Tuesday, November 3, 2015

०५. गोष्टी सांगणारा माणूस... जगाची गोष्ट


एकदा एका गावातील पुजाऱ्याला गावाबाहेर एक विचित्र आकाराचा दगड दिसला.
बघताक्षणी त्याला कळले की यात दैवी अंश आहे.
याचे मंदिर केले तर जगाचे कल्याण होईल.
गेली काही वर्षे तो स्वत:ला जग म्हणवत होताच.
पण दैवी पत्थर नुसता गावात आणण्यात मतलब नव्हता.
त्यात जगाचे तितकेसे भले झाले नसते.
म्हणून जगहितार्थ पुजाऱ्याने एक स्वप्न आणले.
त्या स्वप्नात येऊन विधात्याने दृष्टांत दिला की, दैवी पत्थराची शरण्योपचारे प्रतिष्ठापना केली, तर सर्वत्र भरभराट होईल.
त्यानुसार गावकरी वागले आणि लवकरच पत्थर त्या गावाचे कुलदैवत झाला.
काहीच बदलले नाही.....
फ़क्त जगाची लवकरच भरभराट झाली.

Sunday, November 1, 2015

०४. गोष्टी सांगणारा माणूस... पुस्तिका


खांडववनातील वैद्य कोल्हे यांनी आपली पदवी, वनातील आरोग्यमंत्र्यांना मधे घालून अधिकृत करून घेतली.
मंत्र्यांसाठी शिक्षणाची अट नसली तरी त्यांना धोरणे ठरवायचा अधिकार होता. काय योग्य आणि काय नाही,
 हे ते आपल्या मर्जीने, मर्जीतील प्राण्यांसाठी ठरवित असत...
पदवी अधिकृत करताना कोल्हे यांच्यावर काही अटी होत्या.
म्हणजे रोगाचे निदान करण्यास वैद्यबुवांना परवानगी नव्हती.
त्यासाठी एक पुस्तिका ठेवलेली होती, त्या पुस्तिकेत पाहून रोग निश्चिती केली जाई.
आपले सेवाकेन्द्र उघडल्यावर तिथे पहिलाच रूग्ण आला, खरगोश.
तो शुभ्र असल्याने त्यात वरून काही खोट दिसत नव्हती.
ज्यात वरकरणी दोष दिसत नसेल त्याचा एक्स रे काढावा, असे पुस्तिकेत लिहिले होते.
त्या प्रमाणे एक्स रे काढला गेला. स्लाइड सगळी हिरवीगार आली.
पुस्तिकेत लिहिल्याप्रमाणे हा देशद्रोह होता.
त्याप्रमाणे खरगोशास देशद्रोह हा रोग जडल्याचे निश्चित झाले.
हा सारा उपचार बाजूने पाहणारा हत्ती वनात सर्वांत बुद्धिमान समजला जाई.
त्यामुळे तो समाजास मार्गदर्शन करे आणि नेहमी स्वत:ला सत्य वाटेल तेच बोले.
त्याने यावर तीव्र नापसंती दर्शवली. हा अन्याय आहे, खरगोश देशद्रोही नाही.
तुमची पुस्तिका निर्बुद्ध आहे. पण त्याचे कोणीच ऐकेना.

शेवटी पुस्तिका म्हणजे पुस्तिका !!
 

०३. गोष्टी सांगणारा माणूस... अक्क sss ल् !!


चोर बाजारात एक माणूस अक्कल विकायला बसला होता.
तो काही करत नव्हता... त्याचे सेलपिच म्हणजे फक्त ...एकच शब्द,
तो मध्येच उंच स्वरात ओरडे, ...
"अक्क ssss ल !"
बघता-बघता पब्लिक जमा झाली,
मदार्‍याचा खेळ सुरू असल्यागत लोकांचा घोळका जमला.
माणसासमोर एक टोपली उपडी ठेवलेली. खाली काही झाकल्यासारखी.
"अक्क ssss ल !"
लोक कन्फ्युज. कोण हा? याने अक्कल कुठून मारली?
ती विकायचा याला अधिकार काय?
त्या एका शब्दाखेरीज विक्रेता काही बोलता नव्हता.
त्याला टोपली उचलायला सांगितली- तर उचलत नव्हता.
मग गर्दीने बाजूच्याच चौकीतून हवालदाराला पकडून आणला.
"साहेब, अक्कल विकतोय, पहा! घ्या, आत घ्या साहेब!"
हवालदाराने दंडुका टोपलीवर हापटला.
"काय हाय आत? उगड !"
"उगडतो सायब, पर आदी जवाब द्या, बडी काय? अक्कल की भैस?"

हवालदाराने टोपी हातात घेतली. आपले झीरो मशीन मारलेले डोके कराकरा खाजवत तो विचार करत राहिला... टोपलीखाली काय असेल?
अक्कल की भैंस?
चतुर वाचक अर्थात....

-आभास आनंद

Saturday, October 31, 2015

०२. गोष्टी सांगणारा माणूस- हेलपाटी

वासरी...

एकदा एक गाढव होतं. साधं-सुधं, सीधं गाढव.
घर ते घाट, घाट ते घर, असा नेमुन दिलेला प्रवास करणारं, एक गाढव.
दिवसभर ते ओझी वाही, मर-मर कष्ट करी, पण ना कधी कौतुकाचे शब्द, ना कधी पोटभर अन्न.
त्याच्या कष्टावर मालक आपल्या कातडीखालची चरबी वाढवत होता.
या गोष्टीचं त्याला तसं दु:ख नव्हतं. जगाचा नियम म्हणून त्याला हे मान्य होतं.
पण त्याच्याच श्रमावर जगणारं मालकाचं ऐतखाऊ कुत्रं जेव्हा त्याच्यावर ताव खाऊन भुंके,
तेव्हा त्याला मरणान्तिक यातना होत.
परमेश्वरच्या अस्तित्वाबद्दल, असल्यास त्याच्या न्याय देण्याच्या क्षमतेबद्दल प्रचंड अविश्वास, त्याच्या मनात दृढ़ होत जाई.
 आत्महत्या करून हे क्षुद्र जीणे संपवून टाकावे असे त्याला होई....
अशा रीतीने दुसरे दिवशी ते पुन्हा उठे, घर ते घाट, घाट ते घर, ओझी वाही....
 

Friday, October 30, 2015

०१. गोष्टी सांगणारा माणूस... दर्शनी वृद्धी...

दर्शनी वृद्धी...
बादशहाच्या दरबारात एका विद्वानाने प्रश्न केला, "असं काय आहे, जे सतत वाढतं, पण दिसत नाही?" जो योग्य उत्तर देईल त्याला सहस्त्र सुवर्णमुद्रा मिळतील.
...
"ज्ञान! बुद्धी!!" वगैरे उत्तरे आली.
"साफ़ चूक!" विद्वान् हसला,
"वय." विद्वान् उत्तरला.
यावर सर्व विद्वानावर तुटून पडले.
" हा खोटारडा आहे! मुद्रा द्याव्या लागू नयेत, म्हणून शब्दच्छल करतोय!"
"आम्ही काय उन्हात पांढरे केलेत? ज्ञान, बुद्धी ही बरोबर उत्तरे आहेत. जहाँपनाह, याच्या मुद्रा काढून आम्हाला द्यायची आज्ञा करा!"
यावर बादशहाने विद्वानाला प्रश्न केला,
" तू जर वाढ होऊन न दिसणारी गोष्ट सिद्ध केली नाहीस, तर तू सहस्त्र मुद्रा गमावशील."
"ती आधीच सिद्ध झाली आहे, खाविंद! या दरबारी पंडितांनी ती आत्ताच सिद्ध केलीय!"
"अच्छा, ती कशी?"
"जहाँपनाह, प्रत्येक माणसात सतत वाढतो पण दिसत नाही, तो आहे अहंकार! आपण बरोबर आहोत असे वाटणे वेगळे आणि फ़क्त आपण बरोबर, असे वाटणे वेगळे, जे वयासोबत वाढत जाते. हे तुझे पंडित ते सिद्ध करून चुकलेत!
सतत वाढतो, तो अहंकार...
-आभास आनंद

Tuesday, March 24, 2015

विषय ... वासना , कविता...इत्यादी


कवितेचे विश्लेषण करायला बसणे, ही एक दुर्दैवी गोष्ट आहे. ती वेळ आपल्या वैर्‍यावरही येऊ नये, असे मला प्रामाणिकपणे वाटते. याचे कारण विश्लेषण ही एक अत्यंत वैयक्तिक बाब आहे. तिचे युनिवर्सल नियम असू शकत नाहीत, तसेच जरी मी जॉनर बेस्ड समीक्षेचा पुरस्कर्ता असलो, तरी शेवटी ती ही तुलना अनेकदा अस्थानी ठरू शकते, या मतापर्यंत आलेला आहे. कलाकृतीला असे नियम लावता नयेत. तुलना ही देखील शेवटी वैयक्तिक बाब आहे.

तर आता... विषय... परवाच मी शेयर केलेली, नागपूरच्या कवयित्री, मेघा देशपांडे यांची, याच नावाची कविता. त्या ओघाने उभे राहिलेले काही मुद्दे. विषयच काय, शब्दांचेसुद्धा Taboo होणे. आपल्या नकळत, आपण शब्द, मुद्दे, ‘विषय’ वाळीत टाकतो का? तर हो. माझे काही मित्र ‘हिंदू’ आहेत- त्यांनी सेक्युलर, समाजवादी, पुरोगामी या शब्दांना असेच वाळीत टाकलेले आहे. मग माझे समाजवादी/ पुरोगामी मित्र काय आहेत? त्यांनीही असेच शब्दांना वाळीत टाकलेले आहे. ‘हिंदू’ म्हटले की त्यांचे तेच होते जे संघ कार्यकर्त्याचे ‘सेक्युलर’ म्हटल्यावर होते.

विज्ञाननिष्ठेचा इतका चुकीचा पगडा बसलेला आहे- की परवा मित्र महेश पवारांच्या ‘नेहालय’ वर मी एका प्रयोगासंबंधात ‘एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन’ हा शब्द वापरला. तो आमच्या पत्रकार मित्रांनी त्वरित मोडून काढला, कारण तो तर खोटा/ अवैज्ञानिक विषय! अशा वेळी त्या शब्दाला मूळ काही अर्थ आहे. त्या अनुषंगाने समोरचा त्याचा वापर करतो आहे, याचे भानच राहत नाही. शब्दांना असे वाळीत टाकणारा समाज माणसालाही वाळीत टाकतो, यात आश्चर्य ते काय? म्हणजे कुठल्यातरी खेड्यातील गावठी जमात-पंचायत वाळीत टाकते. आपला या वाळीत प्रकरणाशी संबंध नाही, हे साफ खोटे आहे. आमच्या संस्कारांनी असेच काही शब्द वाळीत टाकले आहेत. त्यांचा अर्थातच सेक्सशी संबंध आल्याने असेल, कारण ती तर अतिशय वाईट गोष्ट आहे. ती चार-चौघांत बोलतो तो माणूस वासनेने बरबटलेला असणार! असे आपण पटापट वर्गीकरण करण्यास मोकळे. तेव्हा नागपूरच्या कोणी मेघा देशपांडे या कवयित्री ‘विषय’ हे शीर्षक कवितेला देतात, किंवा त्यावर कविता लिहितात म्हणजे काय? मोठाच गुन्हा करत असणार त्या ! शी ! असल्या फालतू कविता का करायच्या? कुणी केल्या तरी एखाद्याने आवडल्या असे का म्हणायचे? त्या शेयर का करायच्या ? ही सारी माणसे विकृत असणार !

शब्दांना आणि माणसालाच काय, कशालाही वर्गीकृत करण्याच्या, शिक्के उठवण्याच्या घाईत असलेला समाज विचार करतो असे मात्र दिसत नाही. याचे कारण, पुन्हा हीच मेघा देशपांडे यांची कविता...

‘विषय’ ही कविता नेटवर वाचनात आली आणि माझी पहिली उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती, ‘सुंदर’!! कवयित्रीबाईंची परवानगी घेऊन मी ती लगेच शेयर केली, आणि नंतर एखादी गोष्ट आवडल्यावर त्या आनंदात इतरांना सामील करून घ्यावे, म्हणून लगेच, काही लेखक, नाट्य-चित्रपट दिग्दर्शक, मित्र आणि हो मैत्रिणीसुद्धा विशेषत: कवयित्री, यांना पाठवली. माझ्या नाट्यग्रुपमध्ये ही शेयर केली. ग्रुपमध्ये सहसा कोणीच कुणाचे वाचत नसतो. आपलेच घोडे दमटत असतो- तसेच तिथेही झाले. तो मुद्दा नाही. पण नंतरच्या प्रतिक्रिया हे सायन्स लॅबोरेटरीत प्रयोगाचे उत्तम साधन ठरावे. या निमित्ताने मुद्दा आला, बाईंची कविता चांगली असून आवडली नाही, की शब्दामुळे वाळीत टाकली जातेय? कविता करणार्‍याला ती समजते का? कविता करणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, काव्य रसिक असणे, समजून घ्यायचा प्रयत्न करणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. मेघाताईंच्या प्रस्तुत कवितेवर ज्या प्रतिक्रिया आल्यात, त्याही साधारण, ग्रेट! बोल्ड ! थेट ! धाडसी ! अशा प्रकारच्या आहेत!! तेव्हा कविता आपल्याला जशी जाणवते तशी इतरांना नाही, हे ही स्पष्ट होते आणि शब्द किंवा विषय Taboo झाला/ होतो , हे दशांगुळाने उरते.

तर मेघाताईंची ही कविता आपल्याला काय कळली? किंवा का आवडली? तपास सुरू ! कवयित्री नेमके- सुंदर शब्दचयन करते आणि विषयाचे आकलन आणि विस्तृतीकरण या आशयाच्या गोष्टी जमवते, हे पहिले कारण. तेव्हाच लय, नादादी बाह्य गोष्टीही उत्तम जमवून आणते, हे दुसरे कारण. ते तर बेसिक. त्याने कविता ग्रेट वाटायचे कारण नाही-नसते. मग काय? रूपक? प्रतिमा? हो. कवयित्री ‘विषय’ हा शब्दच प्रतिमा म्हणून अतिशय नेमकेपणाने वापरते, विभिन्न अर्थांनी वापरते, तेव्हा कविता ग्रेट वाटू लागते. ग्रेट का- तर तशा कृतीमध्ये एक सामान्य अर्थ आणि एक सूचक अर्थ, एकाचवेळी दडलेला आहे म्हणून. सामान्य अर्थाचे आकलन ‘बोल्ड!’ आणि ‘शी!’ अशा वरील दोन्ही प्रतिक्रिया देईल, पण मग आशयाचे काय? तो ज्याला हवा त्याने समजावा. नाही त्याने सोडवा, तरी कविता आवडते? कळली असे वाटते ना! हेच ते उत्तम कृतीचे लक्षण ! त्यामुळेच एखादी कृती भावते.

तर कवितेचा आवाका आणि रूपकातील ‘विषय’. यासाठी कविता टप्प्याने द्यावी लागेल.

विषयावारि बोल बदलती बदले धोरण देहाचे
विषयासाठी संग घडे वा भोगदास्य हे विषयाचे?

‘विषय’ या शब्दाचा पहिलाच उपयोग, ‘उद्देश’ या अर्थी आलेला आहे. पुढे अर्थात उद्देशानुसार शब्द आणि देहबोली बदलते, हे सामान्य निरीक्षण आहे. मग केवळ उद्देशासाठी माणूस संबंध जोडतो आणि असे करणे, स्वार्थासाठी संबंध जोडणे म्हणजे एक प्रकारचे ‘भोगदास्य’ आहे. इथे पहिल्या दोन ओळींतच कविता काय सांगू पाहतेय हे समजायला पाहिजे !

विषयामाजि बुद्धि भ्रष्टते, हीन हरण करी सीतेचे
विषयाकारण दंभ घडवतो वस्त्रहरण पांचालीचे

विषयाचे रूपकांतर ( उपमानाचे उपमेयाशी समरस होणे) हे पहिल्या दोन ओळीतच झाले आहे. ते आता स्वार्थ झाले आहे. इथे लक्षात घेऊया की रावणाने सीतेचे हरण केले होते, ते ‘भोगलालसे’ने निश्चितच नव्हे, हे आपल्याला माहीत असतेच. तर त्यामागे रावणाचे विविध स्वार्थ सांगितले जातात. पण हे स्वार्थ साधायचा त्याचा मार्ग भ्रष्ट आहे. त्याचवेळी दुसर्‍या वाक्यात विषय सामान्य दंभापायी आपल्याच भावांना संबंध किंवा स्थान दाखवणे या अर्थाने येतो. त्यासाठी द्रौपदीचा वापर भोगलालसेचा नाहीच, तरीही तो भ्रष्ट मार्गच होतो. एकाला धडा शिकवण्यासाठी दुसऱ्याला, विशेष करुन स्त्रीला सजा देण्याची ही प्रक्रिया गूढ़पणे विकृत आहे. इथे ‘विषय’ या शब्दाला सामान्य आणि गूढ अर्थाने एकाच वेळी वापरले जाते. हा चकवा प्रथमदर्शनी डोक्यावरून जातो. 

विषयपंचका अधीन होता मनुजा वेसण तर्काचे
‘तर्क बुद्धीच्या कह्यात नसणे’ द्योत असे जरी विषयाचे

पंचेंद्रियांनी भोग घेणे ही आज माणसाची लालसा झालेली आहे, इथं विषय या शब्दाचा नुसता उपभोग हा अर्थ नाही तर द्रव्य हा आणखी एक अर्थ जोडलेला आहे. हे तुमचे-माझे आजच्या काळातील चित्रण आहे. उपभोगापाई द्र्व्यलालसेने माणसाची तर्कबुद्धी नष्ट झालेली आहे. असे कवयित्री सांगत असली तरी हव्यासाला तर्कबुद्धीचे वेसण कमी पडू नये असे सुचवते आहे.

विषयसुखा ना शाप म्हणावे असुन नसावे विषयाचे
विषयासक्ती रमतानाही भान असावे धर्माचे

मग काय विरक्त साधू-संन्यासी बनावे ? तर नाही. इथे रमण महर्षींचे एक वाक्य आठवले. For a Yogi, even if his material desires are fulfilled, he does not rejoice.’ म्हणजे योग्याला भान नसते, तर सामान्याने आजच्या जगातील ऐहिक सुखे उपभोगताना धर्माचे म्हणजे आपल्या मर्यादांचे भान राखावे. दुसर्‍याचे हक्क डावलून, खेचुन उपभोग घेणे ही मर्यादा नव्हे! दोन ओळीत कविता भलत्याच उंचीवर जाते.

विषय नसे जर जीविता का मग उरते असणे देहाचे?
मनास जपण्या प्रदान होती विषयपिंजरे मोहाचे

जर उपभोग नसेल, तर जीवन उरणार नाही ! किती समर्पक वाक्य आहे! मी सामान्यांसाठी वगैरे अवडंबरी शब्द वापरणार नाही. सगळ्यांनाच लागू असे म्हणू. इथे विषय हा इच्छा या अर्थी आलाय. इच्छा नसतील तर जगणे अशक्य होईल, इच्छा- हे मनाला जीवित ठेवणारे रसायन आहे, हे वैश्विक सत्य आलेले आहे. ग्रेट ओळी!


विषय टाळणे उत्तर नसते असते प्रजनन प्रश्नांचे
करून धिटाई आलिंगन दे, अवडंबर का विषयाचे?

मोह, इच्छा, आकांक्षा, पदार्थ, टप्पा, आटोका, उद्देश, द्रव्य असे जवळ-जवळ विषयाचे चौदा अर्थ होतात. ते सारे या शेवटच्या दोन ओळींत एकवटलेले आहेत. इच्छा- आकांक्षांचे दमन हे उत्तर नसते- तर ते अनेक नवे प्रश्न उभे करते. इथे कवयित्री स्त्री म्हणून स्वत:च्या जास्ती जवळ जाणारे विधान करते आहे, कारण शेवटी संसारापायी इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आदींचा बळी बहुदा स्त्रीलाच द्यावा लागतो. म्हणून धिटाई कर आणि आपल्या इच्छा, आकांक्षाना भीड- आपल्या जबाबदार्‍याचे अवडंबर करू नको, असा सल्ला कवयित्री समस्त स्त्री वर्गाला देते. इथे ही कविता वैश्विकतेकडून सुरू होऊन वैयक्तिक – अगदी आंतरिक होत संपते.

- मेघा देशपांडे ताई , हे असे ग्रेट काही साधणे, कष्टाने, सखोल विचार असतील तरच जमू शकते. मात्र ‘विषय’ या शब्दाला चिकटलेल्या ‘शुचिते’ने घोटाळा केला असे वाटते. पण असे घोटाळे, चकवे निर्माण करणे हे श्रेष्ठ कृतिचे कामच असते असे मला वाटते. शेवटी लोकांना आशय नकोय-असे मत मात्र आज दुर्दैवाने होते आहे.

-आभास आनंद

Monday, March 2, 2015

माध्यमातील लिखाण.





माध्यमातील लिखाण हे काम स्वीकारण्यापुर्वीच हे पडद्यामागील काम आहे, हे लेखकाला माहीत असते. बरेच आधी म्हणजे आठवड्यात फ़क्त एक एपिसोड व्हायचा त्या काळात श्रेयनामावलीत ही (म्हणजे आमची) नावे प्रामुख्याने असत. याची कारणे शोधली तर फ़क्त 4-5 वाहिन्या हिंदीत आणि 2 मराठीत सुरू होत्या हे एक. मालिका लिहित असताना 10-12 दिवसात एक काम पुरे होऊन दुसरी कामे, जाहिराती, कॉर्पोरेट, कॉपी वगैरे करता येत, हे दुसरे. (तेव्हा त्याची गरज होती.) तिसरे म्हणजे एका मालिकेत अडकून पडलोय असे वाटत नसे. स्क्रीन, ट्रीटमेंटवर विचार होई. खरोखर 'स्क्रीन प्ले' लिहावा लागे. कृत्रिम हुक्स क्वचित वापरावे लागत. मजा येई. सिटकॉम हा अपवाद, पण त्यातही एक वेगळी स्क्रिप्टिंगची गंमत होती. आम्ही लेखक- तंत्रज्ञ मालिका सोडत नसू म्हटल्यावर टायटल डिस्प्ले थ्रू आउट एकच असे. म्हणून आमची नावेही टाकली जात.

नंतर बहुतेक चॅनेल रिसर्चमध्ये सस्टेनिबिलिटीचा मुद्दा आला. माध्यमक्रांतित प्रेक्षकाचा अटेंशन स्पान कमी झाला. चांगले कथानक, ट्रीटमेंटवर मेहनत घेऊनही मालिकेचा TRP पुढच्या आठवड्यात होल्ड होत नसे. हे स्पोंसर्सना परवडणारे नव्हते. यावर उपाय म्हणून डेलीसोप नावाचा प्रकार आला. एकता कपूरच्या यशामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. या काळात माउन्ट ते होल्ड हा प्रवास सुकर झाला. स्पोंसर्स खुश झाले, सोप हा प्रकार रुजला. या प्रकाराची भूक बकासुरी होती. त्या वेगासाठी ट्रीटमेंट बरीचशी बाद झाली-पर्यायाने पटकथा. सोप या अनैसर्गिक प्रकारात घराणी आणि त्यातील वैर हा एकच conflict ट्रीटमेंट शिवाय दाखवता येतो, त्यामुळे आज 15 हून जास्ती वर्षानंतरही मालिकांचे कथानक एकच आहे फ़क्त अंगण बदलते.

हा बदल रुचला नाही असे म्हणण्यापेक्षा त्यात आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत दोष येईल असे वाटल्याने तेव्हा लिहिणाऱ्या बहुतेकांनी हे लेखन नाकारले. तिथे नवे लेखक आले.

वर्कलोड इतके होते की लेखकच काय, दिग्दर्शकाच्याही टीम्स केल्या गेल्या. कोणता भाग कोण डिरेक्ट करेल/ लिहिल हे नक्की नसल्याने, अनेकदा मध्येच मालिका सोडणे, बदल हे होत असल्याने काही निर्मात्यांनी नावे न देण्याची पद्धत स्वीकारली. काहींनी ग्रुप नेमिंगचा पर्याय स्वीकारला. पण चांगल्या हाउसेसमध्ये अजून व्यवस्थित क्रेडिट्स दिली जातात. त्यासाठी टायटल्सचे patches बनवून एडिट करून योग्य नामावली दाखवली जाते, पण अर्थात आधीच वाढलेल्या वर्कलोडवर ही उंटाच्या पाठीवरील शेवटची काडी ठरू शकते. कारण या कामाची डेडलाइन अनेकदा अक्षरशः घड्याळाच्या सेकंद काट्यापर्यन्त खेचली जाते. सोप हे कोलोसल-जायंट वर्क आहे. ते न करण्यामागे आमची काही भूमिका निश्चित असली, तरी ते काम पेलवणाऱ्यांचा मी आदर करतो. या मालिका एक वर्ग पाहत नाही, त्याला नावे ठेवतो, हे खरे असले तरी स्पोन्सर्स त्यावर करोडो रुपयांचा डाव खेळतात, त्या अर्थी हा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे हे नक्की.

सोप आपण परदेशातून उचलला तसेच सीझन्स ही उचलू लागलोत. सीझन्स पद्धतित काम जास्ती शिस्तबद्ध आणि रचनात्मक होते. त्याचे टप्पे निश्चित असतात. तिथे एक सीझन एक टीम राहू शकते. आपल्याकडे हे सुरू होते आहे. तिथे काम करायला सारे तयार आहेत. सोप काळात TRP बरहुकूम Creative interference हा दुसरा मुद्दा ही होता जो सीझन पद्धतित नसेल.