साधारण तीन महिन्यांपूर्वी, प्रयोग, मालाड या संस्थेच्या,प्र.ल. मयेकर स्मृति एकांकिका स्पर्धेचे आयोजन
आणि त्या निमित्ताने संग्रह, गौरव विशेषांक प्रकाशन वगैरे सुरू होते.
याच वेळेस अविनाश बोरकरने मला त्यांच्या मसीहा या संग्रहातील ‘गोष्टी सांगणारा माणूस’ या कथेविषयी सांगितले.
यात एक नाट्य आहे, जे राज्य स्पर्धेत प्रयोग म्हणून व्हावे, तू करावेस.
मी कथा वाचली, नेहमीची सुंदर शैली, दृश्यात्मक कथा. नाटक होईल- कदाचित, तेथे जातीचा नाटककार हवा.
त्याच वेळी कांचन नायकने याच संग्रहातील, ‘अखेरचा मसीहा', या कथेविषयी भरभरून सांगितले.
हीच कथा गिरीश ओकने स्मृति सोहळ्यात दोनदा वाचली.
अखेरचा मसीहा ही कथा, संग्रहातील पृष्ठसंख्या जुळावी म्हणून, उरलेल्या पानांसाठी लिहिली गेली, हे अवी बोलला.
अवघी पाच पानी कथा. मग विचार सुरू झाला, गोष्ट सांगणे ही देखील एक कला आहे.
मी शाळेत सातवी वगैरेंत असेन, वर्गात ऑफ पिरीयड मिळवा ही सर्वांचीच इच्छा.
असा तास मिळाला, तर कधी एखादा शिक्षक ‘आमचा’ असा आला, की आम्ही त्यांना गोष्ट सांगायचा आग्रह करायचो.
एकदा बाई म्हणाल्या, गोष्ट ठीक आहे, पण ती तुमच्यातीलच कुणीतरी सांगायला हवी. कोण सांगणार?
सगळा वर्ग माझ्याकडे पाहू लागला. मी उठलो आणि वर्गासमोर उभा राहिलो.
कोणती गोष्ट, मी काय सांगणार मलाच माहीत नव्हते. सुरुवात केली, मजेदार केली आणि अर्ध्या तासात संपवली.
मग हा पायंडाच पडला. ऑफ पिरीयड अचानक कधीही येई. गोष्ट सांगायची फर्माईश, मी उठून उभा, गोष्ट सांगे, ती मुलांना आवडेही.
ही गोष्ट तशी सोपी असे. व्यक्तिचित्रणे तयार होती, मुले एंटीसीपेट करीत.
‘टॉस ए सिच्युएशन’ टाईपची कथा असे, जी सिटकॉम करताना आपण वापरतो.
आधी तयारी वगैरे कधी केलीच नाही. प्रचंड वाचन आणि तरल कल्पनाशक्ति बस.
मग पुढे कधीतरी नाटकांसाठी लेखक वगैरे बनावे लागले. क्राफ्ट जमा करत गेलो.
जसजसा पुढे गेलो तसे, व्यक्तिचित्रण, प्रिमाईस, टोन, स्ट्रक्चर, लॉजिक, बॅलन्स,
रिलेवांस, से, ड्रामेटिक इश्यू, ड्रामेटिक स्टेटमेंट- वजनं वाढत गेली.
यातून लिहिणे अवघड होत गेले. लिहिले तेव्हा स्तुति, कौतुक होई, बक्षिसे मिळत, पण प्रयोग तिथेच संपे.
लिहिणे जड झाले होते, इतके मात्र निश्चित. कारण लोक मागत- माझे होत नसे.
त्या ‘गोष्टी सांगणार्या माणसा’चं काय झालं?
असा मलाच प्रश्न पडला आणि 'गोष्टी सांगणारा माणूस' ही मालिका जन्माला आली.
तिच्या पन्नास कथा लिहून या प्रयोगाविषयी लिहावे, असे मला वाटत होते,
पण मुद्दलात माझ्या गोष्टी सांगण्याच्या क्षमतेविषयीच एक शंका मनात आली होती.
आज तीस कथा सहज लिहून झाल्यावर ती मिटली, तेव्हा आता थांबायला हरकत नाही.
आता या प्रयोगाविषयी:
1) ‘गोष्टी सांगणारा माणूस’ ही मालिका लिहायला घेताना स्वत:साठी जास्तीतजास्त कठीण कशी करता येईल, हे पहिले.
कथा पूर्ण नसेल. सरळसोट नॅरेशन नसेल. समजायला अवघड नसेल पण विचार करायला उद्युक्त करेल.
विचार केला तर सबटेक्स्ट दिसेल, अन्यथा फक्त कथा वाचा, एंजॉय अशी पद्धत निवडली.
2) गोष्टी सांगणारा माणूस ०१ असे टाइप करेपर्यंत मला माहीत नसेल की मी कोणती गोष्ट सांगणार आहे.
पूर्वतयारी अजिबात नसेल, त्यामुळे रचनेचा प्रश्नच नाही. गोष्ट एकटाकी लिहिली जाईल आणि फ्लो मध्ये स्ट्रक्चर होईल.
3) रचना नसेल, त्याचप्रमाणे कॅरेक्टर्स रेखाटन नसेल. प्रत्येक कथा नव्या व्यक्तिरेखांसह, ज्यांचे चित्रणही होणार नाही.
म्हणजे, कॅरेक्टर्सच्याआड कथानकातील उणीवा झाकायचे स्वातंत्र्य मिळणार नाही.
4) कथेतील रचना, कॅरेक्टर्स रेखाटन आणि तपशील जाणीवपूर्वक टाळल्यावर फक्त गोष्ट उरेल.
त्या गोष्टीवर असलेला रॉनेस हाच तिचा यूएसपी राहील.
5) ही कथा प्रमोट होऊ नये, म्हणून ती अवेळी पोस्ट केली जाईल. बर्याच कथा रात्री बारा किंवा एकलाही पोस्ट झाल्यात.
6) यानंतर ज्या प्रतिक्रिया येतील त्या प्रेमाने आल्यात असे समजून त्यावर फार विचार करू नये.
गोष्टी सांगणे हा मूळ उद्देश, त्याला हरताळ फासू नये.
7) गोष्टी सांगणे, या प्रक्रियेचा मूळ हेतू, लेखकाची विचार क्षमता जागी ठेवणे आणि सातत्याने नवता देण्याची शक्यता राहणे ही असेल.
8) मूळ हेतू सिद्ध झाल्यास गोष्टी सांगणे या क्रियेला प्रयोजन राहणार नाही.
जरी ती बंद करणे हा आग्रह नसेल. अशा गोष्टी तहहयात सांगता येतील.
मात्र त्यात पुंनरावृत्ती अटळ असेल. त्यामुळे थांबणे हा सेल्फ डिसीप्लीन राहील.
9) रचनेतील अन्य तांत्रिक बाबी आपण नेहमीचं करत आलोत. त्याचा कंटाळाही येऊ शकतो. तेव्हा असे प्रयोग उपकारक ठरतात.
10) असो. नव्या वर्षात प्रवेशताना, शून्यातून सुरुवात करणे अनेकदा परिस्थिति आपल्यावर लादते.
आपण शून्यातून शून्याकडे जातोय याची आपल्याला कल्पना असल्याने तो काही मोठा इश्यू होत नाही.
ज्यांनी या कथा वाचताना, वाचून संपर्क साधला, चर्चा केली, आवडले, कळाले नाही, नावडले,
असे स्पष्ट संगितले त्या सर्वांचे आभार, कारण या प्रयोगात तुमचा फीडबॅक हाच महत्वाचा मुद्दा होता.
धन्यवाद!
-Aabhas Anand
No comments:
Post a Comment