Wednesday, January 4, 2012

मराठी नाटक, एक जग(व)णे !

“असा एक ही मराठी माणूस नसेल ज्याने कधी तोंडाला रंग फासला नसेल!”
प्राध्यापक नेसवणकर डी.पी.त माझ्या समोर बसत आपले आवडते वाक्य फेकते झाले. संध्याकाळी साडेसातला आपले  एक्स्ट्रा लेक्चर आटोपून ते आले होते. त्यांची आवडती स्ट्राँग नेस्कॅफे मागवून आम्ही डॉक्टरची वाट पाहू लागलो. मला आलेल्या रायटर्स ब्लॉकवर सल्ला हवा होता.
“कोण म्हणतो वाईट दिवस आलेत? सगळं चांगलं चाललंय!”
नेसवणकर नेहमी माझ्या विरुद्ध बोलणार!
“अहो ते मराठी निर्माते बोलताहेत… आता तेच बोलणार ना? पैसे लावतात ते!”
“लावा ना, आम्ही कुठे नाही म्हणतोय.पण नाटक म्हणजे सुपर लोट्टो असल्यासारखे लावू नका!”
“म्हणजे काय?” नेसवणकर इकॉनॉमिक्सचे तज्ञ असल्याने मी  जिज्ञासू झालो..
“म्हणजे बघ, मराठीतले जे छोटे किंवा नवे निर्माते आहेत ते नाटकाकडे लास-व्हेगासच्या स्लॉट मशिनसारखे बघतात.”
“आणि जुने निर्माते?”
“ते कन्फ़्युज आहेत. वेगवेगळे प्रयोग करुन पाहताहेत, कुठे यश मिळतंय का ते.”
“ आणि तुम्ही म्हणताय सगळ चांगलं चाललंय?”
“अरे कुठल्या ही व्यवसायात असे उतार-चढाव येतच असतात. त्यातून दरवेळी रंगभूमी आपल्या पद्धतीने मार्ग काढती झालीय!”
“आता तिचे मार्ग काढण्याचे मार्ग कसे होते हा प्रश्न अलाहिदा!” आपल्या लॅपटॉपची लेदर बॅग माझ्या बाजूला आदळून डॉक्टरने प्राध्यापकांच्या शेजारी बैठक मारली!
“कधी हीट अँड हॉट मार्ग, कधी ऑर्केस्ट्रा मार्ग, कधी लावणी मार्ग!”
डॉक्टर हे वाक्य कडवटपणे म्हणाला असावा, कारण अजून कॉफी आली नव्हती आणि डॉक्टर कडवट झाला होता.
“सध्या हा मार्ग संतोषच्या घरावरुन जातोय.” मी काहीतरी मार्मिक बोलायचा प्रयत्न केला!
“बोलू नकोस! अजिबात बोलू नकोस!” नेसवणकर खवळले ,
“संतोषने सद्यस्थितित मराठी नाटक जगवलंय!” मी  काहीतरी कुत्सित बोललो असा त्यांचा समज दूर करावा म्हणून मी-
“तसं नाही नेसवणकर-” असं काहीतरी बोलतोय तोच ते आणखीच भडकले.
“हेच! हेच कुजकं बोलणं! एक तर मला तू नेसवणकर का म्हणतोस?”
“तुम्ही नेहमी माझ्या विरोधात बोलता म्हणून! मी नागडा, तुम्ही विरुद्ध पार्टी, म्हणजे नेसवणकर!” 
“हे असे शब्दच्छल करण्यापेक्षा काही क्रिएटिव कर ना!”
“हो इथे कॉफीच्या वाफा सोडत वल्गना नकोत, काही नाटक-बिटक लिहून दाखव !” डॉक्टरने ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतला.
“हे बघ डॉक्टर, एकतर मी संतोष विरोधी मुळीच नाही… त्यात कुठल्याही स्तरावर थिएटर करणार्‍याला मी आपला मानतो… यात समांतरवालेही आहेत."
“बघ, पुन्हा कुजके बोल… समांतर हा शब्द तू कोणाला पर्यायी म्हणून वापरतोयस मला कळत नाही काय?”
“का हे वृथा आरोप डॉक्टर ?” मी शून्य तासात प्रश्न उपस्थित करावा तसा निरर्थक झालो,
“नाटकात समांतर आणि व्यावसायिक अशा पोटजाती नाहीत.”
“पण तुम्ही व्यावसायिकवाले तसं समजता ना!”
“मी व्यावसायिक! कधी झालो!?” माझे भान हरपत चालले!
“नाटकाच्या जाती-पोटजाती, भेद वगैरे काय... तुझ्या मते!”
'तुझ्या मते' वर श्लेष देत प्रा. खर्जात.
“माझ्या 'मते'ला महत्व ते काय सर?  नेहमी तुमच्या मतांवरुनच तर माझं मत बनवतो मी !”
यावर तिथे प्रचंड गदारोळ माजला! प्रा.आणि डॉ. दोघेही पिसाळले!
“तुझी मतं ती आमची मतं? काय वेड लागलंय! तुला एक तर मतच नाही आणि असलं तर ते वापरायचा अधिकार नाही! शिवाय तुझी मतं एवढी भिकारचोट आहेत कि तुला कोण शिवाजीमंदिरच्या दारात पण उभा करणार नाही!”
“मला नाही वाटत तिथे लेखकाला उभं करण्याची प्रथा आहे.”
आज मी स्लॉगिंगच करत होतो. या गदारोळातच कॉफी आली.
“सांग, नाटकातला जातिभेद.”
नेसवणकर कॉफी एवढ्या वेगाने स्टिर करत होते कि आत एक भोवरा तयार झाला. त्यात मराठी नाटक जातंय की राहतंय अशी मला भीति,
“चांगलं, बरं किंवा वाईट नाटक असू शकतं, नंतर कळणारं आणि न कळणारं असे भेद येतात. मग चालणारं– न चालणारं आणि शेवटी धंदा करणारं– न करणारं असा भेद येतो.”
“धंदा! शेवटी तू जातीवर गेलास! नाट्य व्यवसाय आणि दारूचा धंदा याना तू एकाच पातळीवर आणतोयस!”
“नाही सर, हा त्याही खालच्या पातळीवर जाऊन शब्द वापरतोय, याला काय मी आज ओळखतो?”
कोण कशाचा अर्थ काय काढेल, ते काय आपल्या हातात आहे? माझा विचार…अर्थात कॉफी ढवळताना.
“तो जो काय धंदा म्हणतोस, तो तू का नाही करत?”
“कारणं माझा व्यवसाय वेगळा आहे.”
“डीपीत बसून सगळ्यांची करत बसणं…”
“डॉक्टर… तो माझा उपव्यवसाय आहे! त्यावर माझा इगो जगतो. ”
मी प्रामाणिक महर्षी. 
“मला माहित्येय स्वत:ला मोठा विद्वान समजतोस तू ! तुझ्या दृष्टीने आम्ही दोघे ही मच्छर आहोत, काय सर?”

“काही नाही! या माणसावर संस्कार झालेले नाहीत.” नेसवणकर हताश.
“स्वत:ला मोठं समजणं आणि इतरांना तुच्छ लेखणं याला दुसरं काय म्हणणार?”
“याला जर संस्कार झालेले नाहीत असं मानलं तर सम्पूर्ण महाराष्ट्र असंस्कृत मानायला लागेल!”
मी पुन्हा गदारोळ माजवला! आज आपली बॅट चालत होती!

“उर्मट शिरोमणी, कॉफीतला राक्षस, रीकामचा हज्जाम.” असे वाक्प्रयोग सुरु झाले.
“आपण इथे कामासाठी जमलोय, सर. मी तुम्हाला इथे भेटायला सांगितलं ते, मला कॉफीचे पैसे जास्त झाले होते म्हणून नाही. आणि मी नेमका काय आहे हे तुम्ही दोघांनी ही वेळोवेळी सिद्ध केलेलंच आहे.. तेव्हा आता मुद्धा?”

“हां तू काय ते फॉर्मचं बोलत होतास…” मी थोडक्यात आणि पुन्हा मला आलेला ब्लॉक सविस्तरला.
“ब्लॉक व्हायला तू काय  स्वत:ला तेंडुलकर समजतोस?”
“ते ब्लॉक व्हायचे का नाही ते मला माहीत नाही, पण मला ब्लॉक व्हायचा अधिकारही नाही हे जरा जास्तच झालं! मी नम्र निषेध नोंदवू ?”
परवानगी घेऊन मी सरळ कॉफी घटाघटा पिऊ लागलो. त्यावेळी प्राध्यापक आणि डॉक्टर मला न कळणार्‍या भाषेत काही अगम्य बोलत होते.
“सुररीअलिझम!” डॉक्टर ने तोडगा दिला.  
“मान न मान, तू हा जो विषय मांडणार आहेस तो सुररीअलिस्टिक आहे.”
“इथे मानण्या न मानण्याचा प्रश्नच नाही, सरळ- सरळ निर्णय आहे हा!”
“तुझ्यात हा जो उर्मटपणा आहे ना, त्याला हाच फॉर्म शोभेल.” नेसवणकर.  
“सर, आपण नाट्यविषयाला काय शोभेल याचा विचार केला तर, ते आपल्या गंभीरपणाला शोभेल. पण आपण गंभीर झालो कि विनोदी दिसतो!”
“झालं! फॉर्म सांगितला तर लगेच तलवारी चालवायला लागला.”
“तलवार नाही कुर्‍हाड, छोट्या वॉशिंग्टनला कुर्‍हाड मिळाली तर तो ती चौफेर चालवायला लागला!” नेसवणकर.

“मी मला जमतं का पाहत होतो..”
“जमेल! आम्ही कशाला आहोत? आम्ही तुला मार्गदर्शन करु, तुझ्या सार्‍या प्रसव वेदना सुसह्य करु आणि शेवटी तुझ्या नाटकाचं मढं,  वर्ल्ड हेरिटेज म्हणून जतन करु…”
“थँक्स, तुम्ही दोघं आहात म्हणून मराठी रंगभूमी अजून धुगधुगी धरुन आहे.”
“तुझ्या नावातच जे वीष आहे ना, त्याचा आमच्यावर काही परिणाम होत नाही.” सर,
“तुला भेटायचं म्हणजे आम्ही घरुन अ‍ॅन्टीडोट घेऊनच निघतो.”डॉक्टर. 
“तसं नाहीए, कॉफीत वीष असतं ते माझ्या वीषावर उतार्‍याचं काम करतं. मग नाटक कुठे करु?”
“रस्त्यावर कर!”
“कशाला तुमची संस्था आहे ना?”
“ती रस्त्यावर येईल !”
“चालेल, आपण रस्त्यावरच करु !”
“नको, त्या पेक्षा तू व्यावसायिकला ट्राय कर! त्यांना आण.”
“त्यांना आता सरकारी अनुदान पण आहे. म्हणजे माझं नाटक करताना धुपलं तर सरकार धुपेल!”
मी टाळीसाठी पुढे केलेल्या हाताकडे प्रा. तुच्छतेने आणि डॉ. तिरस्काराने पाहत होते म्हणून मी टेबलावरची माशी मारल्याचा आव आणला. मग्जच्या काळजीने वेटरची धावपळ उडाली.

“मला सांगा नेसवणकर, नक्की प्रॉब्लेम काय झालाय.”
“ कसला?”
“या धंद्याचा?”
“ते नक्की कुणालाच माहीत नाही.”
“हो तुम्ही दोघं सोडून !”
“एका अर्थी ते खरंय. आता मी जे सांगतो ते नीट ऐक, म्हणजे तुझ्या ज्ञानकक्षा विस्तारित होतील! मराठी नाटकाचा प्रॉब्लेम हा आज निर्माण झालेला नाही… त्याचा एकूण परिणाम म्हणून आज चांगली संहिता दुर्मिळ झालीय खरी, पण हा अनेक वर्षांचा बळावलेला रोग आहे.” डॉक्टर. 
“म्हणजे कॅन्सर लास्ट स्टेजला जाऊन सिम्टम्स दाखवतो तसा?”
“हे कॅन्सरपेक्षा वाईट आहे.”
“मग रोग बरा करायला डॉक्टर लागेल, नाही, चांगलासा!”
मी डॉक्टरला कचाटयात पकडला.
“तो मी नाही, मी तत्वज्ञानाचा डॉक्टर आहे.”
डॉक्टरने मराठी रंगभूमी क्युअर करायची जबाबदारी झटकली.

“हे दुखणं साधारणपणे सत्तरीच्या दशकात सुरु झालं.”
“काहीतरीच काय, तेव्हा तर चार-चार संस्था दणक्यात प्रयोग आणि दौरे करत होत्या.”
“मान्य. पण नाटकं कोणती होती? तीनच नाटककारांची… अत्रे, दळवी आणि कानेटकर. त्यापैकी दोनच इहलोकी..तिसरा लेखक तयार करायचा कुणी? चांगल्या संस्थांनी वर्षानुवर्षे नव्या संहितांकडे पाहिलंच नाही. नव्या संहिता कपाटात कुजल्या.” सर कदाचित आपला प्रदीर्घ अनुभव सांगत होते!
“दहा वर्षांत लेखकांची एक पिढी संपली.”
“पण दुसरी पिढी तर आलीच ना? शफाअत,संजय, जयंत, प्रशांत, अभिराम, चेतन,  त्यांचं काय?”
“तेव्हा वेगळाच प्रकार सुरु झाला. चार-दोन दिग्दर्शक स्वयंभू झाले. त्यांना नाटककाराचा क्राफ़्ट त्रासदायक व्हायला लागला. ते कथा विरहित संहितेची मागणी करायला लागले.”
“मग? मिळाल्या त्यांना तशा संहिता?”
“त्यांनी बराच प्रयत्न केला. कादंबरीकारांपासून न लेखकांपर्यंत संहिता तपासल्या.. काही केल्या. त्याचा परिणाम काय झाला? या स्वयंभू दिग्दर्शकांकडे नाटककारांनी आणि नंतर निर्मात्यांनी पाठ फिरवली. त्यांना अकाली रीटायर्ड केलं. आम्हाला वाटलं होतं की काही काळाने हे एकत्र येतील, पण ते आलेच नाहीत, अज्ञातवासात गेले..”
“म्हणजे नाटककारांच्या एका अख्ख्या पिढीने दखलपात्र लिखाण केलंच नाही?”
“नाही… कारण स्वयंभू दिग्दर्शकांच्या दृष्टीने तो दखलपात्र गुन्हा नसता का झाला?” डॉक्टर.
“त्या बदली आली दिग्द-लेखकांची एक नामी फळी. हे बेसिकली दिग्दर्शक, पण स्वत:ची नाटकं लिहून बसवायचा पायंडा यांनी पाडला. ते तिसर्‍या पिढीतल्या नाटककारांकडे पाहत ही नव्हते. ती पिढी गर्भातच जळून गेली. हा झाला आपल्याला क्रिएटिव्ह बाजूने लागलेला रोग.” डॉक्टरचा अ‍ॅनालिसिस परफेक्ट होता.

          “आता आर्थिक बाजूने लागलेला रोग तपासून पाहू.” नेसवणकरांनी इकॉनॉमिक्स सुरु केलं.
“नव्वदच्या दशकात मराठी वाहिन्या सुरु झाल्या. आधी त्या फार नव्हत्या, त्यामुळे त्यांचा नाट्य व्यवसायावर झालेला परिणाम लगेच लक्षात नाही आला. पण दोन-तीन वाहिन्या सक्रिय व्हायला लागल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली, दोन तीन बिझी कलाकारांना घेऊन नाटक करणं यापुढे अशक्य आहे. त्यांच्या एकत्र तारखा मिळत नाहीत आणि शो करण्याची कसरत करावी लागते. त्यात शूटींग्जमुळे दौरे आटोपते घ्यायला लागले. पुन्हा दोन-तीन चांगल्या कलाकारांनी एकत्र काम करावं अशा संहिता दुर्मिळ झाल्याच होत्या. मग नव्या लेखकांवर कसदार नटांची गरज राहणार नाही अशा संहिता निर्माण करायची वेळ आली. नव्या दिग्द-लेखकांनी ती चोख बजावली. अशा प्रकारे मराठी नाटक चांगल्या लेखक, दिग्दर्शक आणि नटांच्या एकत्र येण्याला पारखे झाले. मराठी माणूस एक तर नोस्टॅल्जिक, तो घाणेकर, दुभाषींच्या आठवणी मनात वागवत यायचा, नव्या परिस्थतितलं नाटक पाहून हिरमुसून परत जायचा. त्यापेक्षा घरी बसून पाहिलेल्या सीरीअल्सचा दर्जा जेव्हा त्याला चांगला वाटायला लागला, तेव्हा त्याने थिएटरला येणं बन्द केलं… त्यानंतर मग नव्या दिग्द-लेखकांचा नवा प्रेक्षक तयार झाला आणि तू म्हणतोस तसं त्यांनी मराठी नाटक जगवलं किंवा तगवलं. अशा प्रकारे अभिजात कलाकृतीची अपेक्षा धरणारा प्रेक्षक आणि ती घडवण्याची कुवत असलेले नट, दिग्दर्शक आणि लेखक यांची नाळ एकमेकां पासून आणि मराठी नाटकांपासून तुटली. ती पुन्हा जोडणं केवळ अशक्य आहे. यात नाट्यव्यवसायाची बॅलन्स शीट जी आतबट्टयाची झाली तिला मराठी वर्तमानपत्राच्या जाहिरात दराने पूर्ण नामशेष केलं. आज मराठी नाटकांमुळे जर कुणाचा धंदा होत असेल तर तो फक्त मराठी वृत्तपत्रांचा. नाट्यधंद्याचा सगळा किंवा नसलेला फायदा आज वृत्तपत्र प्रकाशनांकडे जातोय. आणि ज्यांच्यापासून त्यांना अजिबात फायदा होत नाही त्या मालिकांचे सन्मान करण्यात ही प्रकाशनं मग्न आहेत. पुर्वी ही दोनच होती आज पाच आहेत.”

सर आता इकॉनॉमिकल अ‍ॅनालिसिस मध्ये मग्न झाले होते. मी कॉफीचे बिल चुकवत  परिसंवादाची फिनान्शिअल स्पॉन्सरशिप लीगली पार पाडली.
“आता बिल भरल्यामुळे मी काहीही बोलू शकतो असे मला नम्रपणे वाटते.”
माझी सुरुवात. दोन्ही समंध त्रस्त दिसले.
“नम्रपणे म्हणजे उद्धटपणे?”
“हा ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे.”
आम्ही बाहेर निघालो तेव्हा गल्ल्यावर आणि डी.पी.भर आनंदीआनंद पसरलेला दिसला!
“मुद्धा नंबर एक- मराठी नाटक लिहून फक्त अपमान आणि मनस्ताप नशिबी येणार असेल तर नाटक कोण आणि कशाला लिहील?  दोन- एका दिवसात गाण्यांच्या किंवा खाण्याच्या मालिकेचं शूटींग करुन दहा प्रयोगांचं मानधन बसल्या मुंबईत मिळवणारा कलाकार थिएटरच्या वाट्याला कशाला जाईल? तीन- गाव तिथे थिएटर अशी संकल्पना नगरपालिकेतले कल्पक लढवत असताना  पर युनिट कस्टमर (पक्षी प्रेक्षक) प्रयोग संख्या वाढवायला लागतेय आणि पर शो कस्टमर (पक्षी प्रेक्षक) कमी होतोय, हे गणित कसं बदलणार ? चार- लाखो रुपये कर्जात असलेला व्यवसाय फायद्यात अणण्यासाठी कॉर्पोरेट स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत ते कोण करणार? पाच- बाहेरगावी दौरे आणि कॉन्ट्रैक्ट शो करणारे दर्जावार घाबरलेत, त्यांना सक्रिय कसं करणार? सहा- नवरात्र-गणेशोत्सवातील नाटके बंद झाली आणि नकलांचे (!) प्रयोग रंगले ते शासकीय नियम आणि मंडळांची दिखावटी उत्सवप्रियता कोण बदलणार ? सात-” 
मी दरवाजा उघडला.
“आता खाशील लाथ! स्वत:ला काय अमर्त्य सेन समजतोयस? उपाय कोण सुचवणार? प्रश्न उभे करुन  पळून जाणं ही मराठी माणसाची फार जुनी सवय आहे.” नेसवणकर.
“मराठी माणूस आर्थिक आणि व्यावसायिक डेप्थ असलेले प्रश्न विचारतो का नेसवणकर?”
“तू आम्हाला grossly अण्डर-एस्टिमेट करु नको. एक तर उद्धट वर वर्णभेदी, या माणसावर संस्कार कोणी केले, त्याला पावनखिंडीत गाठला पाहिजे !” डॉक्टर ऑपरेशन टेबलवर व्हावा तसा हिंसक झाला. प्राध्यापक नेसवणकर तर माझ्या नेसत्याला हात घालायच्या विचारात होते.
“ज्याला स्वत:ला काही करता येत नसेल त्याने जे करताहेत त्यांना शहाणपण शिकवू नये. अशा माणसाला भर जिमखान्यावर निर्वस्त्र करुन झोडला पाहिजे.” 
नेसवणकर आपल्या नावातला पॅरॉडॉक्स साधू लागले.
“मला काय फरक पडतो ? मी नावानेच नागडा आहे !”
“मग आम्हाला उपाय सांग..” बाटलीतला राक्षस डॉक्टर.
“कॅन्सरला उपाय असतो का डॉक्टर? तरी काही कॅन्सर पेशंट जगतातच ना?”  
मी इंजिनमध्ये जान फुंकली.
“लक्षात ठेव, सुररीअलिझम! काय?”
“ थँक्स डॉक्टर…” मी क्लच दाबत गिअर टाकला. सर्कलवर वळताना मी विचार करत होतो. अवघड जागी दुखणे आणि तत्वज्ञानी डॉक्टर, यावर उपाय काय ?
                               - आभास आनंद
                       आम्ही मराठी- दिवाळी २००६

(संबंधित नाटक कामगार राज्य नाट्यस्पर्धेत त्या वर्षी पहिले आले होते.)

*******

Tuesday, January 3, 2012

बोले तैसा चाले ...

    सकाळी ‘सात अट्ठेचाळीस’ ला  भाऊ ताजा होता पेटलेला होता,
“अरे, एवढी जर  लाज असेल ना आपल्या मराठीपणाची, तर वाढवा दाढ्या आणि….”
पुढले वाक्य भाऊ स्पेशल आहे. भाऊ पेटला का असाच बोलतो भाऊची बखर छापायची ठरवून सेन्सॉरबोर्डात टाकली तर एकही वाक्य पूर्ण छापता येणार नाही.  पुन्हा ‘बखर’ या शब्दावरसुध्दा भाऊचा आक्षेप असेलच! अख्खी ‘सात अट्ठेचाळीस’  भाऊची नजाकत आणि अदा,  अदब से पाहत होती. अख्खा कम्पार्टमेंट बोरीवली  ते दादर रोज  (रविवार सोडून) असाच असतो.

“अरे पण  हिंदी पिक्चर पहायला आवडतात म्हणून काही लगेच आमच्यावर शस्त्रक्रिया करायची गरज नाही.”
आणखी एक चावी! भाऊने ढापण्या फडफडवल्या
“अरे पण हा साला नाना, मराठी  चित्रपट डफ्फर असतात म्हणतो!...  म्हणा! तुम्हाला सगळे खान लोक ....”  पुन्हा तेच!

     काय झालं होतं, सकाळी  ‘सात अट्ठेचाळीस’ने बोरीवली सोडता-सोडता कुणीतरी मराठी चित्रपटांची करुन टाकली होती. भाऊची अस्मिता वगैरे दुखावली गेली होती  आणि मायमराठीतून अस्खलित पट्टा सुरु झाला होता
अरे आपल्या अरुणने ‘श्वास’ काढला! ‘श्यामची आई’ नंतर पहिल्यांदा सुवर्णकमळ ! आता ऑस्करला चालला अरुण, आणि तुम्ही .... रडा!

भाऊला सबंध छापणं अशक्य आहे आमचे एक मित्रवर्य अरुण नलावडे मराठी चित्रपट निर्मितीत उतरले आणि पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय विजेते ठरले होते. श्वास बध्दल काय लिहावं? जिथे आणि जेवढा असायला हवा तिथे नेमका आणि तेवढाच भिडणारा श्वास. कटाक्षाने मेलोड्रामा टाळणारा श्वास.  इमोशन्सचं धुणं धोबीघाटावर नेऊन पिळ पिळ न पिळणारा श्वास. गाण्यांचे मार्केट बाजूला ठेवणारा अव्यवहारी श्वास. प्रत्येक प्रसंग जरा ही न लांबवता कट्स साधणारा श्वास. साध्याशा कथेतून जीवनावर मोठे भाष्य साधणारा श्वास. खरंच श्वास मराठी चित्रपटांसाठी श्वासच ठरला आहे. या पार्श्वभूमीवर नानाचे वाक्य पचणे भाऊला जड जात होते.
 “तू सांग ना! मराठी लेखक म्हणवतोस ना स्वत:ला?”
पारधी, भिल्ल, भटके आणि विमुक्त, या  कॅटॅगरीत भाऊने मला यूं टाकले.
“मराठी चित्रपटांबध्दल तुझे काय मत आहे?”

     मराठी चित्रपटांनी  आणि संतांनी, एकेकाळी स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेतला होता असे माझे ठाम मत आहे. दोघांनी ही नको त्यांना, नाही ते समजावण्याचा प्रयत्न केला होता. पण हे भाऊला सांगून उपयोग नव्हता.
  
“सध्या आपल्याला बरें दिवस आलेत.” मी डिफेन्सिव!
“तसं नको! मला सांग तुझा आवडता लेखक कोण?.. आता बघा सांगेल शेक्सपिअर नाहीतर हॅम्लेट!”
भाऊने सर्वांवर विजयी नजर फिरवत त्याला एकमेव ज्ञात अशा विदेशी साहित्यिकाला, त्याच्या अपत्यासह मध्ये घेतला.
“तसे बरेंच आहेत..” हॅम्लेट लेखक का नव्हता ? पुढे भाऊ नामक प्राणी आपल्यावर घसरेल म्हणूनच!
“सगळे  परदेशी! मराठी एकतरी आहे का?”
“होते. एक भाऊ पाध्ये म्हणून..”
“आता हा भाऊ कोण?”
आपल्याला एक हमनाम प्रतिस्पर्धी आहे हे भाऊला ठाऊकच नव्हते.
“अरे, ते मराठीत फार शिवराळ लिहायचे!”
कुणीतरी मूलभूत माहिती पुरवताच,
“म्हणूनच याला आवडत असणार! …. काय वेळ आलीय पहा मराठीवर!”
भाऊ पुन्हा उधळला

 भाऊ पाध्ये आवडतात हा अजून एक साहित्यिक गुन्हा! समकालिन मराठी साहित्यिकांत एकमेव वेगळा आणि म्हणूनच भावणारा लेखक. ज्याच्या  कथेतील अनुभव आपल्याला सरळ छेदतात आणि कथेचा, तिच्या तटस्थ अविर्भावासह प्रवाह पाहून वेडं व्हायला होतं, असलं भन्नाट प्रकरण! आपल्या लक्षात त्यांच्या शिव्याच राहिल्या! आणि भाऊंचाही ‘संत’ झाला! यांच्या ‘शिव्या’ आणि त्यांच्या ‘ओव्या’! आणखी आपण काय लक्षात ठेवलंय?
“आता बोल ना! मराठी साहित्यिक म्हणवतोस ना स्वत:ला!?”
भाऊच्या तमाम शिव्या मी  हसत झेलतो, पण  ही  सहन होणं शक्य नव्हतं!
“शिव्या देऊ नकोस! मुद्द्याचं बोल!”
माय रिवेंज टुवर्डस कंटेम्पररी मराठी लिटरेचर!
“..आणि पोरीला कुठे टाकलीयस? इंग्लिश मिडियमलाच ना! अरे, या चोर लोकांनीच तर मराठीची पार काशी करुन टाकलीय!”

मग कुणाकुणा लेखकांची मुले फॉरिनला आहेत, त्यांना मराठी अजिबात येत कसे नाही याची फोडणी मिळाली. प्रत्येक मराठी लेखकांने मायमराठीच्या ओसरीवर आपापली पोरे-बाळे बळी चढवलीच पाहिजेत असा एक निष्कर्ष सभेत एकतर्फी पास झाला. बहुतेक मतदाते लेखक नसल्याने त्यांनी आपली मुले अमेरिकेत पाठवण्यास काही हरकत नाही हे एक उपकलम होते… पण मी एकटाच होतो!

“अशानेच आपली भाषा बाटवली जातेय! संस्कृति  बरबाद होतेय-”
“आणि धर्म बुडतोय!” एकमेव  कट्टर हिंदूने संधी साधली.
“… अफगाणिस्तानात जाऊन रहा!”  हिंदूंचा मूलतत्ववाद!
दादर येईपर्यंत हा संवाद वेगवेगळया मार्गाने मराठीची वाट लावणार्‍यांवर करवादत होता. दादर आले आणि भाऊ उठून दाराकडे सरकला,
“उतरनेका है क्या?”

     मला माहीत आहे, स्थल-कालाचा तक्ता बदलून असे प्रसंग जागोजागी घडतात. आमच्यावर तर नेमाने बेततात. मराठीत चुकून काही लिहिलं तर तो गुन्हा ठरलेला आहे. आम्ही काय जपायला पाहत आहोत?

     मागे एका नाटकाला इंग्रजी नाव दिले, समर्पक होते आणि गर्भितार्थ साधत होते.  
“मराठी नाटकाला इंग्रजी नाव कशाला? मराठीत काय चांगली नावं मिळत नाहीत?” एक ज्येष्ठ साहित्यिक.
त्यानी त्या नाटकाला एक दोन मराठी नावं सुचवली. एकंदरच कठीण होतं!

“मराठी  भाषा शुध्द लिहिली गेली पाहिजें !”
म्हणजे कशी?
“ती शुध्द बोलली गेली पाहिजे!”
पुन्हा!? कशी?
भाऊचा आणि मराठीच्या अस्तित्वाचा संबंध काय? भाऊने स्वत: सोडून इतरांना मराठीचे कातिल ठरवण्यामागचे सायको ऍनॅलिटिकल रीजनिंग काय? भाऊला सांस्कृतिक दादागिरी करण्याचा परवाना कुणी दिला? असे प्रश्न इथे विचारायचे नसतात. कारण आपली परंपरा उज्वल आहे, इतिहास सोनेरी आहे आणि साहित्य अत्युच्च दर्जाचे आहे!
  
     आज जिला मराठी  म्हणायचे ती काही शतकांपुर्वी ‘मराठी’ या नांवाने प्रचलित तरी  होती का? त्या आधी कुठे होती? वापरात होती? एकूणच मराठी भाषेत परभाषेतून आलेले शब्द किती? ती कधी शुध्द होती का? किंबहुना आज जशी आहे तशी अवघ्या पन्नास वर्षंपुर्वी होती का? आजही ती सार्‍या महाराष्ट्रात एकाच पध्दतीने बोलली जाते का? या सार्‍यांची उत्तरे ‘नाही’ अशी आहेतं जगातील कुठलीही भाषा मुळात बोली असल्याने कोणत्याही काळी शुध्द असूच शकत नाही. आणि जी नाहीच आहे ती शुध्दता टिकवायचा कोण सोस!

     मला वाटते, जेव्हा आपण मराठी भाषा आणि तिच्या शुध्दी विषयी बोलतो तेव्हा आपल्याला कागदावर लिहिली जाणारी लिपी आणि प्रचलित व्याकरण अभिप्रेत असते, बोली नव्हे. आणि जी शुध्दता जपण्याचा आग्रह होतो ती फारतर पाच पन्नास वर्षें प्रचलित असतें. पुन्हा बोलीनुसार व्याकरणालाही कालांतराने बदलावेच लागते. याचे दाखले कोणत्याही पन्नास वर्षे जुन्या पुस्तकात मिळतील. मग पन्नास वर्षांहून मागे जे व्याकरण  अस्तित्वात होते ते आज अशुध्द मानायचे का? किंवा पुढे पन्नास वर्षांनंतर जी पध्दत अस्तित्वात असेल, ती जास्त शुध्द असणार आहे का? (केवळ उपयुक्ततेचा निकष लावायचा म्हटले तर प्रत्यक्षात या लिपीच्याच शुध्दिकरणाची आज गरज आहे, जेणेकरुन ती आजच्या डिजिटल की-बोर्डवर सुटसुटीतपणे बसवता येईल) बेसिक की-बोर्ड इंग्रजी वर्णमालेवर बेतलेला असल्याने ही आजची गरज आहे, असो.

     आज आपण मराठीकडे कशा नजरेने पाहतो किंवा पाहता येईल, यावर विचार करुया. आज आपल्याला वाचनाचा कंटाळा आहे, किंवा वाचायला वेळ नाही. पुस्तकं कोण लिहितात किंवा ती कोण छापतात यापेक्षा ती कोण वाचतात हा फार महत्वाचा मुद्दा आहे. मराठी पुस्तक जाते ते मुख्यत: ग्रंथालयात, लायब्ररीत. एक प्रत सरासरी हजारभर लोकं (वाचली तर) वाचतात. हा डिजास्टरस रेशो आहे आणि तो बदलणे शक्य नाही. यामागे दोन कारणं असावीत एकतर जेवढे फुकटात मिळेल तेवढेच साहित्य वगैरे वाचायची  आपली मानसिकता किंवा जे छापले जातेय त्याची किंमत पुस्तकावर  छापलेल्या किंमती एवढी नसण्याची खात्री. मग ठोस ग्राहक नसल्याने ग्रंथालयांच्या जीवावर तगणारी प्रकाशने. मग कमी प्रतिंचे एडिशन छापले जाणे, त्यामुळे पुस्तकाची किंमत वाजवीपेक्षा जास्त होणे आणि त्याच मुळे त्यांचे मुख्य ग्राहक ग्रंथालयेच असणे हे चक्र सुरु होते. आपल्याकडे सर्वात जास्त कोणती पुस्तकं विकली जातात? तर धार्मिक! हे सांस्कृतिक दारिद्रयाचे लक्षण आहे! त्या मागोमाग क्रम लागतो शैक्षणिक पुस्तकांचा. शिकून नोकर्‍या मिळवणे हा तर आमचा धर्म! शेवटी आम्ही! जे किती विकले जाईल याची शाश्वती नाही असे पुस्तक काढतांना प्रकाशक काय पाहतो? पुस्तकाच्या रचना आणि दृष्य रुपात  दर्जावार कुठलीही तडजोड करायची नाही. कागद, छपाई वगैरे उत्कृष्ट असली पाहिजे, कमिशन दणदणीत दिलेच पाहिजे, एडजेस्ट कुठे कराल? लेखकाच्या मान (अवमान) धनात!  मग ‘य’ दर्जाच्या मानधनाला ‘व’ दर्जाचे लेखक. चले-चलो भई चले चलो! लेखक कशाला लिहिल? ‘खाज’ हा ‘सन्माननीय’ अपवाद!

     मी  का वाचायचे? जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत भाषांतरीत होऊन आले तर मी वाचायचें, ओके. पण राजकीय, क्रीडा (अर्थी क्रिकेट) आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकांनी थापेबाज चरित्रे लिहिली तर मी का वाचायची? खांडेकर-फडक्यांच्या फॉरमॅटमध्ये कादंबर्‍या भरघोस येतात. लग्न हे ज्यांचे एकमेव साध्य असते, त्या मी का वाचायच्या? वरकस जमिनीत तण माजावं, तशी कविता माजलीय! ती मी का वाचायची? ज्यांच्या उपजिविकेचे मुख्य साधन नोकरी आणि रविवार आरामखुर्चीत जातो त्यांच्या अनुभव विश्वाचं व्हॉल्युम काय? त्यातून किती कसदार साहित्य निर्मिती होऊ शकते?आणि झाली तर ती वाचणार कोण?

     हे सारं बदलता येईल का? आणि कसें? आज आपले मराठी तंत्रज्ञ जगभर अनेक सॉफ्टवेअर्स बनवत असले तरीही मराठी ऑपरेटिंग सिस्टम अजूनही अस्तित्वात नाही कारण ग्राहकच फुकट्या आहे ई- क्रांतिचे वारें माय मराठीला अद्याप लागलेले नाही. ई-बुक्स, ई-न्युज किंवा ई-मॅगझीन्स  आम्ही कधी प्रचारात किंवा प्रसारात आणणार? जर निर्मिती खर्च कमी झाला तर नक्की कसला दर्जा  सुधारणार? आज मराठीच्या रचनेसाठी साधी एक स्टॅन्डर्ड की बोर्ड प्रणाली अस्तित्वात नाही ऑटो स्पेलचेक सारख्या सुविधा पॅकेज ओरिएण्टेड आहेत. मराठीत ऑनलाइन केलेली  कामें  ट्रान्सपोर्टेबल नाहीत. बाजारात उपलब्ध फॉन्टसही पन्नास साठ प्रकारचे आहेत, त्यांची एकमेकांशी सुसूत्रता नाही आणि बरेचसे परिपूर्ण ही  नाहीत. एकाच भाषेसाठी सॉफ्टवेअर बनवणार्‍या कंपन्या एकमेकांना पाण्यात पाहतात. सुसूत्रता येणार कशी?

पण परिस्थिति कितीही प्रतिकुल असली तरीही कुणीतरी पुढे जाणे गरजेचे आहे. वाचकांनी, ज्यांच्या घरात आज संगणक आलेलाच आहे, त्यावर वाचनाची सवय करुन घ्यायला काय हरकत आहे? आपले लेख संपादकांपर्यंत आणि अंक वाचकांपर्यंत सॉफ्ट कॉपीमध्ये जायला काय हरकत आहे? दहा ग्रंथालये भरतील एवढी पुस्तके एका छोटया डिस्कवर राहणे शक्य आहें असे संग्रह घरोघरी होतील का? संदर्भ म्हणून अख्खे ग्रंथालयच आपल्या दारी हजर असेल का? मराठी साहित्याचा ओघ परभाषेत रुपांतरीत होऊन देशी विदेशी जाईल का? मराठी लेखक  फेरारीमधून फेर्‍या मारेल का? स्वप्नांचं बरं असतं, इमले बांधायला पायाची गरज नसते! पण जोवर स्वप्न फुकटात पाहता येताहेत तोवर मी  ती पहाणारंच! किती झालं तरी मी मराठी आहे! सर्वच क्षेत्रात होत असलेल्या संगणकीय महाबदलांचे मी हारातुर्‍यां शिवाय स्वागत करणार! या दृष्टीने  ‘आम्ही मराठी’ ने  ‘डिजिटल’ प्रकाशन सुरु करुन पुढे पाऊल टाकलेले आहें त्या निमित्ताने ‘आम्ही मराठीला’ हार्दिक शुभेच्छा
                                 
                                  - आभास आनंद
                                   आम्ही मराठी - दिवाळी २००४

Sunday, January 1, 2012

बुडवलेल्या कविता- ६


निष्पर्ण

त्या झाडावर एकच पक्षी अजून गातो गाणी
राहत होती जेथे त्याची पिल्ले आणिक राणी

झाड एक ते विशाल होते कितीकांचे ते आश्रयदाते
बहर संपता साथ मागती उरले नाही कोणी

पिल्ले सगळी उडून गेली राणी नाही मागे उरली
राजा गातो अजून तेथे रचुनी गीत विराणी

वृक्ष आज तो निष्पर्ण झाला , आश्रयदाता तहानलेला  
आयुष्याच्या सूर्यास्ताला सोबत द्यावी कोणी ?
- आभास आनंद