Tuesday, November 3, 2015

०७. गोष्टी सांगणारा माणूस.... चक्रमादित्याची भिंगरी


चक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.
त्याने पुन्हा जाड ग्रंथ घेतला आणि तो पुन्हा म.सा.वा.त गेला,
जवळचा जाड ग्रंथ त्याने काउंटरवरुन समोरच्या चश्मिष्ट पोरीकडे सरकवला
आणि वजनाने त्याहून जाड ग्रंथ सापडतो का? याची शेल्फमध्ये पाहणी करू लागला.
अलिकडे ग्रंथांचे वजन वाढवित जाऊन चश्मिष्टेवर आपले वजन वाढवावे,
या प्रयत्नात त्याला शब्दकोश, बखरी आणि सन्दर्भग्रंथ गिळावे लागत होते.
डोक्याची पार अक्षररद्दी झालेली, आणि चश्मिष्ट ढिम्म्!
वेव्हलेंग्थ जुळावी म्हणून त्याने मित्राचा चष्मा देखील वापरायला सुरुवात केली होती.
रिणामी डोके ठणकू लागले होते, हा बोनस. साला एक चष्मा आदमी को चक्रम बना देता है।
पावणेदोन किलोचा ग्रंथ बदलून चक्रमाने एक किलो आठशे ग्राम वजनाचा ग्रंथ घेतला.

चश्मिष्टेकड़े दिला.
"हा कसा आहे?" बोलबचन सुरू!
"त्याचा काय उपयोग नाही व्हायचा... तुम्हाला!"
चक्रमाने ग्रंथाचे नाव पाहिले,
'भिंगांच्या योगे वशीकरण'
चमकून त्याने समोर पाहिले.
चष्मा आता एका हाताने, मंगळसूत्र खेळवत होता.

इतकावेळ ते ओढणीमागे दडले होते.

चक्रमाच्या भिंगाची शंभर शकले झाली आणि त्याच्याच पायावर लोळू लागली!

०६. गोष्टी सांगणारा माणूस... विचारवंत


संपूर्ण वनात कपि आणि रीछ, हे दोनच कलाकार होते.
ते काही चेष्टा करत, वेडेवाकडे चेहरे करत, त्यामुळे साऱ्या वनात ते परिचित होते.
ते वनात कुठेही गेले तरी सारे जंगल त्यांच्या भोवती दाटे, त्यांच्या सह्या घेई. त्यांच्यासोबत सेल्फ़ी काढत.
अशा रीतीने वनात नावारुपाला आल्याने, वनदर्शन वाहिन्या, वंटास (वन टाइम्स) वगैरे त्यांच्या मुलाखती घेत.
पुढे जेव्हा वनात अराजक माजले, तेव्हा त्यावर विश्लेषण, भाष्य करायला माध्यमांना विचारवंत सापडेनात.
त्यांचे नंबर्सच कुणाकडे ...नव्हते, ते दिसतात कसे? हे ही कुणास माहीत नव्हते,
शिवाय त्यांना वेडयावकडया चर्या करता येतात की नाही? याचीही काही नोंद नव्हती.
आपला TRP गिरू नये म्हणून मग कपि आणि रीछ यांनाच सेफर साइड म्हणून विचारवंतांची भूमिका दिली गेली.
वनजनांनी ते हसत खेळत मान्य केले. त्यांना कुठे विचार करायचा होता?
इथवर सारे ठीक आणि परंपरेनुसारच झाले.......
पुढे कपि आणि रीछ स्वत:ला खरोखरीचे विचारवंत समजू लागले !
त्याचे काय करायचे? हा नवा प्रश्न वनराजासमोर उभा राहिला.

०५. गोष्टी सांगणारा माणूस... जगाची गोष्ट


एकदा एका गावातील पुजाऱ्याला गावाबाहेर एक विचित्र आकाराचा दगड दिसला.
बघताक्षणी त्याला कळले की यात दैवी अंश आहे.
याचे मंदिर केले तर जगाचे कल्याण होईल.
गेली काही वर्षे तो स्वत:ला जग म्हणवत होताच.
पण दैवी पत्थर नुसता गावात आणण्यात मतलब नव्हता.
त्यात जगाचे तितकेसे भले झाले नसते.
म्हणून जगहितार्थ पुजाऱ्याने एक स्वप्न आणले.
त्या स्वप्नात येऊन विधात्याने दृष्टांत दिला की, दैवी पत्थराची शरण्योपचारे प्रतिष्ठापना केली, तर सर्वत्र भरभराट होईल.
त्यानुसार गावकरी वागले आणि लवकरच पत्थर त्या गावाचे कुलदैवत झाला.
काहीच बदलले नाही.....
फ़क्त जगाची लवकरच भरभराट झाली.

Sunday, November 1, 2015

०४. गोष्टी सांगणारा माणूस... पुस्तिका


खांडववनातील वैद्य कोल्हे यांनी आपली पदवी, वनातील आरोग्यमंत्र्यांना मधे घालून अधिकृत करून घेतली.
मंत्र्यांसाठी शिक्षणाची अट नसली तरी त्यांना धोरणे ठरवायचा अधिकार होता. काय योग्य आणि काय नाही,
 हे ते आपल्या मर्जीने, मर्जीतील प्राण्यांसाठी ठरवित असत...
पदवी अधिकृत करताना कोल्हे यांच्यावर काही अटी होत्या.
म्हणजे रोगाचे निदान करण्यास वैद्यबुवांना परवानगी नव्हती.
त्यासाठी एक पुस्तिका ठेवलेली होती, त्या पुस्तिकेत पाहून रोग निश्चिती केली जाई.
आपले सेवाकेन्द्र उघडल्यावर तिथे पहिलाच रूग्ण आला, खरगोश.
तो शुभ्र असल्याने त्यात वरून काही खोट दिसत नव्हती.
ज्यात वरकरणी दोष दिसत नसेल त्याचा एक्स रे काढावा, असे पुस्तिकेत लिहिले होते.
त्या प्रमाणे एक्स रे काढला गेला. स्लाइड सगळी हिरवीगार आली.
पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे हा देशद्रोह होता.
त्याप्रमाणे खरगोशास देशद्रोह हा रोग जडल्याचे निश्चित झाले.
हा सारा उपचार बाजूने पाहणारा हत्ती वनात सर्वांत बुद्धिमान समजला जाई.
त्यामुळे तो समाजास मार्गदर्शन करे आणि नेहमी स्वत:ला सत्य वाटेल तेच बोले.
त्याने यावर तीव्र नापसंती दर्शवली. हा अन्याय आहे, खरगोश देशद्रोही नाही.
तुमची पुस्तिका निर्बुद्ध आहे. पण त्याचे कोणीच ऐकेना.

शेवटी पुस्तिका म्हणजे पुस्तिका !!
 

०३. गोष्टी सांगणारा माणूस... अक्क sss ल् !!


चोर बाजारात एक माणूस अक्कल विकायला बसला होता.
तो काही करत नव्हता... त्याचे सेलपिच म्हणजे फक्त ...एकच शब्द,
तो मध्येच उंच स्वरात ओरडे, ...
"अक्क ssss ल !"
बघता-बघता पब्लिक जमा झाली,
मदार्‍याचा खेळ सुरू असल्यागत लोकांचा घोळका जमला.
माणसासमोर एक टोपली उपडी ठेवलेली. खाली काही झाकल्यासारखी.
"अक्क ssss ल !"
लोक कन्फ्युज. कोण हा? याने अक्कल कुठून मारली?
ती विकायचा याला अधिकार काय?
त्या एका शब्दाखेरीज विक्रेता काही बोलता नव्हता.
त्याला टोपली उचलायला सांगितली- तर उचलत नव्हता.
मग गर्दीने बाजूच्याच चौकीतून हवालदाराला पकडून आणला.
"साहेब, अक्कल विकतोय, पहा! घ्या, आत घ्या साहेब!"
हवालदाराने दंडुका टोपलीवर हापटला.
"काय हाय आत? उगड !"
"उगडतो सायब, पर आदी जवाब द्या, बडी काय? अक्कल की भैस?"

हवालदाराने टोपी हातात घेतली. आपले झीरो मशीन मारलेले डोके कराकरा खाजवत तो विचार करत राहिला... टोपलीखाली काय असेल?
अक्कल की भैंस?
चतुर वाचक अर्थात....

-आभास आनंद

Saturday, October 31, 2015

०२. गोष्टी सांगणारा माणूस- हेलपाटी

वासरी...

एकदा एक गाढव होतं. साधं-सुधं, सीधं गाढव.
घर ते घाट, घाट ते घर, असा नेमुन दिलेला प्रवास करणारं, एक गाढव.
दिवसभर ते ओझी वाही, मर-मर कष्ट करी, पण ना कधी कौतुकाचे शब्द, ना कधी पोटभर अन्न.
त्याच्या कष्टावर मालक आपल्या कातडीखालची चरबी वाढवत होता.
या गोष्टीचं त्याला तसं दु:ख नव्हतं. जगाचा नियम म्हणून त्याला हे मान्य होतं.
पण त्याच्याच श्रमावर जगणारं मालकाचं ऐतखाऊ कुत्रं जेव्हा त्याच्यावर ताव खाऊन भुंके,
तेव्हा त्याला मरणान्तिक यातना होत.
परमेश्वरच्या अस्तित्वाबद्दल, असल्यास त्याच्या न्याय देण्याच्या क्षमतेबद्दल प्रचंड अविश्वास, त्याच्या मनात दृढ़ होत जाई.
 आत्महत्या करून हे क्षुद्र जीणे संपवून टाकावे असे त्याला होई....
अशा रीतीने दुसरे दिवशी ते पुन्हा उठे, घर ते घाट, घाट ते घर, ओझी वाही....
 

Friday, October 30, 2015

०१. गोष्टी सांगणारा माणूस... दर्शनी वृद्धी...

दर्शनी वृद्धी...
बादशहाच्या दरबारात एका विद्वानाने प्रश्न केला, "असं काय आहे, जे सतत वाढतं, पण दिसत नाही?" जो योग्य उत्तर देईल त्याला सहस्त्र सुवर्णमुद्रा मिळतील.
...
"ज्ञान! बुद्धी!!" वगैरे उत्तरे आली.
"साफ़ चूक!" विद्वान् हसला,
"वय." विद्वान् उत्तरला.
यावर सर्व विद्वानावर तुटून पडले.
" हा खोटारडा आहे! मुद्रा द्याव्या लागू नयेत, म्हणून शब्दच्छल करतोय!"
"आम्ही काय उन्हात पांढरे केलेत? ज्ञान, बुद्धी ही बरोबर उत्तरे आहेत. जहाँपनाह, याच्या मुद्रा काढून आम्हाला द्यायची आज्ञा करा!"
यावर बादशहाने विद्वानाला प्रश्न केला,
" तू जर वाढ होऊन न दिसणारी गोष्ट सिद्ध केली नाहीस, तर तू सहस्त्र मुद्रा गमावशील."
"ती आधीच सिद्ध झाली आहे, खाविंद! या दरबारी पंडितांनी ती आत्ताच सिद्ध केलीय!"
"अच्छा, ती कशी?"
"जहाँपनाह, प्रत्येक माणसात सतत वाढतो पण दिसत नाही, तो आहे अहंकार! आपण बरोबर आहोत असे वाटणे वेगळे आणि फ़क्त आपण बरोबर, असे वाटणे वेगळे, जे वयासोबत वाढत जाते. हे तुझे पंडित ते सिद्ध करून चुकलेत!
सतत वाढतो, तो अहंकार...
-आभास आनंद