टीची मानसिक कमतरता भासत असेल, तर मन ती कल्पनेने सोडवते. अशी कल्पनेतून सोडवण्याची व्यवस्था नसती, तर माणसे पार वेडी झाली असती. आमच्या मैत्रिण दुष्काळावर अशीच एक कल्पना मला सुचते आहे. मादाम तुसाँ फाउंडेशनकडे रिक्वेस्ट करून या नेफर्टीटी, क्लियोपात्रा, रझिया वगैरे मैत्रिणींचे मेणाचे पुतळे बनवून घ्यावेत. काळाच्या प्रतलावर गोठलेले. मग आमची ती मैत्रिण, शाळेच्या युनिफॉर्म मधली, पंधरा वर्षांची असली तरी हरकत नाही. किंबहुना तिने पंधरा वर्षांचेच असायला हवे. अजिबात वाढता कामा नये. त्यांचे प्रदर्शन भरवावे. आम्ही ते तिकीट काढून पहायला जाऊ. युनिफॉर्म मधली चिमणी पाहून, नॉस्टॅल्जिक होऊ. दिवसभर त्यांच्याशी पट्टी- रबरावरून भांडू. संध्याकाळी प्रदर्शन बंद होताना, वॉचमनकडून बाहेर काढले जाताना, तिथल्या शेरेवहीत लिहू, 

“आज हमे आफताब नजर आया, अब हमे जन्नत नसीब होगा! इन्शाल्ला !”    

                             *******

No comments:

Post a Comment