पवार मास्तर- २
पाचवीत येणं म्हणजे आमचं, “मेटामोर्फोसिस” होतं. प्रत्येक विषयाला नवे शिक्षक, इंग्रजी, हिन्दी वगैरे नवे विषय. मोठे झाल्याची जाणीव यात आम्ही पवार सरांना विसरलो. आम्हाला पी.टी. ला होते, शाळेत नव्यानेच आलेले राऊत सर. हे गोपाळजी हेमराज शाळेचे विद्यार्थी ते ज्युनिअर पवार सर सीनियर, म्हणजे इनडायरेक्टली आम्ही पवार सरांच्याच अंडर होतो. आमचा वर्ग कॉलनीतल्याच हुशार मुलांचा, आणि आमची कॉलनी ब्राह्मण बहुल. त्यामुळे लेले, जोशी, वैद्य, अभ्यंकर, कुलकर्णी वगैरे मुलं स्कॉलर असणं अपेक्षित होतं. अभ्यास आणि खेळ यांचे नाते विषम असल्यामुळे आम्ही खेळात निपुण असणं अभिप्रेत नव्हतंच. म्हणूनच आम्ही सकाळच्या सत्रात होतो ! तेव्हा शाळेच्या विद्यार्थ्यांची दोन प्रकारे विभागणी व्हायची. कॉलनी, अभिनव आणि परिसरातील हुशार मुलांचा एक वर्ग, त्याच परिसरातील इतर मुलांचा दुसरा वर्ग आणि नंतर बाहेरून, म्हणजे क्वार्टर रोड, डोंगरी, काजुपाडा, एक्सर इथून येणार्या मुलांचे दोन वर्ग. ही मुले बर्यांचदा मोठी, जुन्या एस.एस.सी. (अकरावी) ची फेल वगैरे असायची. त्यामुळे खेळात निपुण वर्गांची श्रेणी साहजिकच उलट्या क्रमाने व्हायची.
पाचवीत शाळेच्या खेळांच्या स्पर्धा आल्या. पाचवी ते सातवी मुलांसाठी लंगडी आणि कबड्डी स्पर्धा असायची. आम्ही फक्त इतर वर्गांना टफ फाइट द्यायची असं आम्हाला राऊत सरांनी बजावून सांगितलं. ते म्हणाले, “पवार सरांची मुलं ताकदीला आणि स्टॅमिन्यात भारी आहेत, शिवाय त्यांना सरांनी तयार करून घेतलंय. तुम्ही त्यांना घाबरू नका, टफ द्या.” हे सांगतांनाच राऊत सरांच्या चेहर्यावर आम्ही पुढे काय दिवे लावणार हे दिसत होतं. स्पर्धा सुरू झाली आणि अहो आश्चर्यम! निव्वळ समोरचा संघ जिंकावा म्हणून उभा केलेला आमचा संघ, समोरच्या संघांची दमछाक करायला लागला. नव्हे त्यांना हरवायला लागला. याला कारणं दोन- पहिलं म्हणजे लंगडीत आम्ही इतके बुटके आणि तुडतुडे होतो, की आम्हाला पकडणं कर्मकठीण होतं. आणि कबड्डीत आमच्याकडे एकमेव “हीरा” होता.. दिनेश फडणीस (म्हणजे सोनीच्या सी.आय.डी.तला फ्रेड्रिक्स!) हा सगळ्यांना त्याला पकडू द्यायचा आणि मग सगळ्यांना घेऊन मध्यरेषेकडे निघायचा! हुशार मुलांच्या वर्गाने अशा प्रकारे सगळ्यांच्या नाकी नऊ आणत स्पर्धा जिंकल्या. यातली खरी गोम अशी होती की आम्ही हुशार वगैरे नव्हतोच! मेंढ्यांच्या कळपात माकडं घुसावी तसे आम्ही त्या वर्गात होतो. सर गर्दीत उभे राहून आम्हाला टिपत होते. सहावीमध्ये आम्ही निवडक मुलं दुपारच्या सत्रात, पवार सरांच्या तावडीत पाठवले गेलो. खेळाडूंचा वर्ग तयार होत होता.
सहावीत आम्ही खर्या अर्थाने पवार सरांच्या ताब्यात आलो. चोगले हायस्कूल उपनगरात खेळांत बाप संघ होता. आम्हाला नाकी दम आणणारा दहिसर विद्यामंदिरचा संघ तयार करणारे ठाकूर , हे सरांचेच विद्यार्थी होते. सरांनी असे किती क्रीडा शिक्षक तयार केले असतील त्यांनाच माहीत. सहावीत आमची भीति खरी ठरली. आम्ही दुपारच्या सत्रात, समाजशास्त्र शिकवायला पवार सर. आता वांदा शिस्तीचा होता. शाळेत जरा उशीर झाला तर हातात तीन पट्ट्या घेऊन गेटवर पवार सर उभे. पट्ट्या खायच्या आणि बॅग ठेऊन मैदानाला भर दुपारी पळत दोन राऊंड मारायच्या. घामाघुम होऊन वर्गात शिरायचं, मग डोक्यात कशाला काय शिरतंय !
समाजशास्त्र म्हणजे बकवास विषय. कुणी काढला कोणास ठाऊक! कोणीतरी कुठेतरी लढाया केल्या म्हणून आमचे पराभव ! सालं साल लक्षात ठेवा! बरं, साले सालोसाल लढायचे ते लढायचे ; वर तह ही करायचे! म्हणजे आम्हाला पट्ट्या ! त्यात शिकवायला खवीस! मेलो होतो पा ऽऽ र आम्ही! पहिला दिवस पवार सर वर्गात येण्याचा, अजून आठवतोय. वर्गात एक- दोन नापास मुलं ही होती. सर अलेक्झांडर प्रमाणे वर्गात आले. पिनड्रॉप सायलेन्स. आल्याआल्या नापास मुलांची चौकशी केली. “यंदा नापास होणार नाही कुणी, नाहीतर… बूटांच्या सोलनी सोलून काढीन.” अशी सुरूवात. मग भुगोलाची पुस्तकं काढा सगळ्यांनी! पुस्तकं निघाली आणि सरांनी आपल्या बुलंद आवाजात सुरूवात केली, “ जगाऽ त खंड पा ऽऽ च!... आफ्रिका ऽऽऽ शेट्टी ऽ दुसरं सां ऽ ग!” राम्या शेट्टी बिचारा खेळातला चॅम्पियन, देश, प्रांत, खण्ड वगैरेंच्या भानगडीत कधीच नव्हता तो! घाबरत उभा राहिला… “ इं-डो-नि-शि-आ” शेट्टीने जगाच्या नकाशावर एक नवा खंड जन्माला घातला! वर्गभर कल्लोळ… आणि… पवार सर चक्क आपल्या दाढीत हसत होते! “ राम्या, बरोबर आहे ! इंडिया केवढा मोठा, त्यात आशिया जोडला की झाला इंडोनेशिआ!” आणि हा सिलसिला पुढे वर्षभर सुरू राहिला. पवार सरांचा तास म्हणजे हास्याचा कल्लोळ ! अशी उदाहरणं की मुद्दा विसरणंच शक्य नाही. इतिहास- भुगोलासारखा बिनडोक विषय.. पण सरांच्या बुलंद आवाजात तो एकदम सोपा होऊन गेला. कठीण गोष्टी लक्षात राहिल्या नाहीत तरी त्यावेळी वर्गात झालेला त्यावरचा विनोद लक्षात रहायचा आणि ती गोष्ट सरळ आठवायची! बघता-बघता समाजशास्त्र एकदम सोपं होऊन गेलं ! आम्ही सगळेच हायेस्टच्या स्पर्धेत ! पहिली चाचणी झाली. नापास मुलं इतर विषयांत फेल… पण समाजशास्त्रात… हायेस्टच्या स्पर्धेत! हा मी पाहिलेला चमत्कार होता. समाजशास्त्र रातोरात सोपं झालं नव्हतं; सरांनी ते सोपं केलं होतं! सर्व बुध्यांकाच्या मुलांसाठी! पहिल्याच तासाला आम्ही पवार सरां मधला धडकी भरवणारा शिक्षक विसरून गेलो. पहिल्याच दिवशी ते आपले झाले.. खूप आपले.. जन्मभरासाठी !
(क्रमश:)
nakkich.....पहिल्याच दिवशी ते आपले झाले.. खूप आपले.. जन्मभरासाठी !
ReplyDelete