खेळाडू असलो आणि म्हणून सरांना जवळचे असलो, तरी शिस्तीचे खाते सरांकडेच होते. त्यातून आमच्या सारख्या बेशिस्तांची सुटका नव्हती. त्यामुळे मार खाणे अधून-मधून होतच असे. शाळा घरा जवळच म्हणून जरा रेंगळलो , उशीर झाला की सर गेटवर... हातात 3 पट्ट्या. शाळे समोरचा रस्ता 100 एक मीटर अगदी सरळसोट. म्हणजे शिकारी आणि शिकार एकमेकांना मिनिट- दोन मिनिटे तरी न्याहाळत असत. पोर कल्पनेनेच खलास. आणि सर ?... हा मुलगा-मुलगी कोण आहे.. एकंदर शिस्तीला कसा/शी आहे? अभ्यासात-खेळात कसा/शी आहे ? याची गणिते जुळवून असत. उशीर झाल्याचा मार सगळ्यांना पडताना दिसायचा. बाहेरून सार्यांना एकच न्याय दिसायचा. फक्त मार खाणार्याला कळायचे- सरांनी आपल्याला मारलेच नाही. नुसते मार दिल्याचा आव आणला आणि पट्टीचा मोठा आवाज केला. आणि बेशिस्त मुलाचा मात्र हात लाल- निळा व्हायचा. हे सरांचे आणि आमचे गुपित होते. बाहेर अगदी मुख्याध्यापकांना ही याचा पत्ता नसेल.
अभ्यासात सरांमुळे आम्ही कधी नाही ते थोडे हुशार वगैरे वाटू लागलो होतो. आता वेळ होती, खेळाच्या मैदानावर सरांना हवे ते निकाल मिळवून देण्याची. त्यावेळी जोगेश्वरी ते दहिसर आंतरशालेय खेळांची चॅम्पियनशिप भरायची... आम्हाला ती ढाल मिळवायची होती. सर आमच्यावर कामाला लागले. दिवसभर अंधार पडेस्तोवर मैदानात. मोठी मुले खो-खो, कबड्डी, हाय- लॉन्ग जंप, रनिंग, जॅव्हलीन थ्रो, डिस्कस थ्रो यांचा सराव करत, मुलींचाही सराव चाले. ग्राऊंड झाडणे, रेषा आखणे, मातीवर पाणी मारून ती बसवणे, ही कामे पोरे सकाळी मोठ्या उत्साहात करायची. दोन अडीचशे मुले-मुली एकावेळी मैदानावर असतील. पण कुठे बेशिस्त नाही, वाद-भांडण नाही. छेडाछेड नाही. सगळ्यांचे लक्ष एकच, परफॉर्मन्स उंचावणे. सर खरोखर खेळांतले बेताज बादशहा होते. त्यांच्या एक-एक ट्रिक्स आणि टिप्स आम्हाला लगेच सरावात प्रयोग करायला लावत. जमले नाही तर करून दाखवत. पुढे थोडे वय झाल्यावर त्यांनी आमच्यातील माजी विद्यार्थ्यांवर हे काम सोपवले. पण तरीही स्वत: मैदानावर कधी ही, त्यांना बसलेले कुणी पाहिले नाही. सतत या पिच वरुन त्या पिचवर फेर्या. दुर्दैव या देशाला खेळांची परंपरा नाही ! सतत दोन महीने आमचा सराव सुरू होता. आम्ही आपापसात सराव सामने खेळत असू. सरांच्या मेहनतीचे फळ दिसू लागले होते. संघांचा दर्जा उंचावला होता.
बोरिवली पश्चिमेला सेंट फ्रान्सिस शाळेच्या मोठ्या मैदानावर या स्पर्धा होत्या. आम्ही गेलो की 'चोगले' ची मुलं किंवा पवार सरांची मुलं म्हणूनच सारे ओळखायचे. दबदबा होता आमचा एक... आमचा आणि दहिसर विद्यामंदिरचा सामना टफ व्हायचा. स्पर्धा सुरू झाल्या. आम्ही आणि छोट्या मुलींनी लंगडी स्पर्धा जिंकली. मोठ्या मुलांनी आणि मुलींनी खो-खो स्पर्धा जिंकल्या. कबड्डीत आम्हाला फायनलला सेन्ट फ्रान्सिसच्या संघाने हरवले. नेल्सन , पोल्सन , रॉबर्ट वगैरे धिप्पाड पोरे समोर, तरी आम्ही त्यांना टफ दिली. आमचा बेस्ट प्लेयर सतीश रेवाळेची पकड करणे त्यांना जमत नव्हते. शेवटी रॉबर्ट साखळी सोडून जमिनी सरशी बसून गर्दीत लपला. सतीशला दिसला नाही. मागून येऊन त्याने पकड केली. सतीशची पकड झाली आणि आम्ही हरलो. गोविंद देसाई आमचा बेस्ट खो-खो पटू आणि मुलींत वीणा सावंत, महाराष्ट्र राज्यासाठी निवडले गेले. हाच गोविंद बेस्ट स्प्रिंटर होता. ते ही मेडल त्याने आणले. उंच उडीत आमचा एक्का प्रकाश (पक्या) सावंत. हा अगदी सरळ धावत स्ट्रेट बॉडी हाय जंप मारणारा मी पाहिलेला पहिला आणि शेवटचा खेळाडू. तो पक्षासारखा हवेत उडायचा. 5'.4" हा त्याने स्पर्धेत तेव्हा केलेला रेकॉर्ड. आणि आम्ही जनरल शिल्ड जिंकली. बहुतेक स्पर्धात आम्ही विजेते किंवा उपविजेते होतो. सरांनी एक टारगेट समोर ठेवले आणि मेहनतीने ते साध्य केले होते. आमचे संघ जेव्हा समोरच्यांची हालत करून टाकायचे, तेव्हा सर कधीच पुढे -पुढे करताना दिसले नाहीत. ते कायम मागे, गर्दीत कुठेतरी, कुणाला दिसणारही नाही अशा ठिकाणी उभे असायचे. जी काय मेहनत करायची ती मी दोन महीने केलेली आहे, पुढे सगळं क्रेडिट मुलांचं ! सर- तुम्ही सर नाही.. मास्तरच होता.
सरांची आणखी एक खासियत म्हणजे लेझिम. हा लेझिम तेव्हा फक्त एक आमच्या शाळेत व्हायचा. मोठ्या स्पर्धांत वगैरे त्याची फार तारीफ व्हायची. त्या ज्या काही स्टेप्स आणि ताल होता, तो उत्कृष्ट होता. भर दुपारी उन्हात सर मुलांसोबत स्वत: लेझिम खेळायचे. हा लेझिम आणि ताल आम्ही आयुष्यभर विसरणे अशक्य आहे. पुढे अनेक शाळांनी आमच्याच विद्यार्थ्यांकडून तो बसवून घेतला. आजही काही शाळांत चालतो. आम्ही त्याला घाटी लेझिम म्हणायचो.. आणि इतरत्र जो लेझिम खेळला जातो, तो याच्या जवळपासही येत नाही. अगदी राष्ट्रीय स्पर्धांत दिल्लीला महाराष्ट्र संघाने केलेला लेझिमही याच्या जवळपास जात नाही. तेव्हा व्हिडिओ असता तर आज याची खात्री पटवून देता आली असती.
सरांचा बुलंद आवाज कितीही वर्षे झाली तरी जसाच्या तसा कानात गुंजतो आहे. सर आता समोर उभे आहेत, आपण मैदानावर आहोत, मास पीटी ची तालिम सुरू आहे. सर एखाद्या मुलीला,
"अगं म्हशी, अंग हलव- अंग हलव !" असा दम देताहेत.
पीटीचा सातवा (खतरनाक) प्रकार सुरू आहे, त्यात वारंवार ओणवे व्हावे लागते म्हणून राम्या शेट्टी टंगळ-मंगळ करतो आहे. वाकला तर पुन्हा उठतच नाही, तसाच वाकून राहतो. नाहीतर कधी-कधी जमिनीला हात न लावता गुडघ्याला लावून उभा राहतो आहे. सरांचे लक्ष आहे.
"आठ -सात-छे-पाच ... चार- तीन- फिर से !"
सर सातवा प्रकार पुन:पुन्हा करायला लावताहेत. आणि आता-
"शेट्टी- नीट - खाली-वाक- पाच-छे -सात-आठ." सुरू आहे...
"आठ-सात- हं-हं-" आणि पुढे शेट्टीच्या पाठीवर वाजणार्या धपाट्यांच्या तालावर सातवा प्रकार सुरू आहे. किंवा...
"मी बघतोय हं ! राम्या मी बघतोय हं!" की राम्या शेट्टी सूतासारखा सरळ-
कधीतरी-
"पुन्हा दिसलास तर पडे पर्यन्त मारीन आणि पडल्यावर ही मारीन !"
विसरणे शक्य नाही...
सरांचा बुलंद आवाज कितीही वर्षे झाली तरी जसाच्या तसा कानात गुंजतो आहे. सर आता समोर उभे आहेत, आपण मैदानावर आहोत, मास पीटी ची तालिम सुरू आहे. सर एखाद्या मुलीला,
"अगं म्हशी, अंग हलव- अंग हलव !" असा दम देताहेत.
पीटीचा सातवा (खतरनाक) प्रकार सुरू आहे, त्यात वारंवार ओणवे व्हावे लागते म्हणून राम्या शेट्टी टंगळ-मंगळ करतो आहे. वाकला तर पुन्हा उठतच नाही, तसाच वाकून राहतो. नाहीतर कधी-कधी जमिनीला हात न लावता गुडघ्याला लावून उभा राहतो आहे. सरांचे लक्ष आहे.
"आठ -सात-छे-पाच ... चार- तीन- फिर से !"
सर सातवा प्रकार पुन:पुन्हा करायला लावताहेत. आणि आता-
"शेट्टी- नीट - खाली-वाक- पाच-छे -सात-आठ." सुरू आहे...
"आठ-सात- हं-हं-" आणि पुढे शेट्टीच्या पाठीवर वाजणार्या धपाट्यांच्या तालावर सातवा प्रकार सुरू आहे. किंवा...
"मी बघतोय हं ! राम्या मी बघतोय हं!" की राम्या शेट्टी सूतासारखा सरळ-
कधीतरी-
"पुन्हा दिसलास तर पडे पर्यन्त मारीन आणि पडल्यावर ही मारीन !"
विसरणे शक्य नाही...
खेळात लाडके झालो तरी सरांचे आमच्या अभ्यासाकडे लक्ष असे. आमच्या सार्या बाईंकडे ते वेळोवेळी आमचा अभ्यास कसा आहे याची चौकशी करत. कमी मार्क्स असतील त्याला मी संघातून काढून टाकेन ही धमकी. हा धोका कोण घेतो ? संघात नसणे ही नापास होण्यापेक्षा भयंकर शिक्षा होती आमच्यासाठी. मग झक मारून अभ्यास करून, बाईंची कंप्लेन्ट सरांकडे जाणार नाही याची दक्षता आम्ही घ्यायचो. शिस्त, अभ्यास आणि खेळामुळे शरीर... सारे कणखर केले सरांनी. आम्हाला पोहता यायला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. मग मोठ्या मुलांसह आम्ही शनिवारी शाळा सुटली की नॅशनल पार्कात काकडपट्टीला ! दोन तास डुबक्या मारून कपडे दगडावर वाळवून, घरी फेक मारत आम्ही पोहायला शिकलो. नुसते शिकलो नाही तर पाण्यातले मासे झालो. सगळे स्ट्रोक्स, सूर , अंडर वॉटर, प्रवाह कापणे.. सगळी तालिम झाली. बटरफ्लाय पासून बॅकस्ट्रोक पर्यन्त सार्यांचे मास्टर झालो. या सार्या बरोबरच आमच्या वर्गाचा क्रिकेटचा संघ तयार झाला. आमच्याशी मॅच घ्यायलाच कोणी तयार नसे. घाबरायचे, इतकी सॉलिड टीम. आंड्या (अनिल) महाजन काय बोलिंग टाकायचा माहीत नाही, पण 'आंड्या उडवतो दांडया...' हे गाणे तेव्हा पोरं सूरात म्हणायची. मी- संजू वैद्य एकदा बॅट धरली की आऊटच व्हायचो नाही. समोरच्या संघाने कित्येकदा आमचा 100 ला नो लॉस स्कोअर असताना सामना सोडून दिलाय ! या क्रिकेटसाठी आम्हाला कन्सेशन देऊन खो-खो, कबड्डीच्या नावाखाली बाहेर सोडायचे, सर. ( अभ्यास जोवर ठीक आहे तोवर काहीही करा !)
मोठे झालो तसे आम्ही खो-खो आणि कबड्डीच्या संघात आलो. सरांचे ते ट्रेनिंग जबरदस्त होते. हात कैची- पाय कैची, मुंडी दाब , सूर पकड , साखळी ने वजन टाकणे .. ( सर स्वत: लाल मातीची कुस्ती खेळलेले. त्यातले डाव पकड करायला वापरुन दाखवत. ) आपला सीआयडी फेम 'फ्रेड्रिक्स' दिनेश फडणीस याचा बादशहा होता. सर्व्हिस टाकताना पाय पकड कशी चुकवायची, रिंगणावरून जंप करून कसे निसटायचे हे आज लिहितानाही शहारे येतात. खो-खो साठी आम्हाला इतके चपळ केले, डॉजिंग , ड्रिबलिंग, सिंगल चेंन, डबल चेंन, शेवटी रिंग टाकणे हे घोटावून घेतले तर पकड करताना, चेन तोडणे, रिंग तोडणे, एक पाठ सोडून बाहेरच्यावर अचानक सूर मारणे, खुंट्यावर घेणे आणि खुंटा मारणे याचे मास्टर झालो आम्ही. खरंच सर आमच्या या ऑलराऊंड होण्याला किती जबाबदार होते ते आज लक्षात येतंय. या सार्या ट्रेनिंग नंतर सामन्यांमध्ये आम्ही भल्या-भल्यांची भंबेरी उडवायचो. चॅम्पियन होतो आम्ही. आमच्या मनात आम्ही चॅम्पियन आहोत ही भावना जागवली सरांनी. पुढे क्रिकेटमध्ये आम्ही मुंबईभर मैदाने गाजवली, तिथे ही चॅम्पियन ठरलो. कुठल्याही क्षेत्रात उतरायचे ते चॅम्पियन बनायलाच, हे सरांनी मनावर ठसवले. अगदी राडे करायचे ते ही प्रोफेशनली . समोरचा गुंड असला तरी त्याला धडकी भरली पाहिजे, हे तत्व. (सर स्वत: एकेकाळी मुंबईत, त्यातही भायखळ्याला भाईगिरी करून चुकले होते ! आम्ही हत्यारे कोणती वापरायची, कुठे आणि कसे मारायचे, स्वत:ला सेफ कसे ठेवायचे हे सारे सर सांगत. हे सारे फक्त आले अंगावर तर घेतले शिंगावर यासाठीच.. हे बजावायचे. पुढे मुंबईतल्या काही मोठ्या भाईंशी नडायचा योग आला... तो सरांच्या शिकवणीने निभावून नेला. मोठे पंगे घेतले. मुंबईच्या भाई सर्किटमध्ये ओळखी झाल्या. नामचीन भाईलोक नावानिशी ओळखू लागले. ते तेव्हढेच ठेवले.
सरांच्या वैयक्तिक आयुष्यात गावस्करबाई आल्या. त्यांनी लग्न केले. आम्ही शाळा सोडून पुढे गेलो तरी शाळेत खेळ शिकवायला आणि स्पर्धा निमित्ताने जाणे व्हायचे. सर म्हणायचे, तुमच्यासारखे मातीत घोळायला तयार नाही कुणी. ही पोरं नाही तेव्हढ्या दमाची. मग सर रिटायर्ड झाले. भायखळ्याची राहती जागा भाच्याला दिली आणि सातार्याला गेले. मध्ये 2005 ला आम्ही सार्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर ठरवले, शिक्षकांना बोलवायचे ठरले. सार्यांचे संपर्क मिळवले. सरांना सातार्याला फोन केला तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नसायची. फोन गावस्कर बाईंनी घेतला. सरांना म्हणाल्या आभास आहे फोनवर. सरांचा आवाज आला दे, मला आठवतोय तो ! भरभरून बोलले. प्रकृतीमुळे येता येणार नाही म्हणाले. मग आम्हीच सातार्याला जायचे ठरले. गावस्कर बाईंना म्हणालो,
"सर आवाजावरून वीक वाटताहेत.. काळजी घ्या त्यांची."
बाई म्हणाल्या, "सरांना काय होतंय, त्यांची काळजी घ्यायला मी आहे ना खमकी !"
अशा खमक्या बाई थोड्याच दिवसात... सरांच्या आधीच गेल्या. सर एकटे पडले... मुल-बाळ कोणी नाही. पुन्हा भायखळ्याला भाच्याकडे येऊन राहू लागले. आणि परवा अचानक आशीष महाजनने फोन केला... सर परवा गेले. मी जाऊन येतोय...तू येतोस का? कामामुळे जमले नाही. तो गेला आणि सरांचा फोटो घेऊन आला. इथे टाकावा न टाकावा... म्हातारपण कुणाला चुकलंय ... पण आमचा शेर... आमचा हीरो... अमजद खान, आम्हाला तसाच लक्षात ठेवायचा होता.. दाढीधारी, कुरळ्या केसांची बट तश्शीच. तसंच ते मान तिरपी करून भेदक नजरेने गिळून टाकणे. कणखर, दणदणीत ! पण इथे हा फोटो देतोय तो जबाबदारी म्हणून. सार्या विद्यार्थ्यांना त्यांचे अंतिम काळातले दर्शन व्हावे म्हणून.
पवार सर- उत्तरायुष्यातील फोटो.
सर मला खात्री आहे की स्वर्ग आणि इतर यांच्यात वर खेळांचे सामने सुरू असतील. तुम्ही देवांना पकडी, युक्त्या शिकवत असाल. देव आणि दानवांच्या राड्यांत कुठली हत्यारे वापरायची, कुणाला कसा घ्यायचा, राख कशी द्यायची हे तुम्ही शिकवल्याने देवांचा विजय अटळ असेल. रंभा, उर्वशी आणि इतर अप्सरांना तुम्ही घाटी लेझिम शिकवला असेल... आणि असा प्रकार स्वर्गाने गेल्या लाखो वर्षांत पाहिला नव्हता.. हे इंद्राला देखील मान्य असेल.. सरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
- आभास आनंद
आक्टोबर 2012
.jpg)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteआभास! अप्रतिम व्यक्तिचित्र आहे! खूपच छान! आम्ही सकाळच्या सत्रात नऊ वर्षं काढल्यामुळे या सगळ्याला मुकलो पण त्याची भरपाई मी दहाव्या वर्षी आपल्या वेळच्या शाळेच्या लेझिम पथकात सामील होऊन पार पाडली... ते माझं स्वप्नं होतं...
ReplyDeleteछावा होता यार तो... आजच्या भाषेत..
तांबरलेले, रोखलेले डोळे, केसांचा डोक्याच्या कोपर्यावर आलेला कुरळा फुगा... गडद रंगाचा इनशर्ट आणि गडद ढगळ पॅंट... वर निळं खादीचं जाकीट, खास खादीचं ते पांढर्या ठिपक्यांची नक्षी असलेलं कापड... तेव्हा नुकताच शोले रिलिज झालेला आठवतोय... गब्बर वाटतात सर! म्हणून आम्हीच नको तेवढे खूष व्हायचो आणि छावा... तो अर्धवट बांधकाम झालेल्या शाळेच्या स्टेजच्या कठड्यावर एक पाय ठेऊन डिट्टो तसाच उभा असायचा... गब्बरसारखा...
तू इथे टाकलेला फोटो बघून गलबलून आलं... सरांना ते चाललं नसतं...
सर.. विनम्र श्रद्धांजली...
विन्या, इतकं सुंदर वर्णन तूच केलंयस की हे लेखात पाहिजे होते असे वाटते! धन्यवाद मित्रा!
ReplyDelete