पवार मास्तर- १
एखादा मास्तर जर भला दांडगा असेल, रागीट असेल, शिस्तीचा बडगा उगारूनच (हातात तीन पट्ट्या घेऊन, दाढी वाढवून) शाळेत फिरत असेल आणि मुलां-मुलींना कोणताही भेदभाव न ठेवता फटकावून (बुकलून?) काढत असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये त्या मास्तरची प्रतिमा काय असेल ? आजच्या दिवसांत तर पालक रोज आपल्या तक्रारी घेऊन शाळेत येतील आणि मुलं त्या शिक्षकाला अनेक टोपणनांवे ठेवतील. त्याचा साधा आदरही ठेवणार नाहीत, त्याला नेहमी पाण्यात पाहतील. असा एक शिक्षक जर वर्षांनुवर्षें कित्येक पिढ्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये अतिशय प्रिय होतो, त्यांच्या आठवणी शाळा सरल्यावरही मागे राहतात, त्यांच्या शिवाय शाळेचं अस्तीत्वच मान्य होत नाही आणि आम्ही त्यांचा मार खाल्लाय असं आमच्या शाळेतले विद्यार्थी आई-बाप झाल्यावर आपल्या मुलांना पार अमेरिके पर्यंत अभिमानाने सांगत असतात अशा मास्तराला काय म्हणाल ? अशा मास्तराला “पवार मास्तर” म्हणतात.
नांव, “आत्माराम शंकर पवार.” जन्म जून एकोणीसशे बत्तीस, पेशा शारीरिक शिक्षण (पी.टी.) शिक्षक, रहाणार भायखळा, पश्चिम. नोकरी बोरीवली स्टेशन पासून पूर्वेला दीड –दोन किलोमीटर दूर नॅशनल पार्कच्याही पुढे असलेल्या श्रीकृष्ण विद्यालय म्हणजेच चोगले हायस्कूल येथे. (तेव्हा बस ही नव्हती! सारा प्रवास चालत.) शाळेची वेळ १२:४५ वाजता, सर शाळेत हजर, बारा वाजता! (लेझिम असेल तेव्हा तर अकरा वाजता !) शाळा सुटणार पावणेसहाला, मग मैदानावर. सर घरी जाणार (बहुतेक वेळा) सात नंतर कधीही, सूर्य मावळून अंधार होण्याच्या वेळेवर. (मग ती वेळ कोणती ही असो.) इतर शिक्षक ( जवळच रहाणारे ) वेळेनुसार नोकर्या करत असतांना सर आपला धर्म जागत ( की जगत ?) होते. सर, आम्ही करंटे आम्हाला तेव्हा कळतंच नव्हतं, हा शिक्षक आम्हाला काय देतोय !
सर, फार उंच नाहीत, तरी ही पावणेसहा फूटांच्या आत- बाहेर. वर्ण सावळा, दाढी राखलेली. शरीर सातार्याच्या आणि पुढे भायखळ्याच्या तालमीत कमावलेले, कणखर ( ते पोलादी असावे) नजर भेदक, आवाजात जरब, नांवाचा दबदबा. (त्यांनी बोलावलंय हे नुसतं कळलं तरी पोरं लटपटायची.) सफेद शर्ट, राखी किंवा तत्सम रंगाची सैलसर पॅण्ट. वर राखी रंगाचं जॅकेट, शूज. हातात ब्रीफकेस हे त्यांचं रूप मनाच्या हार्ड डिस्कवर कायम कोरल्या सारखं उमटलंय. यू काण्ट डिलिट इट !
पवार सरांचा आवाज शाळेत आणि शाळेच्या मैदानावर कायम दुमदुमत असायचा. अख्ख्या शाळेला शिस्त लावायची जबाबदारी कोणीतरी या माणसाच्या खांद्यावर दिली होती. ( कोणीतरी म्हणजे मित्र आणि मुख्याध्यापक जोगळेकर सरांनी.) आणि हे शिस्त पालनांचं काम स्वराज्य मिळवणार्या शिवाजी महाराजां प्रमाणे (तशीच दाढी राखून) सर आयुष्यभर वाहत राहिले. चोगले हायस्कूलच्या शिस्तीचे अनभिषिक्त सम्राट होते ते. आणि सर्वांना ते तसेच आवडायचे. तुमचा आवडता शिक्षक जर गणित, विज्ञान किंवा इंग्रजीचा शिक्षक नसेल तर तुम्ही नक्की “ढ” असाल. पण सगळी चोगले हायस्कूलची मुलं हा ब्लेम अंगावर घेत अभिमानाने सांगतील की आमचे सर्वांत लाडके, आवडते, हीट, फेवरिट, कूल, ऑसम वगैरे, हे आमचे पी.टी. शिक्षक, पवार सर होते !
आम्ही प्रायमरीत असल्या पासूनच आमच्या कानावर त्यांची किर्ती दुमदुमत होती. त्यांनी कुणाला, कसा बुकलला आणि काय शिक्षा केली याचे किस्से व्हायचे. आम्ही दहशतीच्या सावटाखाली ते ऐकायचो. आपण पाचवीत येईपर्यंत आपला पवार सरांशी संबंध येणार नाही म्हणजे आपल्याला भीति नाही, म्हणून आम्ही निश्चिंत होतो. पाचवी जवळ यायला लागली तसं आमचं टेन्शन वाढू लागलं. पाचवीत आपल्याला सकाळचं सत्र मिळालं तर बरं असं सगळ्यांचं मत होतं. (सर दुपारच्या सत्राला होते.) पाचवीत आम्हा ( हुशार!?) मुलांचा वर्ग सकाळच्या सत्रात घेतला आणि आमची पवार सरांच्या तावडीतून सुटका झाली. सकाळी लवकर उठायला लागेल ही चिंता होतीच, पण पवार सरां पासून सुटका झाल्याच्या आनंदा पुढे ती काहीच नव्हती. आम्ही,“सुटलो” होतो!
(क्रमश:)
******

Amazing n mesmerizing.
ReplyDeleteWe miss u sir.
Yes we all miss you a lot Pawar Sir
ReplyDelete