Monday, July 19, 2021

हर कोई मुसाफिर है यहाँ...

 



दिलीप कुमारच्या उत्तम-उत्तम चित्रपटांबद्दल रकाने भरभरून लिहिले जात असताना, त्याच्या एका चित्रपटाचा उल्लेख झालेला दिसला नाही. याचे तसेही फार आश्चर्य वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेमध्ये, 'द ग्रेट दिलीपकुमार' असतो अशांपैकी हा चित्रपट नाही. या चित्रपटाचे जर तीन वेगवेगळे भाग केले, (कारण तो तसाच आहे) तर  


यातल्या तिसर्‍या आणि शेवटच्या भागामध्ये, शेवटच्या कथेमध्ये दिलीप कुमार आहे. 


हा चित्रपट आहे 1957 चा म्हणजे दिलीप एक प्रस्थापित हिरो असतानाचा. अशावेळी चित्रपटाच्या शेवटच्या भागात अस्तित्व असेल असा चित्रपट, असे कथानक घेऊन कुणी दिलीप कडे जाईलच कसा? आणि समजा गेलाच तर दिलीप त्याला दारातूनच हाकलून देईल की नाही? पण दिलीपने हा चित्रपट केला. या चित्रपटाचे नाव होते 'मुसाफिर' आणि दिग्दर्शक होते ऋषिकेश मुखर्जी, हा त्यांचा स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. या चित्रपटाचे लेखन केले होते ऋत्विक घटक यांनी. थोडक्यात, आपल्या पन्नास वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत, तितकेच चित्रपट करणारा दिलीप, कोणासोबत आणि कशा प्रकारचे चित्रपट करू इच्छित होता हे स्पष्ट होते. 


हा चित्रपट तीन वेगळ्या कथांचा बनलेला आहे, मात्र त्यामागे जीवनाचे काही समान सूत्र, घटक यांनी विणलेले आहे. पहिला भाग हा 'विवाह' या घटनेपासून जीवनाचा परामर्श घेतो. दुसरा भाग 'जन्म' या घटने भोवती फिरतो आणि तिसरा भाग 'मृत्यू' या अंतिम सत्याचा परामर्श घेतो. जीव मर्त्य आहे पण जीवन तहहयात आहे, हे अधोरेखित करतो. आपण केवळ मुसाफिर आहोत, याची जाणीव करून देतो. 


ऋत्विक घटक यांचा तीन भिन्न कथांना एक समान सूत्रात एका सुनियोजित शेवटाकडे घेऊन जाणारा मुसाफिर हा  डरना मना है च्या खूप आधी घडून गेला आहे. एक घर हेच प्रोटॅगोनिस्ट या कल्पनेवर, व्यावसायिक चित्रपट, त्या काळात बनवला गेला होता. 


या तीन कथांची एकत्र सांगड, यामागचे समान सूत्र आहे एक घर , ज्यामध्ये निरनिराळ्या काळात, हे एकमेकांशी संबंध नसलेले भाडेकरू राहिलेले आहेत. त्यांना भेटण्यासाठी येणारा घरमालक, शेजारची  चाची, पोस्टमन, समोरच्या हॉटेलमधील पोरगा हे कॉमन आहेत. कथेला समान सूत्रात गुंफताना ही पात्रे कथेला कंटिन्युटी देतात. या सर्व कथांमध्ये, एका अनाम व्हायोलिन वादकाचा उल्लेख येतो आणि त्याचे व्हायोलिन ऐकू येते. 


पहिल्या कथेत विवाहापूर्वी घर सोडून पळून आलेल्या एका जोडप्याची कथा आहे. या कथेमध्ये सुचित्रा सेन बाहेर अंगणात एका झाडाचे बी पेरते. दुसऱ्या कथेत, पतीच्या निधनानंतर पोटातील गर्भ जन्माला घालणाऱ्या पत्नीची कथा आहे. यात पतीचा भाऊ किशोर कुमार हा नोकरी मिळवून न शकल्याने वीष घेतो पण... या कथेत पेरलेल्या बी चे एका रोपात रुपांतर झाले आहे. आणखी एक म्हणजे गोवन फोक ट्युनवर बेतलेले, 'मुन्ना बडा प्यारा', हे गीतही यात आहे. 


इथे आपला विषय दिलीपकुमार हा असल्यामुळे, आपण यातल्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागाचा नीट विचार करू. 


या वेळी घरातील भाडेकरू आहेत एक बॅरिस्टर साहेब  त्यांची विधवा बहीण  (उषा किरण)आणि तिचा एक पांगळा मुलगा, राजा. (डेझी ईराणी)  इथेही त्या व्हायोलिन वादकाचा उल्लेख होतो, पण या कथेत तो एक मूर्त रूप धारण करतो. एक व्हायोलिनिस्ट (पगला बाबू). या आधी घरात राहिलेल्या प्रत्येक भाडेकरूने त्याचे व्हायोलिन ऐकलेले आहे. मात्र हा पगला बाबू कुणालाच भेटत नाही. छोटा राजासुद्धा त्या व्हायोलिनच्या सुरावटी मुळे पगला बाबू कडे आकर्षित होत जातो. त्याला भेटण्याची तीव्र इच्छा छोट्या राजाला होते. तो कुणालाही भेटत नाही, असे सगळ्यांनी सांगून देखील छोटा राजा आपला हट्ट सोडत नाही. शेवटी  पगला बाबू आपल्या व्हायोलीन सहित अवतरतो आणि छोट्या राजासोबत त्याचा सूर जुळतो. तो त्याच्यासाठी व्हायोलिन वाजवू लागतो. ( या व्हायोलिनचा एक ग्रेट सोलो चित्रपटात सलग आहे.) 



प्रसंगोपात लक्षात येते की, पगला बाबू चे नाव राजा आहे आणि तो छोट्या राजाच्या आईचा उमाचा प्रियकर आहे. उमाच्या हे लक्षात येताच ती सावध होते. छोट्या राजाने त्याला भेटू नये, अशी तिची इच्छा असते. ती तसा प्रयत्नही करते, पण छोट्या राजाचा हट्ट पाहून अखेर नमते घेते. पगला बाबू मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता छोट्या राजाशी दोस्ती करतो. त्याला मोटिवेट करतो जगण्याची, स्वतःच्या पायावर चालण्याची प्रबळ इच्छा, तो त्याच्या मनात निर्माण करतो. पगला बाबू छोट्या राजाला सांगतो की, तो एक दिवस जरूर चालणार आहे. ज्या दिवशी बागेतल्या  त्या रोपावर फुल  उमलेल, त्या दिवशी राजा चालू लागेल. 


बॅरिस्टर साहेबांना जेव्हा राजा चे सत्य कळते ते त्याच्याशी वाद घालत, पुन्हा इथे फिरकू नये असा इशारा देतात. इथे व्हायोलिनच्या तुटण्यातून अशुभाचा संकेत मिळतो. पगला बाबू छोट्या राजाला भेटणे बंद होते. 


पगला बाबू ला कॅन्सर झालेला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यात आहे. शेवटची घटका हॉटेलच्या मागे मोजणाऱ्या राजाला, उमा घरी आणते. 


एके दिवशी सकाळी, छोट्या राजाला, अंगणातील रोपावर आलेली फुले दिसतात. तो अच्छे चाचाला शोधू लागतो. उमा घरभर शोधते. अखेर व्हरांड्यात अस्ताव्यस्त पडलेला राजा तिला दिसतो. त्याच्या जवळ ते तुटलेले व्हायोलिन आहे आणि दुसऱ्या हातात फुल.  याच वेळी झाडावरील फुलांकडे भारावून पाहत, फुल उमलले की मी चालू लागणार, या दृढ विश्वासाने, छोटा राजा चालत व्हरांड्यात येतो, मात्र तो फुलांकडे संमोहित झाल्यागत ओढला जातो आहे. 


आपला पहिलाच चित्रपट करणारे ऋषीदा, त्यांच्यावर असलेला बिमल रॉय संस्कारांचा प्रभाव आणि भावनांचा उद्रेक म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे, हे पुरेपूर उमजलेले दिलीपसाब- या दोन दादा माणसांनी, एखादा मेलोड्रामा उत्कृष्ट संयमाने कसा हाताळावा, याचा वस्तुपाठच, या चित्रपटातून घालून दिला आहे. 


दिलीपसाब नेहमीचे अंडर प्ले ऍट बेस्ट तर देतातच, पण व्हायोलिन वादकाचे पर्फेक्शन, छोट्या मुलाशी सूर जुळवतानाचे निरागसपण देतानाच, 'लागी नही छुटे राम' हे लताजींसोबत, क्लासिकल गावे तसे गातात. कुठे कमी पडत नाहीत. 



त्यावर्षीच्या उत्कृष्ट चित्रपटात, तिसरा असलेला 'मुसाफिर' हा चित्रपट, आज फार कमी लोकांच्या स्मरणात आहे. खरं तर कथानक, शैली,  रचना, मांडणी आणि हाताळणी, या दृष्टीने, या चित्रपटाचा अभ्यास नव्या पिढीने आजही करायला हवा. 

- आभास आनंद

No comments:

Post a Comment