कवितेचे विश्लेषण करायला बसणे, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. ती वेळ आपल्या वैर्यावरही येऊ नये, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याचे कारण विश्लेषण ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. तिचे युनिवर्सल नियम असू शकत नाहीत, तसेच जरी मी जॉनर बेस्ड समीक्षेचा पुरस्कर्ता असलो, तरी शेवटी ती ही तुलना अनेकदा अस्थानी ठरू शकते, या मतापर्यंत आलेला आहे. कलाकृतीला असे नियम लावता नयेत. तुलना ही देखील शेवटी वैयक्तिक बाब आहे.
तर आता... विषय... परवाच मी शेयर केलेली, नागपूरच्या कवयित्री, मेघा देशपांडे यांची, याच नावाची कविता. त्या ओघाने उभे राहिलेले काही मुद्दे. विषयच काय, शब्दांचेसुद्धा Taboo होणे. आपल्या नकळत, आपण शब्द, मुद्दे, ‘विषय’ वाळीत टाकतो का? तर हो. माझे काही मित्र ‘हिंदू’ आहेत- त्यांनी सेक्युलर, समाजवादी, पुरोगामी या शब्दांना असेच वाळीत टाकलेले आहे. मग माझे समाजवादी/ पुरोगामी मित्र काय आहेत? त्यांनीही असेच शब्दांना वाळीत टाकलेले आहे. ‘हिंदू’ म्हटले की त्यांचे तेच होते जे संघ कार्यकर्त्याचे ‘सेक्युलर’ म्हटल्यावर होते.
विज्ञाननिष्ठेचा इतका चुकीचा पगडा बसलेला आहे- की परवा मित्र महेश पवारांच्या ‘नेहालय’ वर मी एका प्रयोगासंबंधात ‘एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन’ हा शब्द वापरला. तो आमच्या पत्रकार मित्रांनी त्वरित मोडून काढला, कारण तो तर खोटा/ अवैज्ञानिक विषय! अशा वेळी त्या शब्दाला मूळ काही अर्थ आहे. त्या अनुषंगाने समोरचा त्याचा वापर करतो आहे, याचे भानच राहत नाही. शब्दांना असे वाळीत टाकणारा समाज माणसालाही वाळीत टाकतो, यात आश्चर्य ते काय? म्हणजे कुठल्यातरी खेड्यातील गावठी जमात-पंचायत वाळीत टाकते. आपला या वाळीत प्रकरणाशी संबंध नाही, हे साफ खोटे आहे. आमच्या संस्कारांनी असेच काही शब्द वाळीत टाकले आहेत. त्यांचा अर्थातच सेक्सशी संबंध आल्याने असेल, कारण ती तर अतिशय वाईट गोष्ट आहे. ती चार-चौघांत बोलतो तो माणूस वासनेने बरबटलेला असणार! असे आपण पटापट वर्गीकरण करण्यास मोकळे. तेव्हा नागपूरच्या कोणी मेघा देशपांडे या कवयित्री ‘विषय’ हे शीर्षक कवितेला देतात, किंवा त्यावर कविता लिहितात म्हणजे काय? मोठाच गुन्हा करत असणार त्या ! शी ! असल्या फालतू कविता का करायच्या? कुणी केल्या तरी एखाद्याने आवडल्या असे का म्हणायचे? त्या शेयर का करायच्या ? ही सारी माणसे विकृत असणार !
शब्दांना आणि माणसालाच काय, कशालाही वर्गीकृत करण्याच्या, शिक्के उठवण्याच्या घाईत असलेला समाज विचार करतो असे मात्र दिसत नाही. याचे कारण, पुन्हा हीच मेघा देशपांडे यांची कविता...
‘विषय’ ही कविता नेटवर वाचनात आली आणि माझी पहिली उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती, ‘सुंदर’!! कवयित्रीबाईंची परवानगी घेऊन मी ती लगेच शेयर केली, आणि नंतर एखादी गोष्ट आवडल्यावर त्या आनंदात इतरांना सामील करून घ्यावे, म्हणून लगेच, काही लेखक, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक, मित्र आणि हो मैत्रिणीसुद्धा विशेषत: कवयित्री, यांना पाठवली. माझ्या नाट्यग्रुपमध्ये ही शेयर केली. ग्रुपमध्ये सहसा कोणीच कुणाचे वाचत नसतो. आपलेच घोडे दमटत असतो- तसेच तिथेही झाले. तो मुद्दा नाही. पण नंतरच्या प्रतिक्रिया हे सायन्स लॅबोरेटरीत प्रयोगाचे उत्तम साधन ठरावे. या निमित्ताने मुद्दा आला, बाईंची कविता चांगली असून आवडली नाही, की शब्दामुळे वाळीत टाकली जातेय? कविता करणार्याला ती समजते का? कविता करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, काव्य रसिक असणे, समजून घ्यायचा प्रयत्न करणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. मेघाताईंच्या प्रस्तुत कवितेवर ज्या प्रतिक्रिया आल्यात, त्याही साधारण, ग्रेट! बोल्ड ! थेट ! धाडसी ! अशा प्रकारच्या आहेत!! तेव्हा कविता आपल्याला जशी जाणवते तशी इतरांना नाही, हे ही स्पष्ट होते आणि शब्द किंवा विषय Taboo झाला/ होतो , हे दशांगुळाने उरते.
तर मेघाताईंची ही कविता आपल्याला काय कळली? किंवा का आवडली? तपास सुरू ! कवयित्री नेमके- सुंदर शब्दचयन करते आणि विषयाचे आकलन आणि विस्तृतीकरण या आशयाच्या गोष्टी जमवते, हे पहिले कारण. तेव्हाच लय, नादादी बाह्य गोष्टीही उत्तम जमवून आणते, हे दुसरे कारण. ते तर बेसिक. त्याने कविता ग्रेट वाटायचे कारण नाही-नसते. मग काय? रूपक? प्रतिमा? हो. कवयित्री ‘विषय’ हा शब्दच प्रतिमा म्हणून अतिशय नेमकेपणाने वापरते, विभिन्न अर्थांनी वापरते, तेव्हा कविता ग्रेट वाटू लागते. ग्रेट का- तर तशा कृतीमध्ये एक सामान्य अर्थ आणि एक सूचक अर्थ, एकाचवेळी दडलेला आहे म्हणून. सामान्य अर्थाचे आकलन ‘बोल्ड!’ आणि ‘शी!’ अशा वरील दोन्ही प्रतिक्रिया देईल, पण मग आशयाचे काय? तो ज्याला हवा त्याने समजावा. नाही त्याने सोडवा, तरी कविता आवडते? कळली असे वाटते ना! हेच ते उत्तम कृतीचे लक्षण ! त्यामुळेच एखादी कृती भावते.
तर कवितेचा आवाका आणि रूपकातील ‘विषय’. यासाठी कविता टप्प्याने द्यावी लागेल.
विषयावारि बोल बदलती बदले धोरण देहाचे
विषयासाठी संग घडे वा भोगदास्य हे विषयाचे?
‘विषय’ या शब्दाचा पहिलाच उपयोग, ‘उद्देश’ या अर्थी आलेला आहे. पुढे अर्थात उद्देशानुसार शब्द आणि देहबोली बदलते, हे सामान्य निरीक्षण आहे. मग केवळ उद्देशासाठी माणूस संबंध जोडतो आणि असे करणे, स्वार्थासाठी संबंध जोडणे म्हणजे एक प्रकारचे ‘भोगदास्य’ आहे. इथे पहिल्या दोन ओळींतच कविता काय सांगू पाहतेय हे समजायला पाहिजे !
विषयामाजि बुद्धि भ्रष्टते, हीन हरण करी सीतेचे
विषयाकारण दंभ घडवतो वस्त्रहरण पांचालीचे
विषयाचे रूपकांतर ( उपमानाचे उपमेयाशी समरस होणे) हे पहिल्या दोन ओळीतच झाले आहे. ते आता स्वार्थ झाले आहे. इथे लक्षात घेऊया की रावणाने सीतेचे हरण केले होते, ते ‘भोगलालसे’ने निश्चितच नव्हे, हे आपल्याला माहीत असतेच. तर त्यामागे रावणाचे विविध स्वार्थ सांगितले जातात. पण हे स्वार्थ साधायचा त्याचा मार्ग भ्रष्ट आहे. त्याचवेळी दुसर्या वाक्यात विषय सामान्य दंभापायी आपल्याच भावांना संबंध किंवा स्थान दाखवणे या अर्थाने येतो. त्यासाठी द्रौपदीचा वापर भोगलालसेचा नाहीच, तरीही तो भ्रष्ट मार्गच होतो. एकाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्याला, विशेष करुन स्त्रीला सजा देण्याची ही प्रक्रिया गूढ़पणे विकृत आहे. इथे ‘विषय’ या शब्दाला सामान्य आणि गूढ अर्थाने एकाच वेळी वापरले जाते. हा चकवा प्रथमदर्शनी डोक्यावरून जातो.
विषयपंचका अधीन होता मनुजा वेसण तर्काचे
‘तर्क बुद्धीच्या कह्यात नसणे’ द्योत असे जरी विषयाचे
पंचेंद्रियांनी भोग घेणे ही आज माणसाची लालसा झालेली आहे, इथं विषय या शब्दाचा नुसता उपभोग हा अर्थ नाही तर द्रव्य हा आणखी एक अर्थ जोडलेला आहे. हे तुमचे-माझे आजच्या काळातील चित्रण आहे. उपभोगापाई द्र्व्यलालसेने माणसाची तर्कबुद्धी नष्ट झालेली आहे. असे कवयित्री सांगत असली तरी हव्यासाला तर्कबुद्धीचे वेसण कमी पडू नये असे सुचवते आहे.
विषयसुखा ना शाप म्हणावे असुन नसावे विषयाचे
विषयासक्ती रमतानाही भान असावे धर्माचे
मग काय विरक्त साधू-संन्यासी बनावे ? तर नाही. इथे रमण महर्षींचे एक वाक्य आठवले. For a Yogi, even if his material desires are fulfilled, he does not rejoice.’ म्हणजे योग्याला भान नसते, तर सामान्याने आजच्या जगातील ऐहिक सुखे उपभोगताना धर्माचे म्हणजे आपल्या मर्यादांचे भान राखावे. दुसर्याचे हक्क डावलून, खेचुन उपभोग घेणे ही मर्यादा नव्हे! दोन ओळीत कविता भलत्याच उंचीवर जाते.
विषय नसे जर जीविता का मग उरते असणे देहाचे?
मनास जपण्या प्रदान होती विषयपिंजरे मोहाचे
जर उपभोग नसेल, तर जीवन उरणार नाही ! किती समर्पक वाक्य आहे! मी सामान्यांसाठी वगैरे अवडंबरी शब्द वापरणार नाही. सगळ्यांनाच लागू असे म्हणू. इथे विषय हा इच्छा या अर्थी आलाय. इच्छा नसतील तर जगणे अशक्य होईल, इच्छा- हे मनाला जीवित ठेवणारे रसायन आहे, हे वैश्विक सत्य आलेले आहे. ग्रेट ओळी!
विषय टाळणे उत्तर नसते असते प्रजनन प्रश्नांचे
करून धिटाई आलिंगन दे, अवडंबर का विषयाचे?
मोह, इच्छा, आकांक्षा, पदार्थ, टप्पा, आटोका, उद्देश, द्रव्य असे जवळ-जवळ विषयाचे चौदा अर्थ होतात. ते सारे या शेवटच्या दोन ओळींत एकवटलेले आहेत. इच्छा- आकांक्षांचे दमन हे उत्तर नसते- तर ते अनेक नवे प्रश्न उभे करते. इथे कवयित्री स्त्री म्हणून स्वत:च्या जास्ती जवळ जाणारे विधान करते आहे, कारण शेवटी संसारापायी इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आदींचा बळी बहुदा स्त्रीलाच द्यावा लागतो. म्हणून धिटाई कर आणि आपल्या इच्छा, आकांक्षाना भीड- आपल्या जबाबदार्याचे अवडंबर करू नको, असा सल्ला कवयित्री समस्त स्त्री वर्गाला देते. इथे ही कविता वैश्विकतेकडून सुरू होऊन वैयक्तिक – अगदी आंतरिक होत संपते.
- मेघा देशपांडे ताई , हे असे ग्रेट काही साधणे, कष्टाने, सखोल विचार असतील तरच जमू शकते. मात्र ‘विषय’ या शब्दाला चिकटलेल्या ‘शुचिते’ने घोटाळा केला असे वाटते. पण असे घोटाळे, चकवे निर्माण करणे हे श्रेष्ठ कृतिचे कामच असते असे मला वाटते. शेवटी लोकांना आशय नकोय-असे मत मात्र आज दुर्दैवाने होते आहे.
-आभास आनंद
No comments:
Post a Comment