Monday, March 2, 2015

माध्यमातील लिखाण.





माध्यमातील लिखाण हे काम स्वीकारण्यापुर्वीच हे पडद्यामागील काम आहे, हे लेखकाला माहीत असते. बरेच आधी म्हणजे आठवड्यात फ़क्त एक एपिसोड व्हायचा त्या काळात श्रेयनामावलीत ही (म्हणजे आमची) नावे प्रामुख्याने असत. याची कारणे शोधली तर फ़क्त 4-5 वाहिन्या हिंदीत आणि 2 मराठीत सुरू होत्या हे एक. मालिका लिहित असताना 10-12 दिवसात एक काम पुरे होऊन दुसरी कामे, जाहिराती, कॉर्पोरेट, कॉपी वगैरे करता येत, हे दुसरे. (तेव्हा त्याची गरज होती.) तिसरे म्हणजे एका मालिकेत अडकून पडलोय असे वाटत नसे. स्क्रीन, ट्रीटमेंटवर विचार होई. खरोखर 'स्क्रीन प्ले' लिहावा लागे. कृत्रिम हुक्स क्वचित वापरावे लागत. मजा येई. सिटकॉम हा अपवाद, पण त्यातही एक वेगळी स्क्रिप्टिंगची गंमत होती. आम्ही लेखक- तंत्रज्ञ मालिका सोडत नसू म्हटल्यावर टायटल डिस्प्ले थ्रू आउट एकच असे. म्हणून आमची नावेही टाकली जात.

नंतर बहुतेक चॅनेल रिसर्चमध्ये सस्टेनिबिलिटीचा मुद्दा आला. माध्यमक्रांतित प्रेक्षकाचा अटेंशन स्पान कमी झाला. चांगले कथानक, ट्रीटमेंटवर मेहनत घेऊनही मालिकेचा TRP पुढच्या आठवड्यात होल्ड होत नसे. हे स्पोंसर्सना परवडणारे नव्हते. यावर उपाय म्हणून डेलीसोप नावाचा प्रकार आला. एकता कपूरच्या यशामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. या काळात माउन्ट ते होल्ड हा प्रवास सुकर झाला. स्पोंसर्स खुश झाले, सोप हा प्रकार रुजला. या प्रकाराची भूक बकासुरी होती. त्या वेगासाठी ट्रीटमेंट बरीचशी बाद झाली-पर्यायाने पटकथा. सोप या अनैसर्गिक प्रकारात घराणी आणि त्यातील वैर हा एकच conflict ट्रीटमेंट शिवाय दाखवता येतो, त्यामुळे आज 15 हून जास्ती वर्षानंतरही मालिकांचे कथानक एकच आहे फ़क्त अंगण बदलते.

हा बदल रुचला नाही असे म्हणण्यापेक्षा त्यात आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत दोष येईल असे वाटल्याने तेव्हा लिहिणाऱ्या बहुतेकांनी हे लेखन नाकारले. तिथे नवे लेखक आले.

वर्कलोड इतके होते की लेखकच काय, दिग्दर्शकाच्याही टीम्स केल्या गेल्या. कोणता भाग कोण डिरेक्ट करेल/ लिहिल हे नक्की नसल्याने, अनेकदा मध्येच मालिका सोडणे, बदल हे होत असल्याने काही निर्मात्यांनी नावे न देण्याची पद्धत स्वीकारली. काहींनी ग्रुप नेमिंगचा पर्याय स्वीकारला. पण चांगल्या हाउसेसमध्ये अजून व्यवस्थित क्रेडिट्स दिली जातात. त्यासाठी टायटल्सचे patches बनवून एडिट करून योग्य नामावली दाखवली जाते, पण अर्थात आधीच वाढलेल्या वर्कलोडवर ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरू शकते. कारण या कामाची डेडलाइन अनेकदा अक्षरशः घड्याळाच्या सेकंद काट्यापर्यन्त खेचली जाते. सोप हे कोलोसल-जायंट वर्क आहे. ते न करण्यामागे आमची काही भूमिका निश्चित असली, तरी ते काम पेलवणाऱ्यांचा मी आदर करतो. या मालिका एक वर्ग पाहत नाही, त्याला नावे ठेवतो, हे खरे असले तरी स्पोन्सर्स त्यावर करोडो रुपयांचा डाव खेळतात, त्या अर्थी हा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे हे नक्की.

सोप आपण परदेशातून उचलला तसेच सीझन्स ही उचलू लागलोत. सीझन्स पद्धतित काम जास्ती शिस्तबद्ध आणि रचनात्मक होते. त्याचे टप्पे निश्चित असतात. तिथे एक सीझन एक टीम राहू शकते. आपल्याकडे हे सुरू होते आहे. तिथे काम करायला सारे तयार आहेत. सोप काळात TRP बरहुकूम Creative interference हा दुसरा मुद्दा ही होता जो सीझन पद्धतित नसेल.

 

No comments:

Post a Comment